तिकीटबारीवर सुपरहिट ठरलेला आणि परीक्षकांनी कौतुकाचा वर्षांव केलेला ‘टकाटक’ हा मराठी चित्रपट आता सीक्वेलच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिलिंद कवडेंच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘टकाटक’ने विक्रमी व्यवसाय करत २०१९ च्या पूर्वार्धाच्या अखेरीस मराठी सिनेसृष्टीत नवचैतन्य निर्माण केलं होतं. टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर आता ‘टकाटक २’ची घोषणा करण्यात आल्याने सिनेसृष्टीत पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण पसरलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पर्पल बुल एन्टरटेन्मेंट प्रा. लि.’च्या बॅनरखाली निर्माते ओमप्रकाश भट्ट आणि धनजंय सिंग मासूम तसेच सहनिर्माते जगत सिंग यांनी ‘टकाटक २’ची अधिकृत घोषणा केली आहे. याप्रसंगी समाजमाध्यमातून ‘टकाटक २’चं मोशन पोस्टर लॉन्च करण्यात आलं. ‘टकाटक’ची कथा तरुणाईवर आधारित होती. मनोरंजनातून तरुणाईला एक संदेश देण्याचा प्रयत्नही चित्रपटातून करण्यात आला होता, त्यामुळे ‘टकाटक २’ या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनीच ‘टकाटक २’ची कथा आणि पटकथा लिहिली असून संवाद किरण बेरड यांचे आहेत. गीतकार जय अत्रे यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना संगीतकार वरुण लिखते संगीतबद्ध करणार असून हजरत शेख वली या चित्रपटाचे कॅमेरामन आहेत. ‘टकाटक २’मधील कलाकारांची नावे सध्या तरी गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहेत.

‘टकाटक’ या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केल्याने ‘टकाटक २’च्या रूपात पुढील भाग आणण्याची कल्पना सुचल्याचं दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी सांगितले. ‘टकाटक २’मध्ये प्रेक्षकांना सुमधुर गीत-संगीताने सजलेली एक प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. ‘टकाटक’ला मिळालेल्या यशानंतर पुढील भाग बनवताना जबाबदारी आणखी वाढली आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांना रुचेल, पटेल, भावेल असं काही तरी नावीन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न आहे, जो त्यांना नक्कीच आवडेल, अशी खात्री मिलिंद कवडे यांनी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie takatak sequel announcement zws