मराठी माणसांच्या मनावर गेली कित्येक वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ‘ठाकरे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. गेल्या कित्येक दिवसांपासून चित्रपट निर्माते संजय राऊत यांच्या या सिनेमाची चर्चा होती. हाच ठाकरे सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकीने त्याच्या कसलेल्या अभिनयातून बाळासाहेब ठाकरे पडद्यावर साकारले आहेत. अयोध्येमधील बाबरी मशीद आणि राम मंदिर यांच्यात सुरु असलेल्या वादात बाळासाहेबांचं नाव पुढे येते. मात्र या संकाटांमध्येही डगमगून न जाता आपला ताठ कणा जपणारे बाळासाहेब या चित्रपटातून समोर आले.
दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी बाळासाहेब नक्की कसे होते, त्यांचा स्वभाव, त्यांची निर्णयक्षमता आणि मराठी माणसासाठी काही तरी करुन दाखविण्याची पोटतिडकी अचूक मांडली आहे. आपल्या व्यंगचित्राच्या प्रेमापोटी ‘फ्री प्रेस जनरल’मधील नोकरीवर लाथ मारून बाळासाहेब बाहेर पडले आणि नोकरीच्या ठिकाणी मराठी माणसाची होणारी परवड त्यांना प्रकर्षाने जाणवली. मग त्यातून सुरु झाला मराठी अस्मिता जपण्याचा आणि मराठी माणसासाठी काही तरी करण्याचा प्रयत्न. त्यातून समोर आलं ते त्यांचं पहिलं व्यंगचित्र साप्ताहिक ‘मार्मिक’.
‘मार्मिक’च्या माध्यमातून बाळासाहेबांनी मराठी माणसाला रोजगार दिला. समाजात घडणाऱ्या चुकीच्या घटनांवर त्यांनी ताशेरे ओढले. इतकंच नाही तर महाराष्ट्रात मराठी माणसाला सन्मानाने जगता यावं यासाठी बाळासाहेबांनी स्वत:ला पूर्णपणे या कार्यात झोकून दिलं. पण हे कार्य तडीस नेण्यासाठी मराठी माणसाला संघटीत करण्याची गरज होती. त्यासाठी बाळासाहेबांचे प्रयत्न सुरु झाले आणि वडिलांच्या आशीर्वादाने जून १९६६ मध्ये ‘शिवसेना’ या मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या पक्षाची स्थापना झाली. ‘आपली संघटना नसेल तर ते सैन्य असेल सैन्य आणि तेही शिवसैनिकांचं’ हे वडीलांचे शब्द बाळासाहेबांनी कायम लक्षात ठेवले आणि शिवसेनाचा वृक्ष हळूहळू बहरु लागला.
शिवसेनेचा विस्तार होत असताना बाळासाहेबांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. कधी तुरुंगवास झाला तर कधी त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्नही. महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मनात त्यांच्याविषयीचं प्रेम दिवसेंदिवस वाढत होतं. तर काही राजकीय पक्ष आणि दहशतवादी संघटना यांना काहीशी जरब बसू लागली. यातूनच पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यातून ते सुखरुप बचावले हे विशेष. मात्र त्यांची दहशत पार देशापल्याड पोहोचल्याचं समोर आलं होतं. इतकंच नाही तर केवळ आपल्या भाषणातून मराठी माणसाची मराठी अस्मिता जागी करण्याची धमक असणाऱ्या बाळासाहेबांचा आदरयुक्त दरारा थेट तत्कालीन पंतप्रधानांमध्येही होता.
राजकारणापेक्षा समाजकारण करणारे बाळासाहेब ठाकरे आपल्या कुटुंबाकडेही विशेष लक्ष देत होते. मात्र या साऱ्यामध्ये मीनाताई ठाकरे यांचा मोलाचा वाटा होता. आपल्या पतीच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहण्याची धमक ही फक्त मीनाताई ठाकरेंमध्येच होती. बाळासाहेब तुरुंगात असताना घराचा आणि मार्मिकचा गाडा त्यांनी लीलया पेलला होता. या चित्रपटामध्येही हे उत्तमरित्या मांडण्यात आलं आहे.
अयोध्येमधील बाबरी मशीद आणि राम मंदिर यांची सुनावणी होत असताना चित्रपटात फ्लॅशबॅक दाखविण्यात आला आहे. त्यामुळे फ्लॅशबॅक आणि सध्य स्थिती हे अत्यंत सुंदररित्या मांडण्यात आलं आहे. त्याप्रमाणेच चित्रपटातील संगीत, नेपथ्य, दिग्दर्शन आणि चित्रपटाची मांडणी यामुळे चित्रपट खुलण्यास मदत होते. यामुळेच खऱ्या आयुष्यातील बाळासाहेब कसे होते हे दिसून येतं. विशेष म्हणजे चित्रपटाला कलाकारांनीही तितकाच न्याय दिला आहे.
हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यशस्वी ठरतो. ‘ठाकरे’च्या हिंदी चित्रपटामध्ये चक्क ११ मराठी कलाकार झळकले आहेत. प्रवीण तरडे, संदीप खरे (मनोहर जोशी) यांनी या भूमिका साकारुन बाळासाहेबांचा आणि शिवसनेचा तो काळ डोळ्यासमोर आणण्यास मदत केली. तर नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अमृता राव हे दोघही खऱ्या अर्थाने बाळासाहेब आणि माँसाहेब अर्थात मीनाताई ठाकरे यांचं आयुष्य जगले.
दरम्यान, या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी संवाद हे वाखाणण्याजोगे आहेत. बाळासाहेबांचे उत्तम संवाद आणि रोकठोक शैली या चित्रपटात मांडण्यात आली आहे. सध्या या चित्रपटातील संवाद चांगलेच गाजताना दिसत आहेत. ‘मैं आर्टि्स हूँ मजदूर नहीं’, ‘मराठी माणूस घाटी होगा पर घटिया नही’, ‘चादर मेरी, बिस्तर मेर, और सपने तेरे…’ हे नवाजुद्दीन सिद्दीकीच्या तोंडचे संवाद चांगलेच चर्चेत आले आहेत.
शर्वरी जोशी
sharvari.joshi@loksatta.com