महाराष्ट्रामध्ये सध्या विठ्ठू माऊलीवर आधारित ‘विठ्ठल’ या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मुर्तरूपी विठ्ठलाचे मनुष्यस्वरुप दाखवण्यात येणार असून यात अभिनेता सचित पाटील विठ्ठलाची भूमिका करणार आहे. तर अभिनेता श्रेयस तळपदेदेखील बऱ्याच काळानंतर मराठीत चित्रपटात झळकणार आहे.
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आणि स्फूर्तीस्थान असलेल्य श्री विठ्ठलावर आधारित ‘विठ्ठल ‘ या चित्रपटातील ‘विठ्ठला विठ्ठला’ हे गाणे नुकतंच प्रदर्शित झालं असून या गाण्यामध्ये श्रेयस झळकला आहे.
या गाण्यासाठी २५ फूट उंच अशी विठ्ठलाची मूर्ती उभारण्यात आली असून २५० डान्सर सोबत ढोल ताशा पथकदेखील दिसून येत आहे. विशेष म्हणजे या गाण्याच्या शेवटी अभिनेता सचित पाटील विठ्ठलाच्या रुपात प्रेक्षकांना दिसून येत आहे. या गाण्याला हिंदीतील लोकप्रिय गायक विशाल दादलानीचा आवाज लाभला असून हे गाणं गुरु ठाकूर यांनी लिहीलं आहे. तर राजू सरदार यांनी संगीतबद्ध केले आहे.
राजीव एस रुईया यांची कथा आणि दिग्दर्शन सोबत टेक्सास स्टुडियोजचे प्रकाश सिंघी यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटात सचित पाटील, अशोक समर्थ, दीप्ती धोत्रे, भाग्यश्री मोटे आणि हर्षदा विजय हा नवीन चेहरा आपल्याला बघायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या ७ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.