लेखक वसंत सबनीस यांचं १९७४ साली रंगभूमीवर आलेलं ‘सौजन्याची ऐशीतैशी’ हे नाटक ‘चंद्रलेखा’ संस्थेतर्फे नुकतंच पुनश्च रंगभूमीवर आलं आहे.  यानिमित्तानं एक योगायोगही जुळून आलाय. ज्या ‘चंद्रलेखा’च्या ‘ऑल दी बेस्ट’मधून अभिनेते भरत जाधव यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं होतं, त्या मातृसंस्थेच्या नाटय़निर्मितीत त्यांचं पुन्हा एकदा प्रदीर्घ कालखंडानंतर यानिमित्तानं आगमन झालेलं आहे. मात्र, हे लेखक वसंत सबनीसांचं ‘सौजन्याची ऐशीतैशी’ आहे असं म्हणणं धाष्टर्य़ाचं ठरेल. बदललेल्या काळानुरूप सबनीसांच्या नाटकातील केवळ कथाबीज घेऊन ओंकार मंगेश दत्त आणि केदार शिंदे यांनी संपूर्णत: नव्यानंच या ‘सौजन्या..’ची रचना केली आहे. त्यामुळे तिला सबनीसांच्या नाटकाची ‘आधुनिक रंगावृत्ती’ म्हणणंही उचित नव्हे. स्वाभाविकपणेच या नाटकात वसंत सबनीस बहिर्गोल भिंग लावूनच शोधावे लागतात. सबनीसांचा खळाळून हसवणारा मिश्कील, निखळ  विनोद यात औषधालाही नाही. हे खरं तर केदार शिंदे-भरत जाधव या जोडगोळीचं त्यांच्या चाकोरीबद्ध शैलीतलं नाटक आहे. या नाटकाची भिस्त आहे ती केदार शिंदेकृत पीजे, शाब्दिक कोटय़ा, पात्रांच्या लकबी व कृतींची पुनरावर्तनं तसंच शारीर अंगविक्षेपांनी प्रेक्षकाला रिझवू पाहणाऱ्या विनोदावर! त्यामुळे वसंत सबनीसांचं नाव वाचून, त्यांच्या विनोदाची अपेक्षा धरून नाटकाला आलेल्या प्रेक्षकाला साहजिकच निराश व्हावं लागेल. मात्र, ‘सही रे सही’फेम केदार शिंदे-भरत जाधव जोडगोळीचं नाटक म्हणून पाहायला आलेल्या प्रेक्षकाला ते आवडू शकेल.

[jwplayer gSSKhmYu]

Ajit Pawar retirement jibe at uncle Sharad Pawar,
पिंपरी : वडिलधाऱ्यांनी वयाच्या सत्तरीनंतर मुलांकडे जबाबदारी दिली पाहिजे; अजित पवार यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Emergency, Kangana Ranaut, Censor Board,
‘इमर्जन्सी’ चित्रपटातील दृश्यांना कात्री लावण्यास सहनिर्माती कंगना राणावत तयार, सेन्सॉर मंडळाची उच्च न्यायालयात माहिती
Manoj Bajpayee on being stereotyped as middle class No director could think of me as a rich guy experts share ways to deal with rejection
“कोणताही दिग्दर्शक माझा श्रीमंत व्यक्ती म्हणून भूमिकेसाठी विचार करत नाही..”; मनोज बाजपेयींना असे का वाटते? तज्ज्ञांनी केला खुलासा
devara public review
Devara Public Review: प्रेक्षकांना कसा वाटला ‘देवरा: पार्ट १’चित्रपट? प्रतिक्रिया देत म्हणाले, “दिग्दर्शन खूपच….”
PM narendra modi Chandrababu Naidu and Nitish kumar
तिरुपती लाडू भेसळ वाद आणि नितीश कुमारांकडून राम मंदिराचे कौतुक; भाजपाच्या मित्रपक्षांनीही रेटला हिंदुत्वाचा मुद्दा
arvind sawant replied to chandrasekhar bawankule
“उद्धव ठाकरेंना मविआतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे” म्हणणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंना ठाकरे गटाचे प्रत्युत्तर; म्हणाले…
salman khan sangeeta bijlani marriage broke
जिच्यामुळे मोडलं सलमान खान-संगीता बिजलानीचं लग्न, तिनेच सांगितलं ‘त्या’ दिवशी काय घडलं होतं?

वसंत सबनीसांनी एका भांडकुदळ कुटुंबाच्या उपद्व्यापांमुळे संत्रस्त झालेल्या चाळीतील शेजाऱ्यांवर आणि त्यांनी या कुटुंबाला शिकवलेल्या धडय़ावर बेतलेलं हे नाटक. केदार शिंदे यांनी ते चाळीतून (व्हाया रीडेव्हलपमेंट) फ्लॅटमध्ये आणलं आहे. त्यातून इमारतीची लिफ्ट नावाचं एक नवं पात्र या नाटकात जन्माला आलं आहे. त्याकाळी मोबाइल नव्हते. आज आधुनिक तंत्रज्ञानातून लागलेल्या नवनव्या शोधांमुळे प्रत्येकाच्याच हाती मोबाइल आलेला आहे. लोकांची मानसिकता आणि जगण्याची शैलीही कालौघात बदलली आहे. ‘डान्सबार’ ही संकल्पना सत्तरच्या दशकात (बहुधा) अस्तित्वात नसावी. त्यामुळे सबनीसांच्या ‘सौजन्याची ऐशीतैशी’मध्ये बारबाला हे प्रकरण असणं अवघड. मात्र, आज चैनीच्या आणि चंगळवादाच्या कल्पनेत डान्सबार आणि बारबाला या गोष्टी अपरिहार्य ठरल्या आहेत. स्वाभाविकपणेच ‘सौजन्याची ऐशीतैशी’ची नव्यानं रचना करताना नाटककर्त्यांनी या गोष्टी त्यात अधिकच्या समाविष्ट केल्या आहेत. परंतु हे  सारे बदल करताना सबनीसांनाही साक्षीला ठेवल्यानं एक मोठीच गोची झालेली आहे. ती म्हणजे- एखाद्या साध्या खेडुताला जबरदस्तीनं शहरी, झकपक पोशाख घातल्याची भावना नाटक पाहताना सतत जाणवत राहते.

नाटकाची थोडक्यात गोष्ट अशी : गिरणगावामधील चाळीतली जागा विकून दूर उपनगरात राहायला गेलेलं भांडखोर बेरके कुटुंब लॉटरीत पैसे लागल्यानं पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी.. म्हणजे चाळीच्या रीडेव्हलपमेंटमुळे उभ्या राहिलेल्या इमारतीत वास्तव्याला येतं. खरं तर या फ्लॅटसंस्कृतीतल्या देसाई आणि प्रा. मांडलेकरांचा बेरके यांनी घेतलेल्या जागेवर (वेगवेगळ्या कारणांस्तव) डोळा असतो. साहजिकच बेरक्यांना तिथून हुसकावून लावून ती जागा पटकवायचं या दोघांच्या मनात असतं. पण बेरके कुटुंबाच्या भांडकुदळ, आक्रमक वृत्तीपुढे त्यांचं काही चालत नाही. तशात बेरक्यांची पक्या आणि मंदा ही दिवटी मुलं आपल्या उपद्व्यापांनी आणि घरातल्या कर्णकर्कश्श म्युझिकच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाने शेजाऱ्यांना हैराण करत असतात. त्यांच्या या रोजच्या तापामुळे शेजारी बेहाल झालेले असतात. या कुटुंबाला तिथून हुसकावून लावण्यासाठी योग्य संधीची वाट पाहत असतात. त्यासाठी नाना क्लृप्त्या योजत असतात. परंतु बेरके कुटुंबीय त्यांच्या क्लृप्त्यांना पुरून उरतात. शेवटी ‘फोडा आणि झोडा’ या कूटनीतीचा वापर करून हे शेजारी बेरके कुटुंबीयांत फूट पाडतात आणि महावस्ताद श्रीयुत बेरक्यांना एका भयंकर पेचात अडकवतात. त्या बालंटातून सुटका करून घेण्यासाठी एका मित्राने दिलेल्या सल्ल्यानुसार बेरके कुटुंबीय शेजाऱ्यांशी काही काळ (तरी!) सौजन्यानं वागायचं ठरवतात. त्यातून मग जे रामायण घडतं, ते म्हणजे ‘सौजन्याची ऐशीतैशी’ नाटक होय!

वसंत सबनीस यांच्या मूळ ‘सौजन्याची ऐशीतैशी’चं केवळ कथाबीज घेऊन ओंकार मंगेश दत्त आणि केदार शिंदे यांनी हे नवं नाटक रचलं आहे. शिंदेंनीच ते दिग्दर्शित केलं आहे. स्वाभाविकपणेच आपल्या हातखंडा शैलीला अनुसरूनच त्यांनी ते बांधलं आहे. एकापाठोपाठ घडणाऱ्या वेगवान घटना-प्रसंग, नाटकातील पात्रांनी केलेले नाना उपद्व्याप यांतून विनोदनिर्मिती करण्याचा प्रयत्न यात आहे. यापैकी काही विनोद सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणारेच आहेत. ते जसेच्या तसे नाटकात घेण्यात काय हशील? आणखीन एक गोष्ट : केदार शिंदेंना आपल्या सर्वाधिक यशस्वी कलाकृतीतून.. ‘सही रे सही’च्या प्रभावातून अद्याप बाहेर पडता आलेलं नाही, हे या नाटकातल्या पात्रांच्या लकबी आणि विनोदाच्या त्याच त्या विशिष्ट जागांवरून स्पष्ट होतं. सबनीसांच्या नाटकाला नवं अंगडं-टोपरं चढवताना त्यांनी त्याचा संपूर्णपणे कायापालट केलाय असंही झालेलं नाहीए. त्यामुळे झालंय असं, की नाटय़ांतर्गत काळ २०१६ तला आणि विनोदनिर्मितीच्या ढोबळ क्लृप्त्या मात्र सत्तरच्या दशकातल्या- असं काहीतरी विचित्र कॉकटेल या नाटकात झाल्याचं तीव्रतेनं जाणवतं. म्हणजे बघा- बेरके कुटुंबीयांनी सौजन्य सप्ताह पाळायचं ठरवल्यावर घरात त्यांनी जागोजागी सौजन्यपूर्ण वागणुकीसंदर्भातील उक्तींचे फलक लावणं, बेरके कुटुंबाची खोटा नम्रपणा पांघरलेली पन्नाशी-साठीच्या दशकातली संवादभाषा, वगैरे वगैरे. हे नाटक आहे आजच्या काळात घडणारं. पण यातलं बेरके कुटुंब सत्तरच्या दशकातल्या भोळसट क्लृप्त्यांनी शेजाऱ्यांची खासी जिरवतं..! कसं काय बुवा आपण हे पचनी पाडून घ्यायचं? खरं तर नाटकातल्या नाटय़पूर्ण परिस्थितीला संपूर्णपणे आजच्याच विनोदाची फोडणी द्यायला हवी होती. पण तसं करायचं तर ओरिजिनल कथाबीज असायला हवं. पण त्याचीच तर बोंब! म्हणूनच तर सबनीसांना हाताशी धरलंय ना! तर ते असो. या सगळ्या गोंधळामुळे नाटक ना धड कालचं वाटत, ना आजचं.

दिग्दर्शक म्हणून केदार शिंदे यांनी प्रयोग कुठं रेंगाळणार नाही याची दक्षता घेतली आहे. नाटकातल्या सगळ्या पात्रांनी सुरुवातीपासून लावलेला नको इतका चढा सूर कंठाळी वाटतो. त्यापायी विनोदाच्या काही जागा प्रेक्षकाच्या मनात नोंद न होताच पसार होतात. नाटकाचा प्रारंभ या कंठाळी गोंधळापायी नीटसा आकळत नाही. नाटकानं पहिल्या पाच मिनिटांतच समोरच्या प्रेक्षकांना कवेत घेणं आवश्यक असतं. यातल्या पात्रांनी क्रिया-प्रतिक्रिया, प्रतिक्षिप्त क्रियांचं टायमिंग परस्परांना (आणि प्रेक्षकांनाही) दमसासाकरता पुरेसा वेळ देऊन पाळलं असतं तर प्रारंभीचा हा गोंधळ टळला असता.

प्रदीप मुळ्ये यांनी उघडझाक करता येणाऱ्या लिफ्टवाल्या बिल्डिंगचं केलेलं नेपथ्य पात्रांच्या वावरासाठी आवश्यक तो अवकाश मिळवून देतं. शीतल तळपदेंनी प्रकाशयोजनेतून हास्यस्फोटक घटना-प्रसंगांतली रंगत खुलवली आहे. सोनिया परचुरेंचं नृत्यआरेखन, उर्वशी ठाकरेंची वेशभूषा व शरद सावंतांची रंगभूषा नाटकाची मागणी पुरवते. साई-पियुष यांच्या पाश्र्वसंगीताने प्रसंगांतील नाटय़ उठावदार होतं.

हे नाटक खऱ्या अर्थानं तोललं आहे ते कलाकारांनी! यातले मुख्य कलाकार संहितेतील विनोदाच्या जागा खुबीने कशा काढायच्या यात माहीर आहेत. नुसत्या क्ल्यूवर हशे वसूल करण्याची ताकद ते बाळगून आहेत. साहजिकच नाटकाचं अर्धअधिक यश यात निश्चित झालं आहे. भरत जाधव यांनी विनोदाची आपली एक शैली घडवली आहे;  जी ते प्रत्येक नाटकात चोखपणे वापरतात. (तीत फारसं वैविध्य नाही.) वरकरणी साधे, परंतु अंगी नाना कळा असणारे संभावित नाना बेरके त्यांनी अस्खलित उभे केले आहेत. कमलाकर सातपुतेंनी त्यांचे शेजारी मांडलेकर यांचं धमाल अर्कचित्र पेश केलंय. देसाईच्या (बेरक्यांचे गुजराती शेजारी) भूमिकेत कांचन पगारेंनी गुजरात्यांचं मधाळ मराठी बोलणं, पण पोटात स्वार्थभाव, रूद्रावताराचा मुखवटा, परंतु आतलं भित्रटपण असं परस्परविरोधी छापाचं व्यक्तिमत्त्व छान रंगवलं आहे. मयूरेश पेम यांनी या हातावरची थुंकी त्या हातावर तत्परतेनं करणारा पक्या सळसळत्या ऊर्जेनं साकारला आहे. स्मिता गोंदकरांनी गळेपडू बारबालेचा (पारू) ठसका अचूक टिपला आहे. प्रशांत विचारे यांनी बायकी विभाकर, भ्रष्ट म्युनिसिपल ऑफिसर आणि आगाऊ पोलीस इन्स्पेक्टर अशा तिहेरी भूमिकांचं वेगळेपण नीट राखलं आहे. चैत्राली गुप्ते (नानी), परी तेलंग (मंदा), सुकन्या काळण (सुलोचना), विभव राजाध्यक्ष (वसंत) आणि जयराज नायर (सदाशिव) यांनी आपली कामं चोख केली आहेत.

[jwplayer TzwZQwr9]