‘..मग मी आई-वडलांना, गावातल्या प्रतिष्ठितांना म्हणायला लागलो, तुम्ही जे -जे म्हणता ते सगळं मला कबूल आहे. कुणीतरी काहीतरी सांगितलं. मी म्हणालो, होय. सगळं मान्य आहे. मी करीन. त्यांनी प्रश्न विचारले. आणि मी होय-होय म्हणालो.
‘उदाहरणार्थ काही झालं तरी हे आपल्याला खुंटय़ावर आणून वगैरे बांधतीलच. मग नेमकं अगोदरच खुंटय़ावर येऊन उभं राह्य़लेलं बरं. किंवा काही केलं तरी हे थेट आपली व्यवस्था पहातीलच. नाही म्हणायची वगैरे सोयच नाही. ते उदाहरणार्थ जमेल गिरधर वगैरेसारख्यांनाच. आपल्यासाठीच जगात अनेक जबरदस्त गोष्टी होऊन चुकल्याच आहेत. त्यामुळे हुबेहूब सोपं जातं. कायदेकानू त्यातल्या त्यात कुणी शोधले? त्यापेक्षा कुणाकरता? भाषा ज्यास्तीत ज्यास्त कुणी शोधली? निदान कुणाकरता? जेमतेम घर कुणी बनवलं? इतरत्र लग्नाची पद्धत कुणी पाडली? साधारण कुणाकरता?
‘..वय गेलं असं हे अवांतर म्हणतात. ते मात्र उदाहरणार्थ बरोबर नाही. आणखी पुढे नाना र्वष आहेतच. र्वष नीट असतातच. आपण उदाहरणार्थ किती का उशिरा उठतना? त्या नानानं कसं का वागतना? आपापली र्वष पुढे अचूक शिल्लक असतातच. ती वगैरे काही कमावता येत नाहीत. तेव्हा गमावली ही भाषा मात्र उदाहरणार्थ इतकी बरोबर नाही. किंवा र्वष अत्यंत वाया गेली, असं म्हणणं उदाहरणार्थ चूक आहे. म्हणजे बरोबरच.’
लेखक डॉ. भालचंद्र नेमाडेंचं ‘कोसला’च्या अंतिम पर्वातलं हे तत्त्वज्ञानात्मक विवेचन. पांडुरंग सांगवीकरच्या निमित्तानं ते आपणा सर्वसामान्य माणसांच्या चिरगुट जगण्याचंच तत्त्वज्ञान यात मांडताना दिसतात.
नेमाडेंची ओळख आज साहित्यविश्वात ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक अशी असली, तरी त्यांचे चाहते त्यांना ओळखतात ते ‘कोसला’कार म्हणूनच! (आता काहींना ‘हिंदू : जगण्यातील समृद्ध अडगळ’चे कर्ते म्हणूनही ते परिचित झाले आहेत. आता हे नवीनच.) त्यांच्या बंडखोर (अन् काहीशा विक्षिप्त) मतांमुळे तसंच त्यांच्या देशीवादाच्या जोरदार पुरस्कारामुळे हल्ली काही नव्यांनाही ते ‘आपले’ वाटायला लागले आहेत. परंतु त्यांच्या या नव्या चाहत्यांची गफलत झालेली दिसतेय. नेमाडेंचा देशीवाद आणि या चाहत्यांचा देशीवाद यांत मूलभूत फरक आहे, हे त्यांनी नेमाडे धडपणे न वाचल्यामुळे त्यांचा हा सोयीस्कर गैरसमज झालेला आहे. पण लक्षात कोण घेतो? एकीकडे नेमाडे पंथही साहित्यविश्वात चांगलाच सक्रीय आहे. (जरी उदाहरणार्थ नेमाडेंनी त्याची विधीवत स्थापना वगैरे केली नसली, तरी!) साधारणत: प्रस्थापितविरोधी म्हणजे नेमाडेपंथी अशी त्याची ढोबळ व्याख्या करायला हरकत नाही. तर ते असो.
आता मधेच नेमाडेंची आठवण वगैरे यायचं कारण की, रंगमंचावर आलेलं ‘मी, पांडुरंग सांगवीकर’ हे त्यांच्या ‘कोसला’ आणि ‘देखणी’ या कवितासंग्रहावर आधारित नाटय़रूप! ऐन पंचविशीत नेमाडेंनी पंधरा दिवसांत एकटाकी ‘कोसला’ वगैरे लिहून मराठी सारस्वतांत एकच खळबळ उडवून दिली होती म्हणे. १९६३ ची ही गोष्ट. त्या घटनेस आता र्अधशतकाहून अधिक काळ लोटलाय. बर्नार्ड शॉ म्हणत असे, की माझं साहित्य जर पुढची ५० र्वष टिकलं, तर याचा अर्थ समाजात काय्येक बदल झालेला नाही असं खुशाल समजा. त्या मापानं बघायला गेलं तर नेमाडे ५० र्वष टिकलेत म्हणताना काळ पुढे सरकला तरी समाज जिथल्या तिथंच आहे. किंवा मग ते थोर वगैरे असावेत. ‘कोसला’ लिहिताना त्यांना तसं व्हायचं वगैरे होतंच. तसं त्यांनी स्वत:च लिहून ठेवलंय. तेव्हा ते उदाहरणार्थ आता थोर वगैरे झाले असावेत. चला, एक बरं झालं. त्यांचं ते स्वप्न वगैरे काय म्हणतात ते पुरे झालं. हे एक नवीनच.
तर मी काय म्हणत होतो? हं.. ‘कोसला’नं त्यावेळी मराठी साहित्य अक्षरश: ढवळून काढलं. त्यातल्या निवेदकाच्या- म्हणजे पांडुरंग सांगवीकरच्या अघळपघळ, विडंबनात्मक शैलीनं अन् जीवनचिंतनामुळेही. काहीसं डायरी फॉर्ममधलं हे लेखन. खानदेशातून पुण्यासारख्या शहरात शिकायला आलेला खेडवळ, बावळट पांडुरंग आपल्या गावरान, मिश्कील, मनमोकळ्या, थेट शैलीत आपली गोष्ट सांगता सांगता आजूबाजूच्या गोष्टी, घटना-घडामोडी, व्यक्ती आणि समाजावर टोकदार वगैरे काय म्हणतात ते भाष्यही यात करताना दिसतो. त्यामुळे ही गोष्ट कुणा एका खेडुत कॉलेजयुवकाची न राहता वैश्विक सत्य मांडणारी ठरली. ‘उदाहरणार्थ, वगैरे, आता हे नवीनच, हे भलतंच..’ अशा काही शब्दांच्या, शब्दसमूहांच्या पुनरावर्तनांतून या लेखनाला एक लय, एक गती, एक ताल(ही) प्राप्त झाल्याचं पदोपदी जाणवतं. किमान दोन पिढय़ा तरी नेमाडेंच्या या शैलीवर लट्टू होत्या.. आहेत. पण गंमत अशी, की त्यातल्या कुणालाही त्यांच्या या शैलीचं अनुकरण करता आलेलं नाही. त्यांच्या जीवनचिंतनावर फिदा झालेल्यांचा एक ‘पंथ’ही (कल्ट) हिरीरीनं निर्माण झाला. त्यानं समकालीन साहित्यातील भंपकबाजीवर सडकून टीका केली. त्याला विरोध केला. पण नेमाडेंनी मात्र या आपल्या कथित अनुयायांना जवळ केल्याचं चित्र सहसा निदर्शनास आलेलं नाही. असो. तरीही नेमाडेंचा दबदबा गेली कित्येक र्वष कायम आहे.
‘कोसला’त पांडुरंग सांगवीकर (ऊर्फ नेमाडे) यांनी आपलं बालपण ते तारुण्याच्या ऐन उंबरठय़ावरचा काळ इथवरचं आत्मकथनपर लेखन ग्रथित केलेलं आहे. या कथनात एका सामान्य मुलाच्या आयुष्यात येणारे तेवढेच सामान्य अनुभव, त्यातून झालेली त्याची जडणघडण, त्याला पडणारे प्रश्न (विशेषत: खेडेगावातून थेट मोठय़ा शहरात येण्यानं पांडुरंगला बसलेले वीस हजार व्होल्ट्सचे सांस्कृतिक वगैरे धक्के!), कॉलेजमध्ये आल्यावर आमूलाग्र बदललेलं त्याचं विश्व (यात भावनिक, सांस्कृतिक, सामाजिक, वैचारिक वगैरे सगळं आलंच!), त्याच्या स्वत:त झालेले बदल, परिस्थितीशी त्याचं जुळवून घेणं, किंवा मग आपल्यातला न्यूनगंड घालवण्यासाठी तिच्यावरच त्यानं स्वार होणं, वगैरे.. हा सगळा तपशील ‘कोसला’त आला आहे.
‘कोसला’चं ‘मी, पांडुरंग सांगवीकर’ हे नाटय़रूपांतर करताना (हा रंगाविष्कार सिद्ध करताना) संहितेचे मूळ संकल्पक अनिल कांबळे आणि दिग्दर्शक मंदार देशपांडे यांनी नेमाडेंच्या ‘देखणी’ या काव्यसंग्रहातील कवितांचीही जोड त्यास दिली आहे. ‘कोसला’तील घटना-प्रसंगांशी अंतस्थ नातं सांगणाऱ्या त्यातल्या कविता निवडून त्यांनी हा ‘प्रयोग’ आकारला आहे. वस्तुत: ‘देखणी’तील कविता या ‘कोसला’पश्चात दहाएक वर्षांनी लिहिलेल्या. त्यातलं चिंतन वयानुरूप अधिक प्रगल्भ झालेल्या नेमाडय़ांचं आहे. या दोहोची सांधेजोड केलेली पाहताना म्हणूनच प्रेक्षकांच्या दृष्टीस खडखडाट येतो. तशात या कविता सादरीकरणाची गतीही इतकी वेगवान, की त्यातली अर्थवलयं त्यांच्यापर्यंत पोचून ती त्यांच्या अंतर्मनात जिरेस्तो उदाहरणार्थ पुसलीच जातात. त्यामुळे अपेक्षित परिणाम साधला जात नाही. ‘कोसला’ आणि ‘देखणी’चा हा संकर परिणामी प्रेक्षकांना अट्टहासी वाटू शकतो. नव्हे, वाटतोच. मूळ ‘कोसला’तील प्रसंग निवडताना प्रत्येक माणसाची आवडनिवड भिन्न असल्यानं त्यावरही मतभेद होऊ शकतात. अर्थात या प्रयोगात निवडलेले प्रसंग प्रातिनिधिक आहेत, रंगकर्मीनी केलेला तो एक ‘प्रयोग’ आहे, हे मुदलात ध्यानी घ्यायला हवं. फक्त त्यातून पांडुरंगचा बौद्धिक, मानसिक, भावनिक आणि वैचारिक प्रवास अधोरेखित होतो की नाही, हे बघणं जास्त महत्त्वाचं. अर्थात तो बऱ्याच अंशी सफल झाला आहे यात शंका नाही.
या प्रयोगाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे त्यातल्या कलाकारांची मन:पूर्वकता. पांडुरंग सांगवीकर साकारणाऱ्या पद्मनाभ बिंड यांच्यापासून पूर्णानंद वांढेकर, आशीष नारखेडकर, आनंद प्रभू, विक्रांत बदरखे आणि कल्याण पाटील या सर्वानीच सर्वस्वानं हा रंगाविष्कार प्रत्ययकारी करण्यासाठी जीवतोड मेहनत घेतल्याचं जाणवतं. पद्मनाभ बिंड यांनी तर पांडुरंग सांगवीकर साक्षात् जिवंत केला आहे. शांत, निवांत खेडय़ातून मोठय़ा, गजबजलेल्या शहराच्या कोलाहलात आल्यावर माणसाला जे एक भांबावलेपण, गोंधळलेपण आणि न्यूनगंडाचे अगणित अॅटॅक्स येऊ शकतात, ते त्यांनी भावनांच्या संमिश्र कल्लोळांतून अत्यंत ताकदीनं व्यक्त केलं आहे. लहान बहीण मनूच्या अकस्मात मृत्यूचा पांडुरंगवर होणारा गडद-गहिरा परिणाम पाहणाऱ्याच्या हृदयाची तार छेडल्याशिवाय राहत नाही. पांडुरंग आणि त्याचा मित्र सुरेश बापट यांनी इ. स. ९००० साली इ. स. २००० सालातील इतिहासाचं केलेलं उत्खनन तर भन्नाटच! माणसामाणसांतील नात्यात भौगोलिक दुराव्याबरोबरच मानसिक-भावनिक अंतरायही कसा निर्माण होत जातो याचं पांडुरंगने केलेलं चिंतन सार्वकालीक म्हणता येईल असंच. तरुणाईतील रग, मस्ती, विजिगीषु वृत्ती, कुठलंही आव्हान अंगावर घेण्याची खुमखुमी, परिस्थितीच्या पेचांना सामोरं जातानाची पांडुरंगची मानसिकता.. असं एकंदर कॅलिडोस्कोपिक चित्र ‘मी, पांडुरंग सांगवीकर’मध्ये उत्कटतेनं प्रत्ययास येतं. आयुष्य जसं आहे तसंच स्वीकारताना, ते प्रत्यक्षात जगताना त्याबद्दलचं सांगवीकरचं चिंतनही मूलगामी आहे. म्हणूनच हा ‘प्रयोग’ (त्यातल्या त्रुटी व उणिवा जमेस धरूनही!) प्रेक्षकाला खिळवून ठेवतो.
प्रणेती कुलकर्णी यांनी बांबूच्या चटयांचं केलेलं ‘मेक बिलिव्ह’ नेपथ्य स्थळनिर्मितीबरोबरच प्रयोगाला वेगळं टेक्श्चरही देतं. प्रकाशयोजनाकार अपूर्व साठे यांनी या लवचीक सेटचा लाजवाब वापर करत प्रयोगाला रस-रंग-गंधित दृक्-अनुभूतीची मिती (डायमेन्शन) दिली आहे. विजय गावंडे यांनी पाश्र्वसंगीताच्या नानाविध तुकडय़ांनी आशयाला उठाव दिला आहे. ऐश्वर्या कुलकर्णी यांनी सत्तरच्या दशकातील होस्टेलमधील मुलांचे पेहेराव यथार्थपणे केले आहेत.
साहित्याच्या रंगाविष्काराचा हा आणखीन एक प्रयोग ‘प्रयोग’ म्हणून का होईना, रसिकांनी आवर्जून पाहावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा