रवींद्र पाथरे

लग्न ही संस्था मनुष्यजीवनात जेव्हापासून अस्तित्वात आली आहे तेव्हापासूनच तिच्या यशस्वी-अयशस्वीतेबद्दलची कारणमीमांसा करण्याचे यत्न माणूस करतो आहे. मुळात समाज नामक संस्थेची घट्ट वीण कायम राहावी म्हणून माणसाने तयार केलेली ही चौकटबद्ध व्यवस्था. तिचं अस्तित्वच मुळात कृत्रिम पायावर उभं राहिलेलं. लग्न झालेल्या स्त्री-पुरुषांत अखंड प्रेम, आत्मीयता, जिव्हाळा कायम राहील, हे गृहितक त्यामुळे मुळातच चुकीचं. याला कारण पुरुषांची मूळ जनुकीय भ्रमरवृत्ती. त्यामुळे काहीएक काळानंतर त्यांचं भरकटणं स्वाभाविकच म्हटलं पाहिजे. तीच गोष्ट स्त्रीच्या बाबतीतही तितकीच खरी. म्हणजे वरकरणी नवऱ्याशी एकनिष्ठ असणाऱ्या स्त्रियांच्या मनातही परपुरुषाबद्दल आकर्षण निर्माण होतच नाही असं नाही. पण सामाजिक चौकट, मुलंबाळं, स्थैर्य, स्थितीशीलता आदींमुळे ‘आहे हेच ठीक आहे’ असं म्हणत बऱ्याचदा लग्नं निभावली जातात. पण हल्ली व्यक्तिस्वातंत्र्याची नको इतकी ओळख माणसाला झाल्याने लग्न निभावणं वगैरे गोष्टी आता हळूहळू मागे पडत आहेत. ‘माझं मन, माझं स्वातंत्र्य, मी’ हेच प्रत्येक व्यक्तीचं साध्य झाल्यानं आता घटस्फोटांचं प्रमाणही बऱ्यापैकी वाढलेलं दिसतंय. लग्न या गोष्टीला सर्वाधिक प्राधान्य देणाऱ्या भारतीय समाजातही हल्ली हे सर्रास दिसून येऊ लागलं आहे. लग्नाआधी, लग्नानंतर विवाहबाह्य संबंध आजकाल सर्वसामान्य झाले आहेत. त्याला कारणंही तशीच आहेत. या पार्श्वभूमीवर लग्नानंतर वीसेक वर्षांच्या सहजीवनानंतर जोडीदारांमध्ये एक प्रकारचं साचलेपण, तेच तेपण, परस्परांना गृहीत धरणं हे येतंच.. येणारच. पण त्यातून त्या दोघांत विसंवाद, एकाकीपण, तुटलेपण सुरू झालं तर..? हाच विषय घेऊन ‘आपण यांना पाहिलंत का?’ हे सुशील स्वामी लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित नाटक रंगभूमीवर आलं आहे.

Nagpur Bharosa Cell , Nagpur , Bharosa Cell,
नागपूर : विस्कटलेल्या १६ हजार ८४३ कुटुंबियांना पोलिसांचा ‘भरोसा’
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
actor arun singh rana divorce
“मी खचलो होतो”, प्रसिद्ध अभिनेत्याने केली घटस्फोटाची घोषणा; अतुल सुभाषशी स्वतःची तुलना करत म्हणाला, “माझ्या आयुष्यातील…”
loksatta chatura A mother taking custody of her child is not kidnapping telangana high court decision
आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे
Suicide girlfriend Nagpur, crime case against boyfriend,
नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा
tarkteerth lakshmanshastri joshi expressed views on marriage age of girls
तर्कतीर्थ विचार : कन्या विवाह वय विचार
Wife can file case of molestation against husband
पत्नी पतिविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करू शकते
suicide in barabanki uttar pradesh
“अधुरी एक कहाणी…”, पत्नीच्या कुटुंबीयाच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या; फेसबूकवर लिहिली सुसाईड नोट!

हेही वाचा >>> Ole Aale Movie Review : खुसखुशीत भावपट

मेघा आणि राकेश यांचं वीसेक वर्षांचं सहजीवन.. त्यांच्यातल्या छान छान, गोड गोड नात्याचा कंटाळा येऊन आताशा ते नीरस होऊ लागलंय. पण राकेशला नसली, तरी मेघाला मात्र याची जाणीव तीव्रतेनं होऊ लागली आहे. दररोजचं तेच ते आयुष्य.. याचा तिला कंटाळा येऊ लागलाय. अशात तिला आपल्या कॉलेजजीवनातील प्रियकराची- प्रशांतची आठवण येते.. आणि चक्क तो कर्मधर्मसंयोगानं तिच्यासमोर उभाच ठाकतो.. आपल्या तिच्यावरच्या प्रेमाची ग्वाही देत. तीही हरखून जाते. त्याच्याबरोबरच्या आयुष्याचं अधुरं राहिलेलं आपलं स्वप्न असं अचानक पूर्ण होतंय हे तिला खरंच वाटत नाही. पण अर्थात राकेशचा विचारही ती एकीकडे टाळू शकत नाही. त्याच्याबरोबरच्या सहजीवनाचा आपल्याला कंटाळा आलाय खरा; पण त्याचं आपल्यावर प्रेम आहे हेही तिला माहीत आहे. आपल्याशिवायच्या आयुष्याची तो कल्पनाही करू शकत नाही. आपलंही त्याच्यावर प्रेम आहे. पण त्याच्या प्रेमात पूर्वीचा चार्म राहिलेला नाही, हेही ती आताशा अनुभवते आहे. मग काय हरकत आहे प्रशांतबरोबर पुनश्च नातं जुळवायला? प्रेमाची ती असोशी पुन्हा अनुभवायला?

ती प्रशांतला अनुकूल प्रतिसाद देते. तिच्यातील हा बदल राकेशच्या लक्षात येतो. ती आपलं लग्नाआधीचं अफेअर त्याला सांगते.. आणि प्रशांत पुन्हा आपल्या जीवनात आल्याचंही! राकेश तिच्या या कबुलीजबाबानं हादरतो. कारण त्याला प्रशांतचं अस्तित्व दिसत नाही. मेघाचे हे मनाचे खेळ आहेत, फॅन्टसी आहे हे त्याच्या लक्षात येतं. पण ती त्यात वाहवत चाललीय, हेही. तो जबरदस्त हादरतो. त्यानं असं कधी होईल, ही कल्पनाही केलेली नसते. आणि प्रशांत आपल्या घरी आलाय, त्याचं मेघाशी फ्लर्टिग चाललंय, हे तो सहनच करू शकत नाही. तो सुधीरबुधीर होतो. काय करावं, त्याला सुचत नाही. याला उपाय म्हणजे आपणही कुणाबरोबर तरी तिच्यासारखंच ‘अफेअर’ करावं आणि मेघाला मत्सरग्रस्त करावं.. तो एका क्लाएंटमार्फत तशी एक मुलगी (प्रीती) शोधतो. तिला आपल्या घरी बोलावतो. मेघासमोर तिनं आपल्याशी फ्लर्ट करावं असं तो तिला सुचवतो. पण तिच्याशी खोटा खोटा रोमान्स करणं त्याला मात्र जमत नाही. मेघा ते अर्थातच जाणून असते.

हेही वाचा >>> Satyashodhak Movie Review : महात्म्याच्या आयुष्याचा वास्तवदर्शी वेध!

त्याचवेळी प्रशांत त्याला दिसतो. त्यांच्या शेजारचा फ्लॅट भाडयाने घेण्यासाठी तो आलेला असतो. राकेश त्याला पळवून लावण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न करतो. मेघालाही प्रशांतमध्ये तो पूर्वीचा चार्म आढळत नाही. तिच्या अपेक्षेप्रमाणे त्याचं आयुष्य, त्याचं असणं नसतं. त्यापेक्षा राकेशच बरा या निष्कर्षांप्रत ती येते.

मध्यमवयीन जोडप्यातील हरवलेला रोमान्स हा या नाटकाचा विषय. लेखक सुशील स्वामी यांनी तो छान खुलवला आहे. तीन पात्रांमधले विसंवादी नातेसंबंध आणि त्यांच्या क्रिया-प्रतिक्रिया, प्रतिक्षिप्त क्रिया यांतून हे गोड नाटक आकारास येतं. छोटे छोटे संवादखंड, त्यांतील विसंगती-सुसंगती, त्यांच्या उच्चारणातील (भाषिक) सूक्ष्म बदल आणि त्यातून निर्माण होणारा ध्वन्यार्थ हा खेळ त्यांनी मस्तच रंगवला आहे. प्रीतीचं छछोरपण सोडलं तर सगळी पात्रं व्यवस्थित रेखाटलीयत. पती-पत्नीच्या नात्यातील ताणेबाणे त्यांनी अचूक हेरलेयत.

विजय केंकरे यांनी दिग्दर्शनातून पात्रांना यथायोग्य लकबी, स्व-भाव आणि अपेक्षित ताण दिले आहेत. त्यांची निरगाठ बनणार नाही याचीही खबरदारी घेतली आहे. लेखकाच्या शाब्दिक खेळाचा अचूक वापर त्यांनी सहजगत्या केला आहे. राकेश-मेघा-प्रशांत यांच्यातील नात्याचा ताणतणाव, त्यातील हळव्या, निसरडया जागा त्यांनी यथार्थपणे टिपल्यात. त्यांचा तोल ढळू नये हेही पाहिलंय. नाटक उत्तरोत्तर कसं रंगत जाईल हे त्यांनी सजगतेनं पाहिलं आहे. राकेशचं हायपर होणं, मेघाचा कूलनेस त्यांनी योग्य त्या पातळीवर ठेवलाय; ज्यातून विनोदनिर्मिती होते. फक्त प्रीती प्रकरण मात्र त्यांनी कृतक केलंय.

हेही वाचा >>> PANCHAK Movie Review : भीतीच्या पंचकावरचा विनोदी उतारा

संदेश बेंद्रे यांचं घराचं देखणं नेपथ्य पात्रांचा आर्थिक स्तर, आवडनिवड, रहनसहन निर्देशित करणारं आहे. शीतल तळपदेंनी प्रकाशयोजनेतून यातलं ‘नाटय’ खुलवण्यास हातभार लावला आहे. अजित परब यांच्या संगीताने आवश्यक त्या नाटयात्म जागा भरल्या आहेत. मंगल केंकरे यांची वेशभूषा पात्रानुकूल.

तुषार दळवींचा अ‍ॅबसेन्ट माइंडेड राकेश लोभस. आपल्या पत्नीच्या प्रियकरानं आपल्या घरात प्रवेश केला आहे आणि त्याने तिचा जणू ताबाच घेतलाय हे समजल्यावर ताळतंत्र हरपलेला, तिला पुन्हा आपल्याशी घट्ट जोडून ठेवू पाहणारा, भयंकर अस्वस्थ झालेला नवरा त्यांनी त्याच्या हायपरनेससह उत्तमरीत्या साकारलाय. मध्यमवयीन दाम्पत्यजीवनात आलेलं साचलेपण, कंटाळा यथायोग्यरीत्या दर्शवणारी, पूर्वाश्रमीचा प्रियकर प्रशांतच्या आगमनानं हर्षभरीत झालेली, त्याच्यापायी राकेशला काहीशी दुर्लक्षित करणारी, आणि तरीही आपल्या संसाराचं रहाटगाडगं चालूच ठेवू इच्छिणारी मेघा- मधुरा वेलणकर- साटम यांनी प्रफुल्लितपणे सादर केली आहे. तिचे हर्ष-खेद, दुहेरी वागणं-बोलणं-वावरणं, प्रियकराच्या आगमनानं निर्माण झालेला ताण, राकेशबद्दलच्या जबाबदारीची जाण यांतील समन्वय त्यांनी छान साधलाय. विक्रम गायकवाड यांचा प्रशांत प्रियकराची असोशी, ओढ नेमकेपणाने व्यक्त करणारा. श्रुती पाटील यांची उच्छृंखल प्रीती ठीक. मध्यमवयीन जोडप्यांच्या सहजीवनातील ताणतणावांचं, प्रेमाच्या अभावाचं हसतखेळत चित्रण करणारं हे नाटक. एकदा तरी ते बघायलाच हवं.

Story img Loader