नाटककार-दिग्दर्शक सतीश आळेकर यांचं ‘महानिर्वाण’ हे १९७४ साली आलेलं कृष्णसुखात्मिका (ब्लॅक कॉमेडी) स्वरूपाचं नाटक. गेल्या ४३ वर्षांत त्याचे ४०० हून जास्त प्रयोग झाले आहेत. याचा अर्थ वर्षांला सरासरी दहा प्रयोग! म्हणजे फार नाहीत. मराठी रंगभूमीवर काही नाटकांचे हजारोंनी प्रयोग होऊनही इतिहासानं त्यांची (म्हणावी ती) दखल घेतलेली नाही. ‘महानिर्वाण’ मात्र यास अपवाद ठरलं. ते भारतीय रंगभूमीवरील मैलाचा एक दगड ठरलंय. याचं रहस्य काय?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याचं कारण : या नाटकाचं वैश्विक आवाहन! अनेक भारतीय भाषांतून त्याचे प्रयोग झालेत. अनेक विद्यापीठांतून ते अभ्यासाला लावलं गेलंय. परदेशांतही ते पोहोचलंय. ‘महानिर्वाण’ला मिळालेली राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मानमान्यता त्याची कालातीतता अधोरेखित करणारी आहे. एखादी गोष्ट जितकी ‘लोकल’ (स्थानीय), तितकी ती ‘ग्लोबल’ (वैश्विक) होण्याची शक्यता बळावते असं म्हणतात. ‘महानिर्वाण’च्या बाबतीत ते शंभर टक्के खरं ठरलंय. तसं पाहू जाता ‘महानिर्वाण’ हे पुणेरी, कर्मठ, कट्टर परंपरानिष्ठ सदाशिवपेठी भाऊराव नामक सामान्य व्यक्तीच्या मरणाचं त्यानं स्वत:च लावलेलं आख्यान. कीर्तन, अभंग, भारूड या लोककला परंपरांच्या आधारे लावलेलं. स्वाभाविकपणेच ते मोठय़ा जनसमुदायापर्यंत पोचण्यात खरं तर अडसर यायला हवा होता. नाटकाची भाषा, विषय, आशय, शैली, सादरीकरण सगळंच स्थानीय. पारंपरिक. असं असताही हा चमत्कार घडला! कसा? आणि का?

याचं उत्तर या नाटकाच्या शैलीत दडलं आहे. सनातन रूढी, प्रथा, परंपरा आणि समजुतींच्या साचलेपणातून येणाऱ्या कंटाळ्यास (बोअरडम) छेद देणारी, त्यांना थेट आव्हान देणारी ही बंडखोर कलाकृती आहे. रंजनमूल्यांचा चपखल वापर करून सादरीत. साहजिकच सामान्यजनांसह जाणकारांपर्यंत सर्वानाच भावलेली. अनवट बांधणीची. या सगळ्या घटकांचा इतका अप्रतिम एकमेळ आळेकरांनी यात घातला आहे, आणि चंद्रकांत काळेंसह सर्वच कलाकारांनी ते इतक्या उंचीवर नेऊन ठेवलंय, की त्यास अभिजाततेचा दर्जा न मिळता तरच नवल! थिएटर अ‍ॅकॅडमीच्या दोन पिढय़ांनी हे नाटक सादर केलं. आणि आता ‘नाटक कंपनी’ या संस्थेनं नव्या तरुण कलाकारांच्या संचात ते पुनश्च सादर केलं आहे. सतीश आळेकरांनीच हाही प्रयोग दिग्दर्शित केला आहे. तो बघण्याचा योग नुकताच आला. या नाटकातील सत्तरच्या दशकातली पिढी आणि आजची जागतिकीकरणोत्तर पिढी यांच्या दरम्यानच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. खरं तर त्यामुळे ‘महानिर्वाण’ कालबाह्य़ व्हायला हवं होतं. काळ, माणसं, त्यांच्या वृत्ती-प्रवृत्ती या कालौघात आणि जागतिकीकरणाच्या झंझावाती आवर्तात समूळ नष्ट होणं अपेक्षित होतं. वरकरणी तसं झालंयही. परंतु थोडंसं खरवडून पाहिलं तर आधुनिक पोशाख, व्यक्तिकेंद्री विचार आणि संगणक, मोबाईल, गुगल महाजाल आदी अत्याधुनिक सोयीसुविधांच्या पसाऱ्यात माणूस वैश्विक होण्याऐवजी अधिकाधिक संकुचितच होत चाललाय. ‘महानिर्वाण’मधल्या धार्मिक, सनातनी परंपरा, समजुतींचं आज पुन्हा मोठय़ा गाजावाजात पुनरुज्जीवन होताना दिसतंय. अयोध्येतील मशीद-मंदिर वाद, त्यातून निर्माण केला गेलेला धर्मोन्माद, दसरा, गुढी पाडवा आदी सण-समारंभांचं वाढतं प्रस्थ, राष्ट्रवादाचं झालेलं पुनरुज्जीवन, गोवंशहत्या-बंदी, खाणंपिणं, पेहेराव इत्यादींचं धर्मवादी शक्तींकडून सरकारच्या आशीर्वादाने सक्ती करण्याचे होत असलेले प्रयत्न.. या अशा वातावरणात ‘महानिर्वाण’ची पाश्र्वभूमी कधी नव्हे इतकी चपखल बसणारी आहे. मग आपण सुधारलो आहोत ते कुठल्या बाबतीत, हा प्रश्न पडतो. आणि त्याचं उत्तर नकारार्थीच द्यावं लागतं. काळाची चक्रं उलटी फिरताना दिसताहेत. मग अशात ‘महानिर्वाण’ संदर्भहीन, कालबाह्य़ कसं ठरावं?

‘महानिर्वाण’चा प्रयोग आजच्या पिढीला का करावासा वाटतो, या प्रश्नाच्या उत्तरात दोन-तीन शक्यता दडलेल्या दिसतात. एक म्हणजे ज्या नाटकाचा ‘अभिजात’ म्हणून बोलबाला झाला आहे ते एकदा आपण करून पाहिलं तर..? हे एक! दुसरं.. जरी आपल्या पिढीला या नाटकातल्या वास्तवाचा अनुभव नसला तरी हे शिवधनुष्य उचलून बघायला काय हरकत आहे? तिसरं : कदाचित नकळतही असेल, पण या नाटकात परंपरेला नकार देण्याचं जे धाडस दाखवलं गेलं आहे, ते आजच्या पिढीपुढे ठेवून त्यांच्या बोथटलेल्या संवेदनांना उत्तेजित करायचा प्रयत्नही यात असू शकतो. एक मात्र खरंय, की हे नाटक तेव्हा काळाच्या पुढचं होतं. आज ते समकालीन झालंय. किंबहुना, त्यातला आशय आज प्रत्यक्षात उतरलेला अनुभवायला मिळतो आहे. तर ते असो.

पुण्याच्या सदाशिव पेठेतील भाऊराव नामे एक गृहस्थ ऐन माध्यान्हीत अकस्मात वैकुंठवासी झाले. पण त्यांच्या पत्नीस- रमेस मात्र ते झोपले आहेत असंच वाटतंय. दस्तुरखुद्द भाऊरावांनी सांगूनही तिला ते पटत नाही. पण चाळकऱ्यांनी हे वास्तव असल्याचं सांगितल्यावर मात्र तिला खरंच भाऊराव गेल्याचं कळतं. तिच्यावर आभाळच कोसळतं. तशात त्यांचा मुलगा नाना आटय़ापाटय़ाच्या स्पर्धेसाठी बाहेरगावी गेलेला. पण तो कुठं गेलाय, हे कुणालाच धडपणे माहीत नाहीए. नाना आल्याखेरीज भाऊरावांवर अंत्यसंस्कार कोण करणार? साहजिकच चाळकरी तोवर नाना प्रकारे स्वत:चं मनोरंजन करत टाइमपास करतात.

अखेरीस नाना येतो. त्याला भाऊरावांच्या जाण्याचा धक्काबिक्का न बसता उलट तो विचारतो, ‘तुम्हा मंडळींनी भाऊरावांचे अंतिम संस्कार का उरकून टाकले नाहीत? आता त्यांचा देह कुजायला लागेल.’ अंत्ययात्रेची रीतसर तयारी होऊन ती स्मशानात पोहोचते तर स्मशानभूमीला टाळं लागलेलं. काल रात्रीच नगरपालिकेनं ती बंद केलेली. तिच्याऐवजी शहरापासून दूर विद्युतदाहिनी असलेली नवी स्मशानभूमी बांधण्यात आली होती. मात्र, भाऊरावांना तिथे आपले अंत्यसंस्कार होणं साफ नामंजूर होतं. तोवर चाळकरी नळाचं पाणी जाईल, या भीतीनं नानाला जुन्या स्मशानाभूमीत एकटय़ालाच सोडून गायब झालेले. सबब नानाला भाऊरावांचं पार्थिव परत घरी आणण्यावाचून गत्यंतर उरत नाही. तो त्यांना माळ्यावर लपवून ठेवतो.

मनानं कायम हिरवट असलेल्या भाऊरावांना रमेचं सांत्वन करण्याच्या निमित्तानं तिच्याशी जवळीक साधण्याची हुक्की येते. ते तिला भेटतात. परंतु तिच्या बोलण्यात भलत्याच कुणीतरी आपली जागा घेतल्याचं भाऊरावांच्या लक्षात येतं. रमेचा हा प्रियकर कोण? तो आपण हयात असतानाच अस्तित्वात होता, की आपण गेल्यानंतर गेल्या दहा दिवसांत तिनं हा नवा गडी शोधलाय? ..विचार करकरून भाऊरावांच्या डोक्याचं भजं होतं. दहाव्या दिवशी नाना पिंडदानाकरता स्मशानात आला असताना भाऊराव आपली ही व्यथा त्याच्याकडे बोलून दाखवतात. नानाच्या मनीही संशयाचं मोहोळ उठतं. तसं काही असेल तर आईचं त्या गृहस्थाशी लग्न लावून द्यायला तो राजी आहे. पण आधी त्याला शोधायला तर हवं! आईला तो त्या माणसाबद्दल विचारतो. भाऊरावांच्या अंत्ययात्रेत त्यांना खांदा देणाऱ्यांत तो डावीकडून तिसरा होता, त्याने कोट आणि डोळ्यांवर काळा गॉगल घातला होता असं ती सांगते. पण भाऊरावांच्या तिरडीला खांदा देणाऱ्यांत त्यांच्या डोक्याच्या बाजूने की पायाच्या बाजूने डावीकडून तिसरा? हा गोंधळ नानाच्या मनात निर्माण होतो. त्यापायी त्याचा हॅम्लेट होतो. या संशयाचं निराकरण करण्यासाठी तो खुद्द भाऊरावांनाच त्या गृहस्थासारखा पेहेराव करून आईसमोर यायला सांगतो. रमेला पेहेराव बदललेले भाऊरावच आपल्याला खुणावणारे डावीकडून तिसरे असल्याचं भासतं. कारण तिला त्या गृहस्थाचा चेहरा काही स्पष्ट दिसलेला नसतो. खरं काय, खोटं काय, याचा नीटसा उलगडा न होताच शेवटी जुन्या स्मशानभूमीतील वॉचमनला पैसे चारून तिथंच भाऊरावांच्या इच्छेनुसार नाना त्यांचे अंतिम संस्कार उरकतो.

जुन्या रूढी, परंपरा, समजुती यांचं विरूप चित्र उभं करणारं हे नाटक. त्याच्या उपहासात्मक शैलीमुळे ते रंजक तर ठरतंच; परंतु पाहणाऱ्याला ते अंतर्मुख व विचारप्रवृत्तही करतं. दिग्दर्शक सतीश आळेकर यांनी मूळ प्रयोगाच्या ढाच्यात काहीच बदल न करता तो जसाच्या तसा बसवला आहे. ‘महानिर्वाण’ला त्यांना वर्तमान काळाशी जोडता आलं असतं. परंतु त्यांनी ते केलेलं नाही. चंद्रकांत काळे यांनी गाजवलेल्या भाऊरावांच्या अद्वितीय भूमिकेशी तुलना न करता या प्रयोगात भाऊराव साकारणाऱ्या नचिकेत देवस्थळी यांनी या भूमिकेला आपल्या परीने न्याय देण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. गाण्यात त्यांची आवाजाची रेंज साथ देती तर ती अधिक उंचीवर जाती. नाना झालेले सिद्धार्थ महाशब्दे यांनी नानाचं तटस्थ अलिप्तपण आणि आईला नव्या जोडीदारासंबंधी वाटणारी ओढ समजून घेत तिचं लग्न लावून देण्याची केलेली तयारी आजच्या काळात बिलकूल धक्कादायक नाही. ‘महानिर्वाण’ काळाशी सुसंगत झाल्याचाच हा पुरावा. रमेच्या भूमिकेतील सायली फाटक यांनी रमेच्या मनातले कल्लोळ, त्यातली आंदोलनं सहजत्स्फूर्तपणे प्रकटित केली आहेत. भक्तीप्रसाद देशमाने आणि मयुरेश्वर काळे यांनीही इरसाल चाळकरी यथार्थपणे वठवले आहेत. पिंडदानाचा प्रसंग हा  त्याचा वानवळा. दिवंगत आनंद मोडक यांचं संगीत हा ‘महानिर्वाण’चा प्राण आहे. ते त्याच वजनानं प्रयोगात वापरलं गेलं आहे. गंधार संगोराम यांचं प्रसंग उठावदार करणारं पाश्र्वसंगीत ही या प्रयोगातील नवी अ‍ॅडिशन. काळाच्या पुढचं म्हणून मंचित झालेलं हे नाटक आज कालसुसंगत ठरल्याचा प्रत्यय देतं. तिसऱ्या पिढीचं हे ‘महानिर्वाण’ एकदा आवर्जून पाहायलाच हवं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi natak mahanirvan
Show comments