अलीकडे मराठी रंगभूमीवर अचानक सस्पेन्स थ्रिलर नाटकांचं पेव फुटलं आहे. खरं पाहता मराठी प्रेक्षक हा बहुतांशी कौटुंबिक जिव्हाळ्याच्या आणि सामाजिक नाटकांचा भोक्ता. रहस्यरंजक नाटकांकडे त्याचा ओढा सहसा दिसत नाही. पण गेल्या वर्षभरात या गृहितकाला छेद गेला आहे. अनेक रहस्यनाटय़े एकामागोमाग रंगमंचावर येत आहेत. त्यातली काही यशस्वी झाली आहेत. यशाच्या शोधात असणारे निर्माते बहुधा यामुळेच रहस्यनाटय़ांकडे वळले असावेत. कारणं काहीही असोत; त्यानिमित्तानं अनेक नवी-जुनी रहस्यनाटय़ं मंचित होत आहेत, हे खरं. याच पंक्तीतलं सुरेश जयरामलिखित आणि अरुण नलावडे दिग्दर्शित ‘षडयंत्र’ हे नाटक. पूर्वी ते बडय़ा स्टारकास्टमध्ये येऊन गेलेलं आहे. आता पुनश्च ते आलं आहे.

रहस्यनाटय़ात गुन्हा व गुन्हेगाराचा शोध हाच नाटकाचा गाभा असतो. तो यातही आहेच. मात्र, इथे घडलेल्या गुन्ह्य़ाचा नेमका छडा यात पोलिसांना अखेपर्यंत लागत नाही आणि मग नाइलाजानं या प्रकरणाची फाइल बंद केली जाते. मात्र, निष्णात पोलीस अधिकारी नगरकर या प्रकरणात तर्काधारे जो रिपोर्ट तयार करतात, त्यात त्यांनी त्यांच्या परीने गुन्ह्य़ाचे धागेदोरे जुळवलेले असतात खरे; परंतु त्याबद्दल त्यांना साशंकता असते. शेवटी संशयित आरोपीनेच ते धागेदोरे अचूक असल्याचे सांगितल्यावर त्याची शंका फिटते. असं हे ‘षडयंत्र’चं कथानक!

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार
99 Accused from Nagpur City Tadipaar Assembly Election 2024
निवडणुकीच्या धामधुमीत ९९ आरोपी तडीपार…गेल्या १० वर्षात पहिल्यांंदाच…
drug cartel kingpin lalit patil
चाकणमधील मेफेड्रोन प्रकरण;  खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ; अमली पदार्थ तस्कर ललित पाटील मुख्य आरोपी
Underrated Thriller Movies on OTT
‘अंधाधुन’ पाहिलाय? त्यापेक्षाही जबरदस्त ट्विस्ट असलेले ‘हे’ चित्रपट आहेत OTT वर, वाचा यादी

शुभदा व विकास हे दाम्पत्य बांधकाम व्यावसायिक असतं.  ‘देशमुख कन्स्ट्रक्शन्स’ हा मुळात शुभदाच्या वडलांचा व्यवसाय. पण त्यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या मुलांकडे  (शुभदा व शशांक) तो येतो. पण शुभदाचं विकासशी लग्न झाल्यावर तोच या व्यवसायाचा कार्यभार हाती घेतो. शुभदाला त्यात फारसा रस नसतो. आणि शशांकला सिनेमात संगीतकार म्हणून करिअर करायचं असल्याने तोही त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु सिनेमा क्षेत्रात त्याला जम बसवण्यात यश न आल्याने तो पुन्हा आपल्या वडिलोपार्जित व्यवसायाकडे वळायचं ठरवतो. विकास या व्यवसायात अनेक अनैतिक धंदे करत असल्याने शशांकचा त्याला कडवा विरोध असतो. आता स्वत:च यात उतरायचं ठरवल्यावर तो विकासच्या या धंद्यांना चाप बसवायचं ठरवतो. त्यामुळे संतप्त झालेला विकास आपल्या मार्गातला हा काटा काढण्यासाठी त्याचा खून करतो आणि त्याने आत्महत्या केल्याचा बनाव रचतो. प्रकरण दडपले जाते. भावाच्या आत्महत्येनं शुभदाला प्रचंड धक्का बसतो. त्यातून तिला नाना भास होऊ लागतात. त्यातून तिच्यावर मानसोपचार घ्यायची वेळ येते. आणि विकासला ते हवंच असतं. आपसूक दुसराही काटा त्याच्या मार्गातून दूर होणार असतो.

अशात एके दिवशी कंपनीतील दिवेकर हे जुने सुपरव्हायझर शुभदाला येऊन भेटतात व आपण कंपनी सोडून जात असल्याचं तिला सांगतात. ती त्यांना कारण विचारते तेव्हा विकासच्या हडेलहप्पी काराभाराला आणि अनैतिक उद्योगांना कंटाळून आपण कंपनी सोडत असल्याचं ते तिला स्पष्ट करतात. त्याने शुभदाचे डोळे उघडतात. आपला नवरा काय धंदे करतो आहे याची तिला कल्पना येते. आणि ती कंपनीचा कारभार आपल्या हाती घ्यायचा निर्णय घेते.

दरम्यान विकासने शुभदाचा काटा काढायचा कट रचलेला असतो. याकामी त्याला त्याची मैत्रीण लीना मदत करणार असते..

पण त्यांचा हा बेत तडीस जातो का? यानंतर असं काय घडतं, की ज्यामुळे सगळी परिस्थितीच पालटते?.. या प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष नाटकात शोधणंच इष्ट.

सुरेश जयरामलिखित आणि अरुण नलावडे दिग्दर्शित या नाटकात काही कच्चे दुवे आहेत. शशांकचा आकस्मिक मृत्यू ही आत्महत्या असल्याचं विकासचं म्हणणं पोलीस कसं काय मान्य करतात? शुभदाला आपल्या भावाचे आणि नवऱ्याचे तणावग्रस्त संबंध माहीत असताना तीही त्यावर कशी विश्वास ठेवते? ही केस सहजी फाइलबंद कशी काय केली जाते? पुढे विकासच्या मृत्यू प्रकरणी मात्र त्याचा छडा लावण्यासाठी पोलीस जंग जंग पछाडतात. तेही संशयित व्यक्तीने स्वत: गुन्हा कबूल केलेला असतानाही! या तपासात पुराव्यादाखल सबळ धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत नाहीत. शेवटी या प्रकरणाची फाइल बंद केल्यावर पोलीस अधिकारी नगरकर तर्काधारे बनवलेला तपास अहवाल संशयितास वाचायला देतात. ती व्यक्ती त्या तर्कास दुजोरा देते आणि गुन्ह्य़ाचं रहस्य उलगडतं. या साऱ्या शोध प्रकरणात प्रेक्षकाला काही प्रश्न पडतात. गुन्ह्य़ाचा शोध भरकटलाय हेही जाणवत राहतं. तसंच गुन्हेगार समोर असूनही त्याला ‘क्लीन चीट’ का दिलीय जातेय, हा प्रश्नही पडतो. असो. लेखक सुरेश जयराम आणि दिग्दर्शक अरुण नलावडे यांना मात्र हे प्रश्न पडलेले दिसत नाहीत. त्यांनी अनेक गोष्टी गृहीत धरल्या आहेत. आपल्या नवऱ्याचं आणि भावाचं बिलकूल जमत नाही, हे माहीत असताना शशांकचा मृत्यू ही आत्महत्या असल्याचं शुभदा सहजी स्वीकारू शकेल? इतकी ती भोट आहे? (खरं तर इथंच नाटकातील रहस्याचं पहिलं बीज पडायला हवं.) अर्थात यामुळे पुढे घडणाऱ्या घटनाक्रमावर जरी परिणाम होत नसला तरी रहस्यनाटय़ात प्रत्येक घटनांतून संशयाचे भूसुरुंग पेरले जात असतात. विकासच्या मृत्यूचा तपास करतानाही गलथानपणा होताना दिसतो. अनावश्यक घटना-प्रसंगांमुळे कथानक पुढे सरकण्याऐवजी त्यास खीळ बसते. आजघडीला गुन्हेगारी तंत्र इतकं पुढं गेलंय, की ‘षडयंत्र’मधील रहस्य आणि त्याचा तपास अगदीच फिका वाटतो.

दिग्दर्शक अरुण नलावडे यांनी प्रयोग सुविहित बसवला आहे. तथापि नाटकातील कच्चे दुवे हेरून त्यांनी ते लेखकाकरवी काढून टाकले असते तर प्रयोग अधिक गोळीबंद झाला असता. नेपथ्यकार प्रकाश मयेकरांनी शुभदाचं घर उत्तम उभं केलं आहे. प्रबोध शेटय़े यांनी रहस्यनाटय़ाचं संगीत म्हणजे निव्वळ आघाती पाश्र्वसंगीत असा गैरसमज करून घेतलेला दिसतो. त्यांच्या संगीताच्या ढणढणाटात पात्रांचे संवादही गायब होतात, त्याचं काय? राजन ताम्हाणे यांची प्रकाशयोजना रहस्य गडद करणारी आहे. नाटकाची वेशभूषा पौर्णिमा ओक यांची, तर रंगभूषा राजेश परब यांनी केली आहे.

रमेश भाटकर यांनी यात इन्स्पेक्टर नगरकरांची भूमिका केली आहे. पण त्यांना त्यात करण्यासारखं काहीच नाहीए. सुचित जाधव यांनी थंड डोक्याने नाना उद्योग करणारा विकास साकारला आहे. मानसिक रुग्ण आणि नॉर्मल व्यक्ती या सीमारेषेवरील शुभदा तिच्या दुभंग व्यक्तिमत्त्वानिशी सिया पाटील यांनी ठाशीवपणे उभी केली आहे. सुदेश म्हशीलकरांनी सत्तरच्या दशकातील नाटकांतून असे त्या प्रकारचे दिवेकर हे अर्कचित्रात्मक पात्र वठविले आहे. ऋषिकेश दळी (शशांक), केवलानंद बर्वे (डॉ. गोडबोले), देवेंद्र वाघमारे (अ‍ॅड. परांजपे), वासंतिका चाळके (मनिषा), माधुरी जोशी (लीना) व प्रगती घाणेकर (आशा) हे कलाकार यात अन्य भूमिकांत आहेत.