राजकारण हा मराठी माणसाचा आवडता विषय तसेच त्याला मराठी चित्रपटातूनही अनेकदा स्थान. त्यात एक वेगळीच खेळी ‘वजीर’ची (१९९३). उज्ज्वल ठेंगडी लिखित ‘वजीर’ या नाटकाच्या कथानकावर आधारित या चित्रपटाचे अमिताभ बच्चननेही एका विशेष खेळात कौतुक केले. मराठी साहित्य, सांस्कृतिक ,राजकीय, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात या ‘वजीर’ची खूप चर्चा झाली. गिरगावातील सेन्ट्रल चित्रपटगृहातील ‘वजीर’च्या भव्य प्रीमियरच्या वेळेस कलाकारांना चाहत्यांचा पडलेला गराडा बरेच दिवस चर्चेत होता. तात्कालिक समीक्षक व प्रेक्षक अशा दोघांनीही या राजकीयपटाचे कौतुक केले. चित्रपटाला काही मानाचे पुरस्कार देखील मिळाले.
राजकारणातील राजकारण आणि निवडणुकीतील राजकारण असा हा दुहेरी प्रवास असतो. त्यातही मुख्यमंत्रीपद मिळवण्याची महत्त्वाकांक्षा नेमकी कोणती चाल खेळण्यास प्रवृत्त करेल हे कोणीच सांगू शकत नाही. यातूनच नातेसंबंध बदलत जातात याभोवती हा ‘वजीर’ होता. त्याचे कथानक असे सांगता येत नाही. राजकारणात कोणती चाल पुढे असेल हे सांगता येत नाही हे सूत्र अशा चित्रपटाचे यश असते. उज्ज्वल ठेंगडी यानीच पटकथा व संवाद लिहिले. तर संजय रावल यांनी दिग्दर्शन केले. विशेष म्हणजे उज्ज्वल ठेंगडी यानीच चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीचा ‘फोकस’ ठरवून चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. नामवंत कलाकारांचा उत्तम अभिनय अशा चित्रपटाचे वैशिष्ट्य ठरते. अशोक सराफ, विक्रम गोखले, अश्विनी भावे, इला भाटे, आशुतोष गोवारीकर, कुलदीप पवार, चंद्रकांत गोखले, कुसुम देशपांडे, सयाजी शिंदे, सुधीर जोशी, खुद्द उज्ज्वल ठेंगडी…
मराठीत राजकीयपटांच्या परंपरेत ‘वजीर’ नावापासूनच आपले वेगळेपण सिद्ध करण्यात यशस्वी ठरला. काही वास्तव घटनांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध त्यात असल्याने चित्रपटाचा प्रभाव वाढला. सुधीर मोघे यांच्या गीताना श्रीधर फडके यांचे संगीत होते. त्याचा वापरही सूचक. सावळी सावळी सावळ्याची जणू सावली.. हे गाणे विशेष उल्लेखनीय. सध्याच्या राजकीय वातावरणात ‘वजीर’ची दखल हवीच.
दिलीप ठाकूर