माणूस एकटा जन्माला येतो आणि जातानाही एकटाच जातो. जन्म आणि मृत्यूच्या दरम्यानच्या काळात ज्या घरात तो जन्मतो तिथली रक्ताची नाती, इतर नातलग, मित्रमंडळी, स्नेहानं जोडलेली माणसं, व्यावसायिक आणि इतर कारणांनी जुळलेले भावबंध यांमुळे त्याचं एकटेपण संपतं. माणसांच्या
एकटेपण व एकाकीपणाच्या या निरनिराळ्या अवस्थांमधल्या तऱ्हा गजेंद्र अहिरे लिखित-दिग्दर्शित आणि श्रीचिंतामणी निर्मित ‘शेवग्याच्या शेंगा’ या नाटकात अनुभवायला मिळतात. ठाय लयीतलं उत्कट जीवनदर्शनच जणू त्यांनी या नाटकाद्वारे घडवलं आहे.
विमलताई बर्वे या एक श्रीमंत विधवा स्त्री. नवरा काही वर्षांमागे वारलेला. एकुलता मुलगा रंजन अमेरिकेत स्थायिक. त्या इथं भल्यामोठय़ा बंगल्यात एकटय़ाच राहतात. घरकाम आणि प्रांगणात लावलेल्या झाडांची निगा राखण्यात त्या आपलं मन गुंतवतात. त्यांचे यजमान सरकारी नोकरीत मलईदार खात्यात बडे अधिकारी होते. अधिकारपदाचा वापर करून त्यांनी प्रचंड पैसा केलेला. त्यामुळे विमलताईंना आज कसलीच ददात नाहीए. आपल्या नवऱ्याने गैरमार्गानं कमावलेल्या संपत्तीचा सर्वतोपरी उपभोग घेताना आपल्याला मात्र एक उपभोग्य ‘वस्तू’ म्हणून वापरलं, आणि या गोष्टीला आपण साधा विरोधही करू शकलो नाही, याची खदखद व खंत विमलताईंना ग्रासून आहे.
आपल्याला सोबत म्हणून विमलताईंनी विनया या तरुण मुलीला आपल्या बंगल्याच्या एका खोलीत पेइंग गेस्ट म्हणून ठेवलंय. मात्र, त्यांनी तिला आपल्या आयुष्यात नस्ती लुडबूड करायची नाही, अशी ताकीदही दिलीय. साहजिकच विनया विमलताईंच्या खासगी बाबींत दखल घेत नाही. विनया आजच्या तरुण पिढीची प्रतिनिधी आहे. आयुष्य रसरसून जगायला तिला आवडतं. तिला राहुल नावाचा एक बॉयफ्रेंडही आहे. करिअरिस्ट. फोकस्ड. पारंपरिक मानसिकतेचा. विनयासारख्या रसरसून आयुष्य जगू इच्छिणाऱ्या मुलीला राहुलचं हे असं असणं क्लेशकारकच आहे. पण तरीही ती त्याच्यावरील प्रेमाखातर शक्यतो त्याच्या कलानं घ्यायचा प्रयत्न करत असते. तरीही अधूनमधून त्यांच्यात रुसवेफुगवे होतातच.
वय उतरणीकडे झुकलेल्या सुधीर ससाणे यांची पत्नी अंजू अचानक गेल्याने ते एकटे, एकाकी झालेले आहेत. त्यांची मुलगी ऋजुता हिचं लग्न झालंय. ती दिल्लीला असते. साहजिकच ते इथं एकटे पडलेत. आजवर कधीच घरातली कामं न केलेल्या त्यांना आता सगळंच करावं लागतंय. त्यानं ते पिचून गेलेत. सोबत वाटय़ाला आलेलं न संपणारं एकटेपण.
तिसरी.. आरती! ती आपल्याला हवं तसं बेफाम, बिनधास्त (पण एकटं) आयुष्य जगतेय. पॉटरीचं कला अंगी असणाऱ्या आरतीचं कधीकाळी लग्नही झालेलं होतं. पण आपल्या पदरी ‘डिफेक्टिव्ह माल’ पडलाय, हे लक्षात आल्यावर तिचं संसाराचं स्वप्न उद्ध्वस्त झालं आणि ते वेगळे झाले. याचा सूड म्हणूनच की काय, तिनं त्यानंतर स्वैर आयुष्याचा मार्ग पत्करला. त्याचाही आता तिला कंटाळा आलाय. एकटेपणा खायला उठतंय. तरीही वरकरणी आपण छान मजेत आहोत असं ती भासवते. स्वत:लाही आणि इतरांनाही. विमलताईंच्या समोरच राहत असल्यानं जाता-येता तिची विनयाशी ओळख झालीय. हळूहळू त्यांच्यात मैत्रीचे धागे घट्ट होत गेलेत. विनयाचे खुले विचार, मनमोकळा दृष्टिकोन आरतीला भावलाय. विनया आरतीच्या बिनधास्तपणाच्या प्रेमात पडलीय. त्यातून त्या दोघी जवळ येतात.
अशी ही वेगवेगळ्या कारणांनी एकटेपण आणि एकाकीपणाचा सामना करणारी माणसं. शेवग्याच्या शेंगा घेण्याच्या निमित्तानं विमलताई व ससाणेंचा परिचय होतो. आणि कारणपत्वे तो वाढत जातो. दोघंही एकटेपणाशी झगडत असल्यानं स्वाभाविकच त्यांच्यात मैत्रीचं नातं अंकुरतं. फोफावतं. परस्परांची सुखदु:खं शेअर करता करता एकमेकांचा एकटेपणाही वाटून घेतला जातो. विमलताईंना त्यांच्या मुलानं- रंजननं कायमसाठी अमेरिकेत बोलवलंय. त्याही उर्वरित आयुष्य नातवंडांत घालवण्यास उत्सुक आहेत. ससाणेंना मात्र त्या गेल्यावर आपण पुन्हा एकाकी होणार, ही भीती सतावतेय. रंजन विमलताईंना न्यायला येतो आणि त्यांच्या लक्षात येतं की, त्याला आपल्यापेक्षा आपल्या इस्टेटीत अधिक रस आहे. तोही बापावर गेलाय हे त्यांना कळून चुकतं. विमलताई त्याच्यासोबत जाण्यास नकार देतात. त्यावरून रंजन ससाणेंच्या घरी जाऊन तमाशा करतो. त्यांनीच तिला फितवलंय असा त्याचा समज होतो. तेव्हा विमलताई आयुष्यात पहिल्यांदाच ठामपणे एक निर्णय घेतात..
आरती आपल्या एकटेपणावर उतारा म्हणून नेटवर आपलं अकौंट उघडून अनेकांशी मैत्री जोडतात. आपला तरुणपणीचा फोटो त्यांनी त्यावर टाकलेला असतो. हे सारे मित्र बाजारबुणगे आहेत हे तिला माहीत असतं. पण त्यांच्याशी चॅटिंग करताना आरतीचा छान टाइमपास होत असतो. परंतु हळूहळू बरेचजण तिला प्रत्यक्ष भेटायचा आग्रह धरतात, तेव्हा ती हादरते. यातून आता कसं सुटायचं तिला कळत नाही. विनया तिला तिचा आत्ताचा फोटो अकौंटवर टाकायला सांगते. तसं करताच सगळे ‘मित्र’ गायब होऊन फक्त दोघेचजण उरतात. त्यातला एक असतो तिचा पूर्वाश्रमीचा नवरा! वास्तवाचं हे दाहक दर्शन आरतीला हादरवतं. अंतर्मुख करतं. विनया तिला वस्तुस्थितीची जाणीव करून देते..
दुसरीकडे विनयाचं राहुलबरोबरचं नातंही डळमळीत झालेलं असतं. त्याच्या कर्मठ विचारांचा, करिअरिस्ट अॅप्रोचचा तिला जाच होऊ लागलेला असतो. तशात राहुलला नव्या प्रोजेक्टसाठी अर्थसाहाय्य देणारी एक तरुणी त्याच्यासमोर लग्नाचं प्रपोजल ठेवते. राहुलला मोठं व्हायचं असतं, प्रचंड पैसा कमवायचा असतो. साहजिकच ही संधी नाकारली तर पुन्हा ती येईल का, असा पेच राहुलला पडतो. विनया शांतपणे विचार करून राहुलला आपल्या बंधातून मोकळं करते..
लेखक-दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी नाटकाची एखाद्या कादंबरीसारखी बहुकेंद्री, बहुपेडी रचना केली आहे. एकाकीपणा हे नाटकाचं मध्यवर्ती सूत्र आहे. अनेक व्यक्तिरेखा, त्यांची भिन्न दिशांची आयुष्यं, त्यांना एकत्र आणणारी परिस्थिती आणि त्यातून त्यांच्यात निर्माण होणारा बंध असा हा व्यामिश्र पट आहे. यातल्या पात्रांची आयुष्यं वरकरणी जरी सुटी सुटी भासत असली तरी आयुष्यानं त्यांना अशा एका वळणावर आणून ठेवलंय, की आपसूकच त्यांच्यात एक समजुतीचं, प्रगल्भतेचं रसायन तयार होत जातं.. जे संवेदनशील प्रेक्षक म्हणून हळूहळू आपल्यातही संक्रमित होत जातं. विनयाच्या नजरेतून आपण यातल्या पात्रांच्या आयुष्यात डोकावतो. त्यांच्याबद्दलची तिची निरीक्षणं प्रत्यक्ष घटिताद्वारे आपल्यासमोर साकार जातात. विनयाची आयुष्य समजून घेण्याची धडपडही त्यातून अलवारपणे उलगडत जाते. अहिरे यांनी सगळ्याच व्यक्तिरेखा अतिशय ठाशीवपणे आकारल्या आहेत. त्या प्रत्येकाचे गंड, त्यांची कमजोरी, त्यांचं माणूसपण यांचा अंत:स्वर पकडण्यात ते यशस्वी झाले आहेत. संहितेतही आणि प्रयोगातसुद्धा! म्हणजे यात बेतीव असं काही नाही असंही नाही. यातलं भाजीवालीचं पात्र हे निमित्तमात्र असलं तरी ते बेतलेलं आहे यात शंका नाही. परंतु नाटकाच्या एकूण ओघात ते अवरोध आणत नाही. अहिरे यांनी नाटकाची ठाय लय शेवटपर्यंत कायम राखली आहे. यातली सगळी माणसं हाडामांसाची आहेत. त्यांचे राग-लोभ, त्यांचे गंड, त्यांच्यापुढचे पेच.. सारंच वास्तववादी आहे. व्यक्तिरेखाटन आणि कलाकार निवडीत गजेंद्र अहिरे यांनी अर्धीअधिक बाजी मारली आहे. यातल्या पात्रांमधील बंध ज्या हळुवारपणे त्यांनी खुलवले आहेत, त्याकरता त्यांना हॅट्स ऑफ! नाटकात काहीशी खटकणारी बाब म्हणजे ससाणेंनी उठसूट अंजूच्या तसबिरीसमोर रडणं, ही होय. (संजय मोनेंसारखा कसलेला कलाकार ही भूमिका साकारत असल्यानंच ते पचनी पडतं.)
नितीन नेरूरकरांच्या नेपथ्यानं गजेंद्र अहिरेंचं काम सोपं केलंय. विमलताईंचा अवाढव्य बंगला, ससाणेंचं छोटेखानी घर, आरतीचा फ्लॅट, समोरचा रस्ता, कॅफेशॉप, बीच अशा विविध स्थळी नाटक घडतं. ही स्थळं एकाच रंगावकाशात निर्माण करण्याचं शिवधनुष्य नेरूरकरांनी लीलया पेललेलं आहे. शीतल तळपदे यांच्या प्रकाशयोजनेचाही यात तितकाच मोलाचा वाटा आहे. नरेंद्र भिडे यांच्या पाश्र्वसंगीतानं नाटकाचा मूड आणि ठाय लय बिनचूक टिपली आहे. तेजश्री आक्रे यांची वेशभूषा आणि सचिन जाधव यांच्या रंगभूषेनं पात्रांना त्यांचं त्यांचं व्यक्तिमत्त्व बहाल केलंय.
भ्रष्ट व स्वैराचारी नवऱ्याकडून झालेल्या उपेक्षेनं, त्यानं आपला ‘वस्तू’ म्हणून केलेल्या वापरानं दुखावली गेलेली, त्याविरुद्ध बंड तर सोडाच; साधा निषेधाचा सूरही त्याच्या हयातीत काढता न आल्यानं स्वत:वरच चरफडत जगणारी, उद्वेग, तडफडाट, आयुष्य वाया गेल्याची चरत गेलेली जखम आणि त्यातून आलेलं कोरडेपण विमलताईंच्या भूमिकेतील स्वाती चिटणीस यांनी सर्वागानं दाखवलंय. या पाश्र्वभूमीवर ससाणेंशी फुलत गेलेलं त्यांचं नातंही तितक्याच नाजूकपणे त्यांनी हाताळलंय. ससाणेंचं बायको गेल्यानं आलेलं असह्य़ एकाकीपण, ते घालवण्यासाठीचे त्यांचे उद्योग, बायकोच्या तसबिरीपाशी मन मोकळं करणं, विमलताईंशी ओळख झाल्यावर त्यांच्या वैराण, नीरस आयुष्यात पुन्हा उमलू पाहणारी हिरवळ आणि विमलताई कायमस्वरुपी अमेरिकेस जाणार या कल्पनेनं त्यांचं व्याकुळ होणं.. हे सारं सारं संजय मोनेंनी अत्यंत उत्कटतेनं व्यक्त केलंय. लग्नाचा कटु अनुभव पदरी पडल्यानं स्वैर, बेधुंद आयुष्य जगण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यानंतरचं आरतीचं मोकाट आयुष्य, त्यातून आलेला बेछुटपणा, तिच्या वरपांगी बिनधास्तपणामागे दडलेलं तिचं एकाकीपण आणि अखेरीस वय व अनुभवानं आलेलं जगण्याचं शहाणपण आतिशा नाईक यांनी आपल्या अवघ्या देहबोलीतून साकारलं आहे. कादंबरी कदम यांची विनया खूप खूप समजूतदार. आयुष्याचा भरभरून आनंद घेण्याच्या विनयाच्या वृत्तीमागे जीवनाबद्दलची तिची एक अत्यंत विचारी, सखोल आणि प्रगल्भ समज आहे. त्यांचा रंगमंचावरील वावरही त्यास अनुकूल उत्फुल्ल, सळसळता असाच! निखिल राऊत यांनी रंजन आणि राहुलच्या व्यक्तिमत्वांतील विभिन्न छटा सहजगत्या आत्मगत केल्यात. सीमा पारकर यांनीही त्यांच्या विविध भूमिका चोख वठवल्या आहेत.
खूप दिवसांनी जगण्याची समज परिपक्व करणारं नाटक ‘शेवग्याच्या शेंगा’च्या रूपानं रंगभूमीवर आलेलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा