यंदा सस्पेन्स थ्रिलर नाटकं उल्लेखनीय संख्येनं मराठी रंगभूमीवर येताना दिसताहेत. आपल्याकडे सस्पेन्स थ्रिलरना प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नाही असा आजवरचा अनुभव असताना हे आक्रित घडतं आहे, हे विशेष. खरं तर सस्पेन्स थ्रिलर नाटक रचणं आणि ते सादर करणं ही सर्वात कठीण गोष्ट असते. रहस्यप्रधान नाटकात बुद्धिगम्य कोडं पेश करून, ते अनपेक्षित वाटा-वळणांनी पुढे नेत, अनपेक्षित, धक्कादायक कलाटणी देत त्या रहस्याची शेवटी तार्किक उकल करावी लागते. मुख्य धारेतील प्रेक्षकाला या नाटकांपेक्षा सामाजिक प्रश्न व समस्यांना भिडणाऱ्या, प्रचलित वास्तवावर भाष्य करणाऱ्या, किंवा मग चार घटका निखळ करमणूक करणाऱ्या विनोदी नाटकांमध्येच जास्त रस असल्याचं दिसून येतं. या पाश्र्वभूमीवर या वर्षी सस्पेन्स थ्रिलर नाटकांच्या लक्षणीयरीत्या वाढलेल्या संख्येमागील रहस्य काय, हे यथावकाश कळेलच. असो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सुयोग’ संस्थेनं ‘तीन पायांची शर्यत’ हे मनोविश्लेषणात्मक अंगानं जाणारं नवं सस्पेन्स थ्रिलर नाटक नुकतंच रंगमंचावर आणलं आहे. रिचर्ड हॅरिस यांच्या ‘द बिझनेस ऑफ मर्डर’ या नाटकाचं हे रूपांतर. अभिजीत गुरू यांनी ते केलं असून, विजय केंकरे यांनी त्याचं दिग्दर्शन केलं आहे. या नाटकाचं वैशिष्टय़ म्हणजे यात गुन्हा आधीच घडून गेलेला नसून, तो अत्यंत थंड डोक्यानं आणि आपल्याला ज्या व्यक्तीला त्यात अडकवायचं आहे तिला त्याकरता बाध्य करून अत्यंत नियोजनपूर्वक घडवला जातो.

राजेंद्र नावाचा एक मध्यमवयीन गृहस्थ मादक द्रव्यांच्या रॅकेटमध्ये अडकलेल्या आपल्या मुलाला त्यातून बाहेर काढण्यासाठी असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस प्रतापकडे मदतीची याचना करतो. पोलिसी जंजाळात न अडकता मुलाची या रॅकेटमधून सुटका व्हावी अशी त्याची इच्छा असते. त्यासाठी तो प्रतापला मोठय़ा मिनतवारीनं आपल्या घरी येण्यासाठी राजी करून त्यानं आपल्या मुलाला पोलिसी खाक्यानं समजवावं अशी विनंती करतो; जेणेकरून तो ताळ्यावर येईल आणि त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचेल. प्रताप त्यानुसार राजेंद्रच्या घरी मुलाला भेटायला येतो खरा; परंतु त्याआधीच तो कुठंतरी गायब झालेला असतो. त्याचा कसलाच अतापता राजेंद्रला माहीत नसल्यानं काही वेळ वाट बघून प्रताप तिथून निघून जातो. थोडय़ा वेळानं राजेंद्रनं बोलावल्यानुसार शलाका देसाई ही गुन्हेगारीकथा-कादंबऱ्या लिहिणारी लेखिका त्याच्या घरी येते. राजेंद्रची बायको तिची जबरदस्त फॅन असते. शलाका देसाईसारखंच आपणही रहस्यकथालेखिका व्हावं अशी तिची मनिषा असते. परंतु कॅन्सरसारख्या दुर्धर रोगानं आजारी असल्याने ती शलाकाला भेटायला जाऊ शकत नाही. त्यामुळे राजेंद्रच त्यांची भेट घडवून आणण्यासाठी शलाकाला घरी बोलावतो. त्यानं तिच्याकडे आपल्या बायकोची रहस्यकथा वाचायला दिलेली असते आणि तिचा अभिप्राय मागितलेला असतो. ती अत्यंत सामान्य कथा असल्याचं शलाका त्याला स्पष्टपणे सांगते. परंतु राजेंद्र त्या कथेवर शलाकाशी चर्चा करता करता ती कशी चांगली आहे हे तिला पटवून देण्याचा प्रयत्न करतो. त्या कथेवर राजेंद्र इतक्या अधिकारवाणीनं बोलत असतो की त्यानंच तर ती लिहिली नसेल ना, असा संशय शलाकाला येतो. बायको भेटायला येईतो राजेंद्र शलाकाला बोलण्यात गुंतवतो. तिच्या लेखनाबद्दल, त्यातल्या कथानकांबद्दल, तिच्या आयुष्याबद्दल तो शलाकाला खोदून खोदून विचारतो. आपल्याबद्दल या इसमाला इत्थंभूत माहिती आहे याची तिला हळूहळू खात्री पटत जाते. बोलता बोलता तो तिला मद्याचे प्याले रिचवायला भाग पाडतो. तिच्या कथेतील गुन्हेगार व गुन्ह्य़ामागच्या त्यांच्या मानसिकतेचा ती कसा विचार करते, तिला संबंधित गुन्ह्य़ांची इतकी तपशिलात माहिती कोण पुरवतं, वगैरे गोष्टी तो तिच्याकडून वदवून घेतो. आणि तिला घोळात घेत आपल्या जाळ्यात अडकवत जातो. या माणसाचा काहीतरी कावा आहे हे शलाकाच्या लक्षात यायला लागतं. तो आपल्या बायकोला भेटवायचं सोडून भलत्याच गप्पा मारतोय हे तिला कळतं. त्याचा यामागे काय हेतू आहे, हे मात्र तिला समजत नाही. त्याची वाढती आक्रमकता पाहता तो आपल्या बाबतीत काहीही करू शकतो याची तीव्र जाणीव तिला होते आणि ती घाबरते. तिथून बाहेर पडू बघते. पण तो तिला जाऊ देत नाही.

एवढय़ात अचानक प्रताप तिथं येतो. शलाकाला तिथं पाहून त्याला आश्चर्याचा धक्का बसतो. तीही प्रतापला तिथं पाहून गोंधळून जाते..

काय असतं या योगायोगामागचं रहस्य? कोण असतो हा राजेंद्र? प्रताप आणि शलाकाला आपल्या घरी बोलावण्यामागे त्याचा काय हेतू असतो?.. अशा अनेकानेक प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष नाटकात शोधणंच इष्ट.

लेखक अभिजीत गुरू यांनी मूळ नाटकाचं एतद्देशीय रूपांतर अत्यंत सफाईदारपणे केलं आहे. या सायको थ्रिलर ड्रामात कुठलाही गुन्हा न घडताही यातली रहस्याची मात्रा मात्र हळूहळू विस्तारत जाते. पात्रांच्या परस्परांशी झडणाऱ्या संवादातून हे घडत जातं. राजेंद्र हे पात्र सुरुवातीपासून त्याच्या वागण्या-वावरण्यातून संशयास्पद असल्याचं ध्यानी येतं खरं; परंतु त्यानं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला आणि एका प्रसिद्ध रहस्यकथालेखिकेला घरी बोलवून त्यांच्याशी का संवाद करावा, याचा बराच काळ आपल्याला अदमास लागत नाही. जेव्हा लागतो, त्यानंतर घटना इतक्या वेगानं घडत जातात, की आपल्याला विचार करायलाही उसंत मिळत नाही. त्यात पुन्हा एसीपी प्रताप आणि राजेंद्र, प्रताप आणि शलाका यांची एकमेकांवर कुरघोडी करण्याची लागलेली स्पर्धा कोणत्या नोटवर संपणार याबद्दलची आपली उत्सुकताही ताणली गेलेली असते. नाटकाचा शेवट तर विलक्षण नाटय़पूर्ण घटनेनं होतो.. जे या नाटकाचं अनवट वैशिष्टय़ आहे. लेखकानं घट्ट विणीनं हे नाटक रचलं आहे. पात्रांचं ठसठशीत रेखाटन, नाटकात घटना फारशा घडत नसल्या तरी संवादांत गुंतवून ठेवत सस्पेन्सचे वळसे वाढवत नेण्याचं कौशल्य लेखकानं दाखवलं आहे.

दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या हाताळणीनं हे रहस्यनाटय़ अधिकच खुललं आहे. पात्रांच्या परस्पर संवादातून, क्रिया, प्रतिक्रिया, प्रतिक्षिप्त क्रियेच्या खेळातून नाटय़ांतर्गत रहस्य वाढत जातं. पात्रांच्या व्यवहारांतून, संवादोच्चारांतील आरोह-अवरोहांतून, त्यातल्या आघातांतून सस्पेन्सचा टेम्पो उत्कर्षिबदूप्रत नेण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे. प्रत्यक्ष खून न होताही त्याच्या केवळ शक्यतेभोवती भिरभिरणारी यातली पात्रं एकमेकांप्रती अविश्वासाच्या फेऱ्यात हळूहळू अडकत जातात आणि एक-दुसऱ्याला त्यात गुंतवायचा प्रयत्न करत राहतात. त्यामुळे कोण कुणावर मात करणार याची उत्कंठाही वाढत जाते.  हा सगळा रहस्याचा खेळ दिग्दर्शकानं सुंदर गुंफला आहे. आता या साऱ्याचा शेवट काय होणार, याचा अंदाज बांधत प्रेक्षक श्वास रोखून बसलेले असतानाच त्यांना पार चकवून अत्यंत धक्कादायक असा शेवट होतो. अन् या चकव्यात फसलेले प्रेक्षकही सुटकेचा नि:श्वास सोडतात.

प्रदीप मुळ्ये यांनी उभं केलेलं राजेंद्रचं रहस्यपूर्ण घर, त्यातल्या नाटय़स्थळांची विशिष्ट रचना या नाटकात महत्त्वाची भूमिका निभावते. भूषण देसाईंच्या प्रकाशयोजनेनं रहस्यमयता जास्तच गडद-गहिरी झाली आहे. राहुल रानडेंच्या आघाती पाश्र्वसंगीतानं आवश्यक ती वातावरणनिर्मिती केली आहे.

यातले सारेच कलाकार अभिनयात तगडे असल्यानं नाटकाचा आलेख चढत्या भाजणीनं उंचावत जातो. विशेषत: रहस्यकथालेखिका शलाका झालेल्या शर्वरी लोहोकरे यांनी दाखवलेली भूमिकेची खोल समज थक्क करणारी आहे. रहस्यकथाकार म्हणून प्रस्थापित होत असताना त्याची नको ती किंमत चुकवावी लागलेली, त्या सापळ्यात अडकल्यानं आयुष्य उद्ध्वस्त झालेली आणि संधी मिळताच त्याचा बदला घेणारी स्त्री त्यांनी प्रत्ययकारीतेनं वठवली आहे. संजय नार्वेकर यांना त्यांच्या नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळी भूमिका यावेळी वाटय़ाला आली आहे. वरपांगी साधा-सरळ वाटणारा, परंतु अत्यंत नियोजनपूर्वक खुनाचा प्लॉट रचून त्यात समोरच्याला अडकवू पाहणारा राजेंद्र त्यांनी संयतपणे, परंतु बुद्धिमानीनं पेश केला आहे. विरामांचा त्यांनी केलेला वापर लाजवाब. अनावश्यक बडबड करणारा, परंतु त्यामागे काहीएक हेतू बाळगून असलेला राजेंद्र कायम अविश्वसनीय वाटत राहील याची खबरदारी त्यांनी घेतली आहे. लोकेश गुप्ते यांना त्यांच्या उपजत व्यक्तिमत्त्वानं करारी, उच्चपदस्थ पोलीस अधिकारी साकारण्यात साहाय्य केलं आहे. पोलिसी खाक्या त्यांच्या बोलण्या-चालण्यातून, वावरण्यातून, सतत सतर्क राहण्याच्या सवयीतून दृग्गोचर होतो. संवादोच्चारांतूनही त्यांनी ते ठसवलं आहे. प्रतिकूल परिस्थितीत शांत डोक्यानं निर्णय घेण्याचा पोलिसी खाक्या आणि समोरच्याची चाल त्याच्यावरच उलटवण्याची तल्लख तत्परता त्यांनी दाखवली आहे. प्रतापची पाताळयंत्री दृष्टी आणि पोलिसी नजर यामुळे ते आपल्या भूमिकेला न्याय देतात. हे बुद्धिगामी रहस्यनाटय़ खिळवून ठेवणारं आहे यात शंकाच नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi natak teen payanchi sharyat review
Show comments