मध्यंतरी मुंबईतील एका बडय़ा हॉस्पिटलमधील किडनी रॅकेटच्या बातमीने जनमानसात मोठी खळबळ उडाली होती. दोन-तीन दिवस त्यावर प्रसार माध्यमांतून चर्वितचर्वण झाल्यावर सरकारने थातुरमातुर कारवाई करून ते प्रकरण यथावकाश शीतपेटीत जाईल अशी व्यवस्था केली. कुठलंही प्रकरण अंगाशी आल्यावर शासनाने एखादी चौकशी समिती वा आयोग नियुक्त करायचा आणि ते प्रकरण अप्रत्यक्षरीत्या फाईलबंद करायचे, ही आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली रीत आहे. त्यामुळे किडनी रॅकेट प्रकरणातही जे घडलं त्यात नवल नाही. लोकही नंतर अशी ‘प्रकरणं’ साफ विसरून जातात. आणि त्यातील आरोपी मोकाट सुटून पुन्हा नव्याने नवे ‘उद्योग’ करायला मोकळे होतात. असो. अशाच एका ‘प्रकरणा’वर बेतलेलं अनिल काकडे लिखित-दिग्दर्शित ‘फायनल डिसिजन’ हे नाटक नुकतंच रंगमंचावर आलं आहे. देहदानाच्या नावाखाली केल्या गेलेल्या कुकृत्याचा पर्दाफाश हा या नाटकाचा विषय आहे. परंतु त्यास परिस्थितीतून निर्माण झालेल्या हतबलतेचा मानवी पदर असल्याने त्याकडे गुन्हा म्हणून पाहताना गुन्हेगाराप्रती सहानुभूतीही निर्माण होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेकदा एखाद्या गुन्ह्य़ाचं वरवरचं स्वरूप आपल्याला त्यासंबंधीच्या बातम्यांतून, त्यावरील माध्यमांतील चर्चातून कळतं, परंतु त्याचे अंतस्थ पदर सहसा सर्वसामान्यांपुढे येतातच असं नाही. किंबहुना, नाहीच येत. गुन्हा आणि तो ज्यांनी केला ते गुन्हेगार- एवढंच वास्तव बहुधा आपल्यासमोर येत असतं. त्यामुळे आपणही त्यावर प्रतिक्रिया देतो ती गुन्हेगाराच्या विरोधातच. आणि तशी ती स्वाभाविकही आहे. पण संबंधित घटनेच्या खोलात गेल्यास कदाचित वेगळंच वास्तव आपल्यासमोर येण्याची शक्यता असते. पण या भानगडीत सहसा कुणी पडत नाहीत. ना लोक, ना माध्यमं, ना शासन.

या नाटकात चाळीत राहणारं एक कुटुंब दाखवलंय. पक्षाघात झालेली आई आणि तिचा अत्यंत संवेदनशील, आईच्या आजाराच्या चिंतेने ग्रासलेला, तिची अविश्रांत सेवा करणारा कर्तव्यपरायण मुलगा.. श्री. ती बरी होण्याऐवजी पुन्हा पक्षाघाताचा तीव्र झटका येऊन ती अंथरुणाला खिळते. त्यामुळे श्री आपलं रेणूशी ठरलेलं लग्न मोडायला निघतो. आपल्या या आजारलेल्या घरात आणून रेणूला आपण सुखी करू शकणार नाही असं त्याचं मन सांगतं. पण रेणू प्राप्त परिस्थिती स्वीकारून त्याच्याशीच लग्न करते. मात्र आजारी आईची कितीही मन:पूर्वक सेवा केली तरी कधीतरी माणूस थकणारच. तसे तेही थकतात. कावतात. रेणूला तर कुठून आपण या नस्त्या यातनाचक्रात अडकलो असं वाटतं. खरं तर श्रीने म्हणूनच तिच्याशी लग्न न करण्याचा निर्णय घेतलेला असतो. पण रेणूने स्वत:हूनच त्याच्या आईच्या आजारापणासह त्याला स्वीकारलेलं असल्याने आताची तिची चिडचिड निर्थक असते. श्रीला तिची घुसमट, तगमग जाणवते. पण तो तरी काय करणार? तशात आई कॉटवरून पडल्याने तिला हॉस्पिटलात दाखल करावं लागतं. हॉस्पिटलच्या प्रचंड खर्चाची तोंडमिळवणी करताना श्रीची पुरती दमछाक होते. अशा संकटात जवळचे नातलगही तोंड फिरवतात. सगळीकडून कर्जाचा डोंगर वाढत जातो. घरात उपाशीपोटी झोपण्याची पाळी येते. सावकार रोज येऊन डोक्यावर बसू लागतो. राहतं घर विकण्याची पाळी येते. या सगळ्या व्यापतापांतून सुटण्याचा एकमेव मार्ग श्रीला दिसतो. तो म्हणजे आईची ऑक्सिजनची नळी काढून टाकून तिला मृत्यू देणं.. जेणेकरून तिची सुटका होईल. आणि मग रेणू व आपण आत्महत्या करायची.. अशा टोकाच्या निर्णयापर्यंत तो येऊन ठेपतो. ..आणि अचानक एक व्यक्ती (राकेश) त्यांच्या घरी येते.. आईच्या मृत्यूपश्चात देहदानाचा प्रस्ताव घेऊन! त्या बदल्यात ७० लाख रुपये देण्याची तयारी तो दाखवतो. आईच्या मरणाचा सौदा करण्याची ती ऑफर असते. त्याने सगळेच प्रश्न सुटणार असतात. आईची आजारपणातून मुक्तता आणि त्याचबरोबर दारिद्र्याच्या खाईत गटांगळ्या खाणाऱ्या त्या घराचं नष्टचर्यही संपणार असतं.

श्री हा प्रस्ताव स्वीकारतो? पुढे काय घडतं? हे सारं प्रत्यक्ष नाटकात पाहणंच उचित ठरेल. लेखक-दिग्दर्शक अनिल काकडे यांनी या नाटकात एका महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे. परिस्थितीपुढे माणूस किती हतबल होतो आणि त्यातून तो कुठल्या टोकाला जाऊ शकतो, हे या नाटकात वास्तवदर्शीपणे दाखवलेलं आहे. मात्र, हे कडूजार वास्तव मांडत असताना त्यांनी अत्यंत सहृदयतेनं यातल्या माणसांकडे पाहिलं आहे. काही वेळा माणसं मुळात वाईट नसतात, परिस्थिती त्यांना गुन्ह्य़ाकडे ढकलत असते आणि नाइलाजानं ती त्यात वाहवत जातात. परंतु त्याने परिस्थिती सुधारण्याऐवजी ती माणसं स्वत:च गोत्यात येतात. लेखक-दिग्दर्शक अनिल काकडे यांनी पहिल्या अंकात माणसाची परिस्थितीवश होणारी ससेहोलपट तपशिलांत रेखाटली आहे. हे करताना त्यातली परिस्थितीजन्य तीव्रता अलवारपणे मांडण्याऐवजी त्यांनी ती काहीशा घिसाडघाईने आणि आक्रस्ताळेपणी मांडली आहे. संकटाच्या खाईतून जाणाऱ्या माणसांची भाव-आंदोलनं अधिक हळुवारपणे हाताळणे त्यांनी गरजेचं होतं. कलाकारांकडून ती अभिव्यक्त होताना त्यातलं गांभीर्य ठसवलं जाईल हेही पाहायला हवं होतं. श्री नोकरीला असतानाही त्यांना पाण्याबरोबर पाव खाऊन पोट भरण्याची आफत का यावी, असा प्रश्न पडम्तो. त्याचबरोबर संवादबंबाळतेचं ग्रहणही पहिल्या अंकाला लागलं आहे. या गोष्टींकडे दिग्दर्शक काकडे यांचं दुर्लक्ष झालं आहे. त्यावर काम झाल्यास हा अंक अधिक गहिरा व परिणामकारक होईल. दुसऱ्या अंकात घडलेल्या गुन्ह्य़ाला अकस्मात वाचा फुटून पोलीस चौकशीचा ससेमिरा संबंधितांच्या मागे लागतो आणि नाटक नाटय़पूर्ण वळण घेतं. हा भाग मात्र चांगला वठला आहे. नाटकातले संहितेमधील कच्चे दुवे काही प्रश्नचिन्हं उभे करतात.

आपल्या मावसभावाशी तत्पूर्वी कुठलाही संबंध नसलेल्या श्रीला अचानक तो कसा गाठतो? श्रीच्या वडिलांच्या पन्नास लाखांच्या विमा पॉलिसीचा मुद्दा रेणू पोलीस चौकशीत पुढे आणते. त्याबद्दलची संदिग्धताही नाटकात नीट उकललेली नाही. विमा पॉलिसीबद्दलचं रेणूचं सांगणं खरं की खोटं? की स्वत:ला वाचविण्यासाठी नवरा-बायकोनं पुढे केलेली ती ढाल असते? असो. असे काही प्रश्न नाटक पाहताना पडतात. त्यांची समर्पक उत्तरं मिळत नाहीत. अनिल काकडे यांनी प्रयोग बसवताना वास्तवाचं यथार्थ दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांना मुख्य धारेतील रंगभूमीवर आपण नाटक सादर करतो आहोत, तेव्हा त्यात रंजनमूल्य असणं गरजेचं आहे, किंवा थोडय़ाफार नाटकीयतेची जोडही आवश्यक आहे असं वाटल्याचं इन्स्पेक्टर आणि हवालदार यांना ज्या प्रकारची ट्रीटमेंट त्यांनी दिली आहे त्यावरून वाटतं. प्रेक्षकानुनयाच्या या मार्गाचा अवलंब करण्याची त्यांना काहीच गरज नव्हती. (निदान अशा गंभीर नाटकात तरी!) असो.

संदेश बेंद्रे यांनी पहिल्या अंकात श्रीचं उभं केलेलं घर वास्तववादी असलं तरी दुसऱ्या अंकात त्याला श्रीमंतीचा वर्ख देताना दिलेलं रूप फारच बटबटीत आहे. यातली गाणीही नाटकाची गरज म्हणून न येता चूस म्हणून आलेली वाटतात.

सर्व कलाकारांनी आपल्या परीनं नाटकातील आशय ठाशीवपणे सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीचं संवेदनशील, काहीसं हळवं व्यक्तिमत्त्व हर्षद अतकिरी यांनी नेमकं टिपलं आहे. त्यातल्या विरामाच्या जागाही त्यांना सापडल्या असत्या तर या पात्राला अधिक खोली प्राप्त होऊ शकली असती. रेणू झालेल्या नैना मुके पहिल्या अंकात अनावश्यक आक्रस्ताळेपणानं व्यक्त होतात. काही जागी भावनांचा ठहराव त्यांच्याकडून अपेक्षित होता. दुसऱ्या अंकात मात्र त्यांनी स्वत:वर काबू मिळवला आहे. हसत-खेळत सावजाला जाळ्यात अडकवणाऱ्या पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत संजय खापरे भाव खाऊन जातात.

ऋषिकेशकुमार दळी यांनी श्रीमंतीचा माज असलेला राकेश त्याच्या बेमुर्वतखोरपणासह अवघ्या देहबोलीतून ठोसपणे उभा केला आहे. स्वप्ना साने, रघू जगताप आणि निलेश गांगुर्डे यांनीही आपली कामं चोख केली आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi natak the final decision
Show comments