एखाद्या नाटककाराचं नाटक त्याच्या मृत्युपश्चात रंगभूमीवर येऊन त्याने तब्बल शतकभर रसिकांना मोहिनी घालावी, हा चित्तचक्षुचमत्कारिक चमत्कारच म्हणावा लागेल. नाटककार कै. गो. ब. देवललिखित ‘सं. संशयकल्लोळ’ या नाटकानं हे आक्रित घडवून दाखवलं आहे. मुळात देवलमास्तरांचं हे मूळ नाटक नव्हे. फ्रेंच नाटककार मोलियरच्या ‘स्गॅनारेल’ तथा ‘इमॅजिनरी ककोल्ड’ (‘बायकोचा काल्पनिक जार किंवा प्रियकर’) या प्रहसनाचं मर्फी या इंग्रज नाटककारानं केलेलं ‘ऑल इन द रॉंग’ हे रूपांतर प्रथम देवलमास्तरांच्या वाचनात आलं आणि त्यांनी त्यावरून ‘फाल्गुनराव अर्थात तसबिरीचा घोटाळा’ हे गद्य नाटक १८९३ साली लिहिलं. ते तेव्हाच रंगभूमीवरही आलं, परंतु फारसं चाललं नाही. पुढे गंधर्व नाटक मंडळीने त्यांना नव्या नाटकासाठी गळ घातली असता देवलांनी ‘फाल्गुनराव अर्थात तसबिरीचा घोटाळा’ या आपल्या गद्य नाटकात बरेच फेरफार केले. त्याला संगीताची फोडणी देऊन त्यांनी ‘सं. संशयकल्लोळ’ हे नाटक नव्यानं लिहिलं. गंधर्व नाटक मंडळीत अनेक गायक नट असल्याने ‘संशयकल्लोळ’मध्ये पदं समाविष्ट करण्याचं ठरलं. त्यानुसार देवलांनी पदं लिहिलीही; परंतु नाटक रंगमंचावर येण्याआधीच देवलमास्तरांचं १४ जून १९१६ रोजी निधन झालं. त्यानंतर २० ऑक्टोबर १९१६ रोजी हुबळीत ‘सं. संशयकल्लोळ’चा पहिला प्रयोग संपन्न झाला. देवलांचे शिष्योत्तम गणपतराव बोडस यांनी नटांच्या तालमी घेऊन हा प्रयोग बसवला होता आणि त्यात बालगंधर्वानी मघा नायकिणीची मुलगी रेवतीची भूमिका साकारली होती. नाटक कंपनीतील प्रमुख नट मा. कृष्णराव वगळता इतर कलावंतांना या नाटकात भूमिका मिळाल्या. मा. कृष्णरावांनाही नाटकात सहभागी करून घेणं गरजेचं होतं. तेव्हा रेवतीच्या घरातील सत्यनारायणाच्या पूजेच्या प्रसंगात मा. कृष्णरावांच्या संगीत जलशाची योजना करण्यात आली आणि ती भलतीच यशस्वी ठरली. ‘सं. संशयकल्लोळ’ नाटकाला भरतवाक्य नव्हतं. तेव्हा देवलांच्याच ‘विक्रमोर्वशीय’ या नाटकातील ‘चिन्मया सकलहृदया..’ हे भरतवाक्य ‘सं. संशयकल्लोळ’मध्येही तसंच वापरण्यात आलं.
‘सं. संशयकल्लोळ’नं मराठी रंगभूमीवर भरजरी इतिहास घडवला. अनेक दर्जेदार नटसंचांत विविध नाटक कंपन्यांनी त्याचे आजवर हजारो प्रयोग सादर केले आहेत.. अजूनही करीत आहेत. २०१६ साल हे कै. गो. ब. देवल यांचे स्मृतिशताब्दी वर्ष. तसंच ‘सं. संशयकल्लोळ’चंही शताब्दी वर्ष! हे औचित्य अभिनेते-निर्माते प्रशांत दामले यांनी साधले नसते तरच नवल. त्यांनी ‘सं. संशयकल्लोळ’च्या शताब्दी वर्षांत ते पुनश्च व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याची ही सुवर्णसंधी अचूक हेरली. त्यासाठी पं. वसंतराव देशपांडे यांचे गायक (आणि नटही) असलेले नातू राहुल देशपांडे यांना त्यांनी हाताशी धरलं. राहुल देशपांडे यांनी ‘सं. संशयकल्लोळ’चे रंगतदार प्रयोग काही वर्षांमागे तरुण नटसंचात सादर केले होते. निपुण धर्माधिकारी या सर्जनशील तरुण दिग्दर्शकानं त्याची नवी, संकलित रंगावृत्ती तयार करून तो दिग्दर्शितही केला होता. या सगळ्या मंडळींना हाताशी घेऊन निर्माते प्रशांत दामले यांनी रसिकांना पुन:प्रत्ययाचा आनंद देण्याकरिता ‘सं. संशयकल्लोळ’ पुनश्च सादर केलं आहे. जुन्या-जाणत्यांसाठी पुन:प्रत्ययाचा आनंद देणारा, तर नव्या प्रेक्षकांसाठी मराठी रंगभूमीवरील संगीत नाटकांचा मुकूटमणी असलेलं हे नाटक अनुभवण्याची संधी देणारा असा हा प्रयोग. यानिमित्ताने प्रशांत दामले यांचे चाहते आणि संगीत नाटकांचे रसिक यांचं दुहेरी पाठबळ या नव्या ‘सं. संशयकल्लोळ’ला मिळत आहे, हा आणखीन दुग्धशर्करायोग! नाटय़रसिकांच्या आवडीनिवडीची नस देवलमास्तरांना किती खोल अवगत होती याचा प्रत्यय देणारं हे नाटक. प्रेक्षकांचं सोत्कंठ मनोरंजन व्हावं, याच हेतूनं लिहिलेलं. त्यात देवलमास्तर दोनशे टक्के यशस्वी झाले आहेत. यातल्या पात्रांच्या नावांतून नाटककाराचा हेतू स्वच्छपणे ध्यानी येतो. नक्षत्रांची नावं पात्रांना दिल्यानं त्यांचं वास्तवातल्या माणसांशी (नामसाधम्र्यामुळे) असलेलं नातं संपतं. जेणेकरून रसिक बिनघोर ते आपल्यावर बेतलेलं नाही असं म्हणत सानंद नाटक एन्जॉय करू शकतात. असो.
नाटकाचा विषय तसा साधा-सरळच आहे : संशयाच्या कल्लोळामुळे नवरा-बायको, प्रियकर-प्रेयसीच्या नात्यात येणारा अंतराय! बिजवर फाल्गुनरावाला आपली तरुण बायको कृत्तिका हिच्या चालचलणुकीबद्दल सतत संशय येत असतो. त्यापायी तिच्या प्रत्येक कृतीकडे, व्यवहारांकडे तो संशयी नजरेनंच बघत असतो. आपला घरगडी भादव्याला त्यांनी तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं. भादव्या हाही चंटच घरगडी असल्याने कवडीचुंबक फाल्गुनरावांकडून चिरीमिरी उकळून मगच तो त्यांना कृत्तिकाबाईंबद्दलची माहिती पुरवीत असतो. अर्थात खरी! परंतु त्याचे नस्ते धागेदोरे जुळवून फाल्गुनराव बायकोचा संशय घ्यायचा तो घेतातच.
एके दिवशी फाल्गुनराव रस्त्यातून घरी परत येत असता मघा नायकिणीची तरुण मुलगी रेवती उन्हाची तल्खली सहन न होऊन त्यांच्या घरासमोरच भोवळ येऊन कोसळते. ते पाहून फाल्गुनराव तिला आधार देण्यासाठी म्हणून पुढे सरसावतात. हे दृश्य कृत्तिकाबाई खिडकीतून पाहतात. आपल्या नवऱ्याचे ते प्रताप पाहून त्यांच्या अंगाचा तीळपापड होतो. आपला नवरा बाईलवेडा आहे खासच- याबद्दल त्याची खात्रीच पटते.
भोवळ आलेली असताना रेवतीच्या हातून तिच्या प्रियकराची- अश्विनशेठची तसबीर गळून पडते. नेमकी ती कृत्तिकाबाईंच्या हाती लागते. त्यांना त्या तसबिरीतला तरुण, उमदा, रुबाबदार पुरुष आवडतो. असा पुरुष आपल्याला नवरा म्हणून मिळायला हवा होता असं त्यांना मनोमन वाटतं. कृत्तिकाबाई तसबिरीचं निरीक्षण करत असतानाच फाल्गुनराव तिथं येतात. तिच्या हाती कुणा परपुरुषाची तसबीर पाहून त्यांचा संशय आणखीन उफाळून येतो. हा कोण सोदा आपल्या बायकोनं हेरला आहे.. याला शोधून काढून चांगला धडाच शिकवला पाहिजे. ते कृत्तिकेवर विश्वासघाताचा आरोप करतात. कृत्तिकाबाईंनीही फाल्गुनरावांना आपल्या डोळ्यांदेखत अनोळखी तरुणीसोबत जारकर्म करताना पाहिलेलं असतंच. मग काय! दोन्ही संशयात्म्यांचा उद्रेक होतो. दोघंही परस्परांवर विश्वासघाताचे आरोप करतात.
फाल्गुनराव बायकोच्या हातच्या त्या तसबिरीतल्या तरुणाचा गावभर शोध घेत हिंडतात. शेवटी अश्विनशेठ त्यांना सापडतात. रेवती आणि अश्विनशेठ यांची सलगी असलेली बघून ते रेवतीला सावध करतात. ‘हा माणूस माझ्या बायकोचा सोदा आहे..’ असं तिच्या कानी भरवतात. भरीस भर आपण दिलेली आपली तसबीर रेवतीने कुणा परपुरुषाला दिली हे पाहून अश्विनशेठही रेवतीवर संशय घेतात. शब्दाला शब्द भिडून संतापून ते रेवतीचं तोंडही न पाहण्याचा पण करून तिथून निघून जातात. रेवतीही आपला प्रियकर कुणा विवाहित स्त्रीच्या नादी लागलाय, या संशयानं विद्ध झालेली असते. अशा तऱ्हेनं दोन्ही जोडप्यांच्या प्रेमात संशयाचा कली शिरतो..
पुढं अर्थातच हे घोळात घोळ कसे काय निस्तरले जातात, हे नाटकात प्रत्यक्ष पाहणंच उचित. नाटककार देवल यांनी माणसाच्या मनीचा संशय त्याला किती अध:पतित करू शकतो याचं यथातथ्य दर्शन मनोरंजनाच्या अवगुंठनात ‘संशयकल्लोळ’मध्ये घडविण्याचा प्रयत्न केला आहे. नाटकातली गोष्ट त्यांनी छान खुलविली आहे. फक्त अश्विनशेठच्या बाबतीत मात्र त्यांचा संशय रास्त मानावा अशी स्थिती नाही. कारण आपल्या प्रेयसीनं (रेवतीनं) आपली तसबीर परपुरुषाला दिली (?), या क्षुल्लक गोष्टीपायी त्यांनी तिचा संशय घेणं काहीसं न पटणारं आहे. असो. बाकी- हे नाटक रसिकांच्या मनोरंजनासाठीच देवलमास्तरांनी रचलेलं असल्यानं त्याकरता जे जे आवश्यक आहे, ते ते त्यांना नाटकात उत्तमरीत्या साधलं आहे, हे निश्चित.
दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी मूळ ‘संशयकल्लोळ’चं उत्कृष्टरीत्या संकलन-संपादन करून त्याची आजच्या काळास अनुकूल अशी रंगावृत्ती तयार केली आहे. या नाटकाचा ‘यूएसपी’ म्हणजे त्यातले खुसखुशीत संवाद आणि एकाहून एक सरस पदं हे लक्षात घेऊन त्यांनी या दोन्हीला यथायोग्य न्याय दिला आहे. काळानुकूल पाश्र्वसंगाताचं नवं अस्तर त्यांनी गंधार संगोराम यांच्याकरवी नाटकाला दिलं आहे. ‘मृगनयना रसिकमोहिनी’ या पदाला प्रारंभी स्वप्नगीताची ट्रीटमेंट देऊन संगोराम यांनी सुंदर परिणाम साधला आहे. सुवर्णमहोत्सवी प्रयोगाचं औचित्य साधून नाटकातील सत्यनारायणाच्या पूजेच्या प्रसंगात गायक आनंद भाटे यांच्या संगीत जलशाची योजना करून त्यांनी जुन्या संगीत नाटकांच्या सुवर्णयुगाची झलक पेश करत रसिकांना संगीताची वाढीव मेजवानी दिली. आनंद भाटे यांनी ‘नवनवलनयनोत्सवा’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘चिन्मया सकलहृदया’ आदी पदांनी रसिकांचे कर्णसंपुट तृप्त केले. (याबद्दल निर्माते प्रशांत दामले यांनाही धन्यवाद द्यायला हवेत.) ‘हृदयी धरा हा बोध खरा’, ‘सुकान्त चंद्रानना’, ‘मजवरी तयांचे प्रेम खरे’, ‘धन्य आनंद दिन’, ‘कर हा करी धरिला शुभांगी’, ‘हा नाद सोड सोड’, ‘ही बहु चपल वारांगना’, ‘मृगनयना रसिकमोहिनी..’ ही या नाटकातली पदं सदाबहार आहेत यात काहीच संशय नाही. आजच्या तरुण पिढीनेही ‘सं. संशयकल्लोळ’ला भरभरून दाद देत पुनश्च त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. राजीव परांजपे (ऑर्गन) आणि आदित्य पानवलकर (तबला) यांच्या संगीतसाथीचाही यात मोलाचा वाटा आहे. बाबा पार्सेकर यांनी पूर्वीच्या जमान्यातील गुंडाळीच्या रंगवलेल्या पडद्यांऐवजी कटआऊट्स आणि वास्तवदर्शी नेपथ्याच्या मिश्रणातून साकारलेल्या सेटने विविध नाटय़स्थळं उपलब्ध करून दिली आहेत.
फाल्गुनरावांच्या भूमिकेत प्रशांत दामले यांनी आपल्या हातखंडा अभिनयास साजेशी संहितेला थोडीशी मुरड घालून विनोदाची कारंजी आणखीन फुलवली आहेत. पझेसिव्ह बिजवराची सारी लक्षणं त्यांनी मूर्तिमंत वठविली आहेत. आपल्या गात्या गळ्याला मात्र त्यांनी या नाटकात विश्रांती देणं पसंत केलंय. अश्विनशेठ झालेले राहुल देशपांडे यांनी आपण एक उत्तम गायक तर आहोतच; शिवाय उत्कृष्ट अभिनेतेही आहोत हे यात सिद्ध केलं आहे. रेवतीच्या भूमिकेतील उमा पळसुले-देसाई यांनी प्रेयसीची वेदना साकारण्याबरोबरच कृतक अनुरागही छान व्यक्त केला आहे. त्यांच्या गाण्याबद्दल तर प्रश्नच नाही. कृत्तिकाबाईंचा तोरा आणि संशयानं टोक गाठण्याची वृत्ती दीप्ती माटे यांनी फर्मास दाखविली आहे. नचिकेत जोग हे घरगडी भादव्याच्या छोटय़ा कामातही लक्ष वेधून घेतात. नीता पेंडसे यांनी मघा नायकीण आणि मोलकरीण रोहिणी या भूमिकांतले भेद सुस्पष्ट दाखविले आहेत. चिन्मय पाटसकर हेही वैशाखशेठ आणि साधू म्हणून शोभले आहेत.
संगीत नाटकांच्या वानवेमुळे वैशाखवणव्यात होरपळणाऱ्या रसिकांना ‘सं. संशयकल्लोळ’ सुखद गारव्याच्या झुळकीचा प्रत्यय देतं यात शंका नाही.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Suicide girlfriend Nagpur, crime case against boyfriend,
नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा
tarkteerth lakshmanshastri joshi expressed views on marriage age of girls
तर्कतीर्थ विचार : कन्या विवाह वय विचार
Wife can file case of molestation against husband
पत्नी पतिविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करू शकते
actor Imran Khan ex wife Avantika Malik comments on divorce
बालपणीचं प्रेम पण अवघ्या ८ वर्षांत मोडला संसार; बॉलीवूड अभिनेत्याची पत्नी घटस्फोटाबाबत म्हणाली, “जर मी…”
Premachi Goshta Fame Rajas Sule went on trip to new zealand with wife after wedding 19 days
लग्नाच्या १९ दिवसांनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेता ‘या’ देशात गेला फिरायला, पत्नी फोटो शेअर करत म्हणाली…
Youth Addiction, Young Generation, Nagpur Police ,
तरुणांनो प्रेम करा, पण…
Story img Loader