सुपर स्टार वरचेवर भेटत असेल तर त्याचा मनापासून आनंद का बरे वाटू नये?
मराठीतला ‘सुपर स्टार’ भरत जाधव याच्या भेटीचे सध्या असेच वरच्यावर योग येत आहेत. त्याहीपेक्षा महत्वाचे ही प्रत्येक भेट खूप उत्साहजनक आणि ताजी ठरते आहे.
‘खो खो’च्या पार्टीत भेटला तेव्हा तो सांगत होता, ‘लोच्या झाला रे’ या नाटकावरून चित्रपट करतांना केदारने खूप मेहनत घेतली. आम्ही सगळेच असे व इतके हसत होतो की बस्स. सिनेमा पूर्ण कधी झाला हे समजलेच नाही.
त्यानंतर भरतची भेट त्याच्याच कंपनीच्या घोषणेप्रसंगी झाली. पुन्हा तोच त्याचा सळसळता उत्साह कायम होता. तो सांगू लागला, माझ्या नावाने ही कंपनी असली तरी या कंपनीच्या वतीने अन्य कलाकारांच्या चित्रपटाचेही प्रमोशन केले जाणार आहे. देश-विदेशात काही विशेष सोहळे देखिल आयोजित केले जातील. खूप मोठी झेप घेण्याच्या टप्प्यावर माझी कारकिर्द आली आहे असे म्हटले तरी चालेल. जराही वेळ न दवडता मराठी चित्रपटसृष्टीसाठी काही विशेष गोष्टी करण्याची इच्छा आहे.
त्यानंतर भरतची भेट ‘श्रीमंत दामोदर पंत’ या चित्रपटाच्या निमित्ताने झाली. तेव्हा तो म्हणाला, या चित्रपटासह ‘माझ्या नव-याची बायको’, ‘फेकमफाक’ आणि ‘धामधूम’ असे एकूण चार मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी सुरू आहे. थोडे अंतर ठेवून हे मराठी चित्रपट झळकतील. पण आपला कोणता चित्रपट कधी प्रदर्शित करायचा हे आम्हा कलाकारांच्या हाती नसते.
भरत जाधवचा हा चित्रपट प्रदर्शनाचा धडाका पाहता त्याच्या भेटीचे आणखी योग येणार हे निश्चित आणि त्या प्रत्येक वेळी खूप उत्साहाने तो काही तरी नवे सांगेल याची देखिल खात्री आहे. ‘भरत भेटावा परत परत’ दुसरे काय?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा