‘अंधाराला अंधाराला, दिशा नाही मेली
ठेचकळ्या आभाळाला, मलमपट्टी केली।।
हात रंगल्याले, शेणाच्या रंगात
कपिलेचा गंध येतो माझ्याही अंगात।।
दारावर लोक येई, कसे माखले ग हात
सांगते मी शेण न्हाई, नवी मेंदीची ही जात।।’
नाटकाच्या प्रारंभीच संत तुकोबांची बायको आवली आपलं दु:ख, आपली वेदना या रचनेतून व्यक्त करते आणि ‘सं. देवबाभळी’चं रूपरंग काय असणार आहे हे स्वच्छपणे आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं.
संत तुकारामांची बायको आवली ही एक खाष्ट, कजाग बाई होती अशी प्रतिमा जनमानसात रुजवली गेली आहे. ‘संगीत देवबाभळी’ने मात्र तिच्या या प्रतिमेला छेद दिला आहे. आपल्या नवऱ्याला नादी लावून संसाराचा इस्कोट करणाऱ्या त्याच्या विठ्ठलाचा तिने राग राग करणं स्वाभाविकच नाही का? त्या त्राग्यातून तिने विठोबाला शिव्याशाप दिल्या तर त्यात गैर काय? किंबहुना, ‘स्त्रीजन्मा.. तुझी ही कहाणी’ हे स्त्रीजातीचं वास्तव आहे, हे ‘देवबाभळी’तही प्रत्यही जाणवत राहतं. आवलीच्या पायात काटा रुतला असता विठुरायानं तो काढला, हा रूढ संदर्भ ‘देवबाभळी’साठी बीजरूपात वापरला गेला आहे. तुकोबांना भंडाऱ्याच्या डोंगरावर भाकरतुकडा घेऊन जाताना आवलीच्या पायात काटा रुततो आणि साक्षात विठुरायाच तो काटा काढतो अशी प्रचलित कथा आहे. तिचा विस्तार करत लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांनी विठोबाची पत्नी रखुमाई हिलाही तीत ओढलं आहे. आणि या दोन्ही स्त्रियांची दु:खं कशी सारखी आहेत आणि त्याकडे पाहायचा त्यांचा दृष्टिकोनही- हे त्यांनी यात मांडलं आहे. एक देवता स्त्री आणि दुसरी मर्त्य मानव. परंतु त्यांची स्त्री म्हणूनची वेदना, जगण्याबद्दलची त्यांची खोल समज आणि त्याकडे पाहण्याची त्यांची दृष्टी यांतून हे नाटय़ घडत जातं. रखुमाईचं दु:खही आवलीपेक्षा वेगळं नाही. तिच्या व्यथा-वेदनेच्या उद्गारांतून ते सहजी उमटतं..
‘राही सवे देवा, सांग काय तुझं नातं
पोरकं पाखरु! राती वसतीला हुतं
आता अबोला अबोला, देवा दिंडीराला जाते
नको करु पाठलाग, रानोमाळी भटकते’
विठ्ठलावर रुसून रखुमाई घराबाहेर पडलीय. दिंडीरवनात ती भटकतेय. परंतु तरीही आवलीच्या पायात काटा रुतल्यावर विठ्ठलाच्या सूचनेवरून ती पोटुशी आवलीची सेवाशुश्रुषा करण्यासाठी तुकोबांच्या घरी कामवाली (लखूबाई) बनून जाते. मात्र, आवली तिन्हीत्रिकाळ विठ्ठलाच्या नावाने शंख करीत असल्याने आणि त्याला शिव्याशाप देत असल्याने तिला ते ऐकवत नाही. जरी ती विठ्ठलावर रुसली असली तरी त्याचा अवमान तिला सहन होत नाही. परंतु तसं स्पष्ट सांगून आवलीवर तिला संतापताही येत नाही. कारण आवली ज्या गोष्टीकरता विठ्ठलाला कोसत असते त्या तिच्या वंचनेला आपला नवराच कारण आहे हेही तिला दिसतंय. आवली एक साधी संसारी बाई आहे. अशात तिचा नवरा संसाराकडे पाठ करून विठुनामाचा गजर करत रानोमाळ भटकत असेल तर कुठली स्त्री ते सहन करील?
रखुमाईचं दु:खही यावेगळं नाहीए. विठ्ठलाला त्याच्या भक्तांची चाकरी करण्यात धन्यता वाटते. त्यांच्यासाठी तो काय वाट्टेल ते करतो. अगदी आताही आवलीच्या सेवेसाठी त्यानंच रखुमाईला लखूबाई बनवून धाडलं आहे. पण आपल्या पत्नीचं- रखुमाईचं दु:ख मात्र तो समजू शकत नाही. आपण त्याच्या खिजगणतीतही नाही, या तीव्र जाणिवेनं ती दुखावली गेली आहे. केवळ नवऱ्याचा शब्द मोडू नये म्हणून ती आवलीची सेवा करतेय. पण तिच्या स्वत:च्या दु:खाचं काय? म्हणूनच तिला आवली आणि आपण समदु:खी आहोत असं वाटतं.
आणि ते खरंच आहे.
या दोन अलक्षित, समदु:खी स्त्रियांना एकत्र आणून लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांनी ‘सं. देवबाभळी’ आकारलं आहे. त्यातून अखिल स्त्रीजातीच्या वेदनेलाच त्यांनी हात घातला आहे. माणसातील देवत्व आणि देवातील माणूसपण त्यांनी यानिमित्ते ऐरणीवर आणलं आहे. आवली आणि लखूबाई यांच्यातील संवाद-विसंवादातून, त्यांच्या स्वगतांतून, पतीशी होणाऱ्या त्यांच्या अप्रत्यक्ष संवादांतून त्यांचं लौकिक-अलौकिकाशी असलेलं नातं आणि जगण्याचं भान नाटककर्त्यांने ‘देवबाभळी’द्वारे सामोरं आणलं आहे. आपल्या घरात कामाला आलेली स्त्री ही विठ्ठलाची पत्नी आहे हे आवलीला माहीत नाही. परंतु तुकोबांनी तिला ‘आई’ म्हटलं म्हणजे ती भली स्त्री असणार याबद्दल तिच्या मनात संदेह नाही. दुसरीकडे लखूबाईला विठ्ठलाची ही नेमकी काय करणी आहे हे आकळत नाही. भक्त आणि त्याच्या कुटुंबीयांच्या वाटय़ाला दुर्दैवाचे दशावतार देऊन त्याला नेमकं काय साध्य करायचंय, हे तिला कळत नाहीए. आपणा दोघींना एकत्र आणण्यात आपल्या नवऱ्यांचा काहीतरी डाव असणार असा तिला संशय आहे. परंतु आपलं रूप उघड करून आवलीला ती खरं काय ते सांगू शकत नाही. त्यामुळे आवली विठोबाला देत असलेले शिव्याशाप निमुटपणे ऐकण्याखेरीज आणि मनोमनी चडफडण्याविना तिला काही करता येत नाही. आवलीनं विठोबाचा शेला आपल्या जखमेवर बांधल्याचा संताप येऊनही ती काही करू शकत नाही. या दोघींच्या आपापल्या नवऱ्याविषयी कितीही तक्रारी असल्या तरी त्याच्याविरुद्ध दुसरं कुणी एक शब्दही काढलेला मात्र त्यांना खपत नाही.
या दोघींच्या संवादांतून, त्यांच्या स्वगतांतून आणि आपापल्या नवऱ्याशी केलेल्या संभाषणांतून नाटय़ाशय पुढे सरकतो. आवली ही हाडामांसाची माणूस आहे. त्यामुळे तिच्या ठायी माणूसपणाचे सगळे गुणदोष असणं साहजिकच. रखुमाई ही स्त्री असली तरी ती एक देवी आहे. तरीही तिच्यात माणूसपणाचे रागलोभादी विकार आहेत. स्त्रीसुलभ दोष आहेत. या दोघींचा व्यावहारिक जगापासून अलौकिकापर्यंतचा प्रवास या नाटकात रेखाटलेला आहे. आवली संसाराच्या व्याप-तापांपायी स्वत:साठी जगायचं विसरली आहे. लखूबाई तिला याची आठवण करून देते. तर आवली एके ठिकाणी लखूबाईला ‘प्रत्येकानं आपल्या आपल्या वाटय़ाचं नांगरत राहावं. पाऊस येवो- न येवो..’ ही जाणीव करून देते. दोघींचा हा प्रवास अत्यंत तरल अन् हृद्य आहे.
लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांचं हे नाटक व्यावसायिक रंगभूमीच्या रूढ चाकोरीशी पूर्णपणे फटकून आहे. जणू मुख्य धारेला पडलेलं हे एक हळुवार, ठाय लयीतलं स्वप्न आहे. कळीचं हळूहळू उमलत फूल व्हावं तसं हे नाटक उलगडत जातं. आशय, विषय, मांडणी आणि विचार यांचं असं अद्वैत फार क्वचित जुळून येतं. काव्यात्म, नादमधुर बोली हे या नाटकाचं एक वैशिष्टय़. तिला एक अंगभूत लय आहे. ताल आहे. तिचं म्हणून एक संगीत आहे. या साऱ्यांचं एकजीव संयुग म्हणजे ‘सं. देवबाभळी’! अवघ्या दोन पात्रांचं हे नाटक असलं (विठोबा आणि तुकाराम हे इथं भासमान स्वरूपात वावरतात.) तरी रंगावकाशात पोकळी जाणवत नाही. या दोघीच ती भरून काढायला समर्थ आहेत. या दोघींत जे काही घडतं ते नेमक्या शब्दांत व्यक्त करायला शब्द थिटे पडतात. ते प्रत्यक्षच अनुभवायला हवं. या नाटकाची ‘रचना’ केली गेली आहे असं बिलकूल जाणवत नाही, इतक्या नैसर्गिकपणे ते फुलत जातं. याचं श्रेय नाटककर्त्यांला जितकं आहे, तितकंच ते सादर करणाऱ्या कलाकारांनाही जातं. प्रदीप मुळ्ये यांनी मुख्य धारा रंगभूमीच्या मर्यादा उल्लंघत तुकोबांच्या घरातलं माजघर, विठोबाचं देऊळ, इंद्रायणीचा घाट, भंडाऱ्याचा डोंगर ही सारी नाटय़स्थळं सूचक नेपथ्यातून साकारली आहेत. एकाच रंगावकाशात कसल्याही विक्षेपाशिवाय ती साकारणं याला कलाकाराकडे सर्जक प्रतिभाच हवी. त्यांच्या दृश्यसंकल्पनेनं नाटकाला एक आगळीच दृश्यात्मकता लाभली आहे.(जी मराठी नाटकांतून गायब असते असा आरोप केला जातो.) प्रफुल्ल दीक्षित यांची ऋतू-प्रहरांचे विविध विभ्रम दर्शविणारी प्रकाशयोजना अप्रतिम. आनंद ओक यांच्या संगीताने नाटकाला एक ठाय, सात्विक लय दिली आहे; जी व्यावसायिक रंगभूमीच्या प्रेक्षकाला सहसा झेपत नाही. परंतु इथं मात्र ती विनातक्रार स्वीकारली गेलीय, हे विशेष. गायक आनंद भाटे यांनी तुकोबांचे अभंग त्यांच्यातल्या पवित्र, सात्विक भावासह अंतर्यामीच्या उत्कटतेतून पोहोचवले आहेत. महेश शेरला यांची वेशभूषा आणि सचिन वारिक यांची रंगभूषा नाटकाला यथार्थता प्राप्त करून देते.
हे नाटक सर्वस्वी समर्थपणे पेललं आहे ते यातल्या दोघा कलाकारांनी. शुभांगी सदावर्ते यांची आवली पाहणं हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. त्यांचं व्यावसायिक रंगभूमीवरचं हे पहिलंच नाटक आहे याची किंचितही जाणीव त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण वावरामुळे होत नाही. गायकीवरील प्रचंड हुकूमत, अभिनयाचे आरस्पानी रंग.. आणि संवादातून गाण्यात त्या कधी शिरतात हे कळतही नाही. आवलीचं लोभस व्यक्तिमत्त्व तिच्या ग्रामीण बोलीसह त्यांनी प्रत्ययकारी केलं आहे. मानसी जोशी यांनी लखूबाई तिच्या घुसमटीसह संयत, परंतु ठामपणे उभी केली आहे. दोघींची संवाद जुगलबंदी त्यातल्या सूक्ष्म खाचाखोचांसह ऐकत राहावीशी वाटते. मानसी जोशी यांचं गाणं शास्त्रीय संगीत बाजाचं असल्यानं त्यात भारदस्तपणा जाणवतो. लखूबाईचं तीव्रतर दु:ख त्या ‘कडेलोटाच्या क्षणापर्यंत पोहचून परत माघारी का फिरायचं ग आपणच?’ या सहज फेकलेल्या वाक्यातून व्यक्त करतात. हे अवघ्या स्त्रीजातीचं दु:ख आहे. त्यावर आवलीनं दिलेलं उत्तरही मननीय आहे : ‘आनी असं रुसल्यावर सोडून जायचं असतं व्हय बये? घरावर रुसून निघून गेले, आनी परत यायची इच्छा झाली तेव्हा घर जागेवर नसलं तर.? मानूस इसरून जाईल इतका अबोला बरा न्हाई आई!’ जगण्याचं सार सांगणारं आणि अलौकिकाच्या पारंब्या हाती देणारं ‘सं. देवबाभळी’ सच्च्या रसिक प्रेक्षकांनी काही केल्या चुकवू नये.