आजवर मराठी कलाविश्वात अनेक चित्रपटांची निर्मिती झाली. मात्र काही मोजके चित्रपट आहेत जे केवळ त्यांच्या उत्तम कथानकांमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेले आहेत. यातील एक चित्रपट म्हणजे ‘श्वास’. २००४ साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘श्वास’ हा चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल. आजोबा आणि नातू यांच्याभोवती या चित्रपटाची कथा फिरताना दाखविली आहे. रेतीनल कॅन्सर ग्रस्त नातवावर असलेलं आजोबांचा प्रेम, त्याची काळजी हे या चित्रपटात अत्यंत सुंदररित्या मांडण्यात आलं आहे. अरुण नलावडे आणि अश्विन चितळे यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे अश्विन चितळे या बालकलाकाराने नातवाची (परशुराम) भूमिका अत्यंत उत्तमरित्या ही भूमिका साकारली होती. श्वासमुळे विशेष लोकप्रियता मिळविलेला अश्विन आता कसा दिसतो किंवा काय करतो असा प्रश्न अनेकांना पडला असेल. परंतु अश्विन आता प्रचंड वेगळा दिसत असून त्याला ओळखणंही कठीण आहे.
श्वास’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून संदिप सावंत यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटाचं चित्रीकरण कोकण, पुणे येथे झालं असून काही भाग मुंबईतील ‘केईएम’ या रुग्णालयात झालं.
२००४ साली प्रदर्शित झालेला ‘श्वास’ या चित्रपटातून अश्विनने अनेकांची मनं जिंकून घेतली. इतकंच नाही तर त्याला सर्वोत्तम बाल कलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आलं. या चित्रपटानंतर अश्विनने नागेश कुकुनूर यांच्या ‘आशाऐं’ या हिंदी चित्रपटामध्ये काम केलं. त्यानंतर ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘जोर लगाके हैय्या’, ‘टॅक्सी नं. 9211’, ‘देवराई’ या चित्रपटांमध्येही त्याने बालकलाकार म्हणून काम केलं. मात्र आता अश्विनचा कलाविश्वातील वावर कमी झालं आहे.
अश्विन मूळचा पुण्याचा असून त्याने नूतन मराठी विद्यालयातून शालेय शिक्षण घेतलं आहे. तर सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून त्याने भूगोल, फिलॉसॉफी तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठामधून इंडोलॉजी या विषयांमधून शिक्षण घेतले आहे. विशेष म्हणजे अश्विनने स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे. “अश्विन हेरीटेज टुर्स” असं त्याच्या कंपनीचं नाव असून तो स्वतः डायरेक्टर फाउंडर आणि सिईओदेखील आहे.