मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही अभिनयाचा ठसा उमटवणारे जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. गेले काही दिवस त्यांची प्रकृती नाजुक होती. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
विक्रम गोखले यांच्या निधनानंतर कलाकार मंडळी भावूक झाली आहेत. अमिताभ बच्चन यांच्यापासून ते मराठीमधील अनेक दिग्गज कलाकारांनी विक्रम गोखले यांच्यासाठी भावूक पोस्ट शेअर केली. नुकत्याच झालेल्या आठवणीतले विक्रम या कार्यक्रमातदेखील दिग्गज कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे. सचिन पिळगावकर म्हणाले, “मला विक्रम गोखलेंच प्रत्येक काम बघून आनंद होतो पण त्याचवेळी मला खंत वाटते, आता येणाऱ्या पिढीला त्यांचा लाईव्ह परफॉर्मन्स पाहता येणार नाही. मी त्यांच्याबरोबर काम केलं याचा मला आनंद आहे.” अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
“२००३ ला मी ऑडिशन…” सिद्धार्थ जाधवने सांगितला ‘तुंबाड’ चित्रपटाबद्दलचा ‘तो’ किस्सा
विलेपार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघाच्या सावरकर पटांगणावर आठवणीतले विक्रम काका या नावाने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विक्रम गोखले यांचे निकटवर्तीय असलेल्या लोकांनी विक्रम गोखले यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. बॉलिवूडमधील कलाकारांनी विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली. बिग बी अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या ब्लॉगमधून विक्रम गोखले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला होता.
विक्रम गोखले यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं तर अभिनयाबरोबरच विक्रम गोखलेंनी लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम केलं होतं. त्यांनी २०१० मध्ये ‘आघात’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले होते. विक्रम गोखले यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा सर्वच माध्यमांमध्ये काम केलं होतं.