जयवंत दळवीलिखित आणि विजया मेहता दिग्दर्शित ‘पुरुष’ हे नाटक १९८६ साली पहिल्यांदा रंगभूमीवर आलं तेव्हा ते अत्यंत वादळी ठरलं होतं. सत्तेच्या बेमुर्वतखोर गुर्मीत आपली विकृत कामवासना शमवण्यासाठी एका तरुण शिक्षिकेवर सरकारी गेस्ट हाऊसवर बलात्कार करणारा यातला पुढारी गुलाबराव आणि पुरुषी विकृतीचे प्रतीक असलेले त्याचे लिंग छाटून त्याला आयुष्यभराची अद्दल घडवणारी बलात्कारित अंबिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. हे नाटक केवळ गुलाबरावच्या पुरुषी वृत्तीचा पर्दाफाश करणारं होतं असं नाही, तर अंबिकेचे गांधीवादी वडील अण्णा, तिचा बंडखोर दलित चळवळीत कार्यकर्ता असलेला प्रियकर सिद्धार्थ, तसंच मथुराचा नवरा बापूराव हेही पुरुषी मानसिकतेचे कसे बळी आहेत, हे दळवींनी नाटकात अधोरेखित केलं होतं. हे नाटक पुरुषांची स्त्रीबद्दलची मनोविकृती आणि पुरुषी दमनकारी मानसिकता यावर सणसणीत कोरडे ओढणारे आहे. परंतु त्याचा या अंगाने व्हायला हवा होता तितका विचार झाला नाही. त्यात मुख्य लक्ष्य ठरला तो फक्त गुलाबराव!
आज या नाटकाला तीस वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. ८० च्या दशकातलं बंदिस्त, साचलेलं भारतीय समाजजीवन आज आमूलाग्र बदललेलं आहे. दरम्यानच्या काळात- १९९१ साली तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी लोकशाही समाजवादाचा पुरस्कार करणारी देशाची अर्थव्यवस्था खुली करून जागतिकीकरणाचा स्वीकार केला. जागतिकीकरण, खासगीकरण आणि आर्थिक उदारीकरणाचे हे धोरण अवलंबिल्यामुळे देशातील आर्थिक, सामाजिक, राजकीय तसेच सांस्कृतिक संदर्भ विलक्षण वेगाने बदलत गेले. ज्याचा भल्याभल्यांना अजूनही अदमास लागलेला नाही. भांडवलशाही, व्यक्तिवादाचा पुरस्कार करणारी ही नवी जीवनप्रणाली आपल्याकडेअद्याप बहुसंख्यांच्या पचनी पडलेली नाही. जागतिकीकरणाचे फायदे तर आपल्याला हवेत; परंतु त्यासोबत येणारी बहुसांस्कृतिकता, सार्वत्रिक सपाटीकरण आणि पाश्चात्य व्यक्तिवादी मूल्ये स्वीकारायची मानसिक तयारी मात्र अजूनही आपली झालेली नाही. त्यामुळे माहिती-तंत्रज्ञानाच्या स्फोटाने आणलेल्या सुखोपभोगांच्या रोलरकोस्टर राइडमध्ये कायम गरगरताना आपलं बरंच काही हरवलं आहे, अशी सततची बोच आपणा सर्वाना लागून राहिलेली आहे.
या पाश्र्वभूमीवर ‘पुरुष’मधील पात्रं आणि आजच्या पुरुषांची मनोवृत्ती यांत काही गुणात्मक बदल झालेला आहे की नाही, याचा धांडोळा घेणं अनाठायी ठरणारं नाही. किंबहुना, आज ते निकडीचंच आहे. हृषिकेश कोळी लिखित आणि दिग्दर्शित ‘वर खाली दोन पाय’ हे नाटक याच मुद्दय़ाला हात घालतं. ‘अस्तित्व’ संस्थेच्या सहयोगाने ‘रंगालय’तर्फे ते नुकतंच रंगमंचावर आलं आहे. खरं तर ‘पुरुष’ नाटकाची झाडाझडती हाही या नाटकाचा एक उद्देश आहेच. त्याचबरोबर त्यातल्या पात्रांचं आपल्या ‘तशा’ असण्याबद्दल नेमकं काय म्हणणं आहे, हेही जाणून घ्यायचा प्रयत्न नाटककर्त्यांनी यात केलेला आहे. दुसरीकडे, आजच्या रंगकर्मीना ते सादर करताना त्याकडे पाहण्याची नवी, अधिक खोल दृष्टी मिळतेय का, हेही तपासण्याचा ‘वर खाली दोन पाय’चा मानस आहे. या नाटकाला चौथा कोनही आहे. तो म्हणजे पात्रं आणि त्यांचे वाहक कलाकार यांच्यातील सहसंबंध! अशा अनेक पातळ्यांवर हे नाटक फिरत राहतं. ‘पुरुष’ नाटकात नसलेला मथुराचा नवरा बापूराव यालाही यात सदेह अस्तित्व देऊन नाटककर्त्यांनी त्याचीही कैफियत मांडली आहे. पण अशा अनेक कंगोऱ्यांना हात घालताना लेखक-दिग्दर्शकाची नाटकावरील पकड मात्र सुटली आहे. आपल्याला नेमकं काय मांडायचंय, काय म्हणायचंय, याबद्दल तो स्वत:च संभ्रमित आहे की काय, असा प्रश्न हे नाटक पाहताना पडतो. कारण आपल्याला नेमकं कशावर ‘फोकस’ करायचंय, याची त्याला स्पष्ट कल्पना दिसत नाही. ‘आधीच्या कलाकारांनी लेखकाने जे लिहिलंय तसंच नाटक सादर केलं, त्या-त्या व्यक्तिरेखेचे कंगोरे शोधायचा त्यांनी प्रयत्नच केला नाही,’ असं यातला दिग्दर्शक एकीकडे म्हणतो. आजच्या कलाकारांनी आपल्या व्यक्तिरेखेचे कंगोरे शोधावेत म्हणून तो त्यांचा पिच्छा पुरवतो. त्यासाठी नाटय़शास्त्राची तांत्रिक चिरफाड करणारा प्रवेशही त्याने योजला आहे. (ज्याची नाटकात बिलकूलच गरज नाहीए.) दुसरीकडे पात्र आणि ते साकारणारे कलावंत यांच्यात काही सहसंबंध वा विसंगतता असू शकते का, हेही तपासण्याचा प्रयत्न गुलाबराव आणि अंबिका साकारणाऱ्या कलाकारांच्या माध्यमातून केला गेला आहे. ‘पुरुष’मधील अंबिकेचे गांधीवादी वडील अण्णा आणि त्यांची सोशीक पत्नी ताराबाई यांच्यातले संबंधही नाटककर्त्यांनी सूक्ष्मदर्शकाखाली धरले आहेत. याच्याच जोडीने ‘पुरुष’मध्ये आपल्या नवऱ्याला ताब्यात ठेवण्याकरता ‘मॉडर्न’ राहणारी मथुरा आज त्याच्या पुढची पायरी गाठताना दिसते. तिचा नवरा बापूराव हाही (जो ‘पुरुष’मध्ये प्रत्यक्षात अवतरत नाही.) या नाटकात सदेह अवतरला आहे. त्याचीही कैफियत आहेच. अंबिकाचा दलित प्रियकर सिद्धार्थ यालाही आपल्यावर अन्याय झालाय असं वाटतं. तोही न्यायाच्या प्रतीक्षेत इथे अवतीर्ण होतो. आपल्या ‘त्या’ कृतीच्या समर्थनार्थ तो जातवास्तवाची चर्चा छेडतो.. जी या नाटकाचं एक आशयकेंद्र आहे. तो अंबिकेला वाऱ्यावर सोडण्याची आपली चूक मान्य करून प्रायश्चित्त म्हणून संन्यस्त जीवन स्वीकारतो. या नाटकात ‘पुरुष’मध्ये गुलाबरावची भूमिका करणारा नट अंबिकेच्या प्रेमात पडला आहे. आणि त्याला गुलाबरावनं तिच्यावर बलात्कार करणं मान्य नाहीए. त्यामुळे ‘तो’ प्रवेश तिथंच थबकतो. गुलाबराव अंबिकेवर बलात्कार करायला तयार नसल्याने प्रयोग पुढे सरकत नाही..
लेखक-दिग्दर्शक हृषिकेश कोळी यांना ‘‘पुरुष’ नाटक आजच्या संदर्भात..’ असं काहीसं ‘वर खाली दोन पाय’मध्ये अपेक्षित आहे. परंतु ही शल्यचिकित्सा करताना आपल्याला नेमकं काय मांडायचं आहे, किंवा म्हणायचं आहे, हे त्यांनी नक्की केलेलं नाही. याचं प्रतिबिंब प्रयोगात उमटलं आहे. सगळे उत्तम गुणवंत कलाकार हाताशी असताना त्यांच्या माध्यमातून आपल्याला नेमकं काय व्यक्त करायचं आहे, हेच जर निश्चित नसेल तर कलाकारांची मेहनतही वाया जाऊ शकते. इथं तुकडय़ा-तुकडय़ांत काही गोष्टी सापडल्यासारख्या वाटतात खऱ्या; पण ते तितपतच राहतं. त्यातून गोळीबंद परिणाम मात्र साध्य होत नाही. सुयोग भोसले व सचिन गोताड यांनी नेपथ्यात सांकेतिक लैंगिकतेचं सूचन केलं आहे. मेंदूशी संलग्न योनीसदृश्य दरवाजा, नग्न स्त्रीदेहाचा अर्धपुतळा, जुनाट टेलिफोन आणि अन्य प्रॉपर्टीच्या उपयोजनेतून प्रयोगाला वेगळं परिमाण मिळालं आहे. पुष्कर कुलकर्णी यांनी संगीतातून व भूषण देसाई यांनी प्रकाशयोजनेतून यातला आशय ठळक केला आहे. उल्हेश खंदारेंची रंगभूषा आणि सायली सोमण यांची वेशभूषा पात्रांना व्यक्तिमत्त्वं प्रदान करते.
व्यक्तिरेखा आणि नट यांच्यात सायुज्य प्रस्थापित न झाल्यामुळे सैरभैर झालेला गुलाबराव- सुशील इनामदार यांनी अस्वस्थ अगतिकतेसह नेटका साकारला आहे. या नाटकात फारसा वाव नसलेल्या अंबिकेच्या भूमिकेत नंदिता धुरी यांच्यासारख्या ताकदीच्या कलावतीला वाया दवडलं आहे. त्यांनी त्यांच्या परीने अंबिकेची भावांदोलनं उत्कटपणे व्यक्त केली आहेत. वृथा वैचारिकतेचा आव आणणारा दिग्दर्शक रोहन गुजर यांनी आवश्यक त्या स्मार्टपणे वठवला आहे. संग्राम समेळ यांनी यातल्या बापूरावला पुरेपूर न्याय दिला आहे. त्याची तगमग, तडफड त्यांनी प्रत्ययकारी केली आहे. तीच गोष्ट पल्लवी पाटील यांची. त्यांनी मथुराचा कालौघातील प्रवास आणि तिचा बोल्डनेस बेधडक दाखवला आहे. सिद्धार्थ झालेल्या अमेय बोरकर यांनी ‘पुरुष’ नाटकात आपल्यावर झालेला अन्याय आणि काळाने कूस बदलली तरी आजही न बदललेलं जातवास्तव अत्यंत तार्किकतेनं व्यक्त केलं आहे. चंद्रकांत मेहेंदळे (अण्णा) आणि स्मृती पाटकर (ताराबाई) यांनी आपापल्या पात्राच्या वर्तन-व्यवहारातला उपहास अन् उपरोध अचूक टिपला आहे. मयुरा जोशी (अभिनेत्री) व अजित सावंत (अभिनेता) यांनीही आपली कामं चोख केली आहेत.