‘अस्वस्थ समुद्रावर बैल मेलाय’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिजनांचं अनुकरण करण्यात सामान्यजनांना धन्यता वाटते. अनादि अनंत काळापासून हे चालत आलेलं. आणि यापुढेही निरंतर चालत राहणारं. मानवी प्रगतीचंच हे लक्षण. परंतु बऱ्याचदा होतं काय, की हे अनुकरण आंधळं असतं. आपण नेमकं कशाचं, कुणाचं आणि का अनुकरण करतो आहोत, याची किमान आपल्यापुरती तरी स्पष्टता असायला हवी ना! हे जे अनुकरण आपण करतो आहोत, ते मानसिक, भावनिक, सामाजिक आणि व्यावहारिकदृष्टय़ा आपल्याला झेपणारं आहे का? ते पचवण्याची कुवत आणि क्षमता आपल्यात आहे का? त्यासाठी जी किंमत चुकवावी लागेल, ती चुकवायला आपण तयार आहोत का?.. हे आणि असे प्रश्न सहसा विचारात घेतले जात नाहीत. ‘महाजनो येन गत: स पंथ:’ या उक्तीनुसार केवळ  इतरेजन- ‘जनांचा प्रवाहो’ एखाद्या मार्गाने जातो आहे ना, मग त्याच मार्गानं आपणही जायचं, एवढंच त्यांना माहीत असतं.

आज माहिती-तंत्रज्ञानाच्या विस्फोटामुळे आधुनिकता तुम्हाला स्वीकारायची असो-नसो, ती आपसूक तुम्हाला कवेत घेतेच. हे जसं होताना दिसतं, तसंच सो कॉल्ड आधुनिकतेच्या अट्टहासापायी आपलं मूळ रूप झाकण्याचा, त्याला वरवरचा मुलामा देण्याचा प्रयत्नही माणसाकडून होताना दिसतो. त्यातून अध्र्यामुध्र्या ‘मॉडर्न’ माणसांची फौज निर्माण होते. केवळ शहरांतच नव्हे, तर खेडय़ापाडय़ांतसुद्धा हेच चित्र दिसतं. या सो कॉल्ड मॉडर्न होण्याच्या धडपडीत भेलकांडलेली माणसं अत्र तत्र सर्वत्र पाहायला मिळतात. ना धड आधुनिक, ना धड मागास अशी. या मॉडर्न होण्याच्या भानगडीत माणसांना अनेक दिव्यांतून जावं लागतं. त्यापायी होणारी त्यांची मानसिक, भावनिक, सामाजिक, आर्थिक  तसंच मूल्यात्मक फरफट दयनीय असते. परंतु त्याची त्यांना जाणीव नसते. किंवा असलीच, तरी फार धूसर असते.

लेखक युगंधर देशपांडे लिखित आणि ललित प्रभाकर दिग्दर्शित ‘अस्वस्थ समुद्रावर बैल मेलाय’ या नव्या नाटकाचा हा गाभा! ‘आविष्कार’ संस्थेनं तरुण लेखकांसाठी घेतलेल्या नाटय़लेखन कार्यशाळेत निपजलेलं हे नाटक. शफाअत खान, जयंत पवार आणि प्रदीप मुळ्ये या ज्येष्ठ रंगकर्मीनी या कार्यशाळेत नवे लेखक घडवण्यासाठी मार्गदर्शन केलं. त्यांच्या नाटय़लेखनास योग्य दिशा मिळावी, हा या कार्यशाळेचा हेतू. त्याचं फलस्वरूप म्हणजे सहा नव्या नाटय़संहितांचा जन्म. पैकी ही एक संहिता!

किशोर व संजीवनी हे निमशहरी भागातलं इंजिनीअर झालेलं एक तरुण जोडपं. किशोर मूळचा कोल्हापूरचा; पण पुण्यात शिकलेला. तर संजीवनी पंढरपूरची. सोलापुरात शिक्षण घेतलेली. दोघांच्याही घरात शिक्षित अशी ही पहिलीच पिढी. साहजिकच आपण मोठय़ा शहरात- तेही मुंबईत जावं, चांगली नोकरी मिळवावी, मॉडर्न जगावं अशी दोघांची मनिषा. त्यामुळे मुंबईत नोकरी आणि स्थायिक होणं आलं. ग्रामीण भागातून थेट मुंबईसारख्या गरगरवणाऱ्या महानगरीत आल्यानं त्यांच्यात आपण गावंढळ असल्याचा न्यूनगंड असतोच. तो घालवण्यासाठी ते मुंबईची सो कॉल्ड ‘मॉडर्न’ जीवनशैली आत्मसात करायचा प्रयत्न करतात. मॉडर्न होण्यासाठी मग बोलण्यात इंग्रजी शब्दांची पेरणी, सुट्टीदिवशी मॉलमध्ये शॉिपग, सिनेमा, हॉटेलिंग वगैरे गोष्टी अनिवार्यच. मॉडर्न व्हायचं म्हणजे पर्सनल लाइफ, सेक्स, अफेअर, मद्यपान वगैरेबद्दलचे मॉडर्न आचारविचार आत्मसात करणंही आलंच. उच्चभ्रू स्त्रिया दारू पितात. मॉडर्न व्हायचं तर मग मीही का पिऊ नये, असं संजीवनीचं म्हणणं. किशोरला मात्र तिनं दारू पिणं मान्य नाही. ‘इतकंही मॉडर्न होण्याची गरज नाही. घरचे काय म्हणतील?’ असं तो तिला म्हणतो. किशोरला बिल्डिंगमधली एक सेक्सी बाई खूप आवडते. तिच्याबद्दल त्याला ओढ वाटते. हाही मॉडर्न होण्याचा भाग. यात त्याला काही गैर वाटत नाही. संजीवनीनं तिच्या बॉसबरोबर फ्लर्ट करणं मात्र त्याला आवडत नाही. पण मॉडर्न व्हायचं म्हटल्यावर हेही आलंच, असं संजीवनी म्हणते.

अशात एक भविष्यवेत्ता त्यांच्याकडे येतो. आधी ते त्याला आपला भविष्यावर विश्वास नाही म्हणून सांगून कटवू बघतात. मॉडर्न असून भविष्यावर विश्वास ठेवणं बरं दिसत नाही, म्हणून! पण तो त्यांच्याशी गोड गोड बोलत त्यांच्या भविष्यासंबंधीची काही भाकितं वर्तवतो. त्यानं त्यांची उत्सुकता चाळवते. बढती, पगारवाढ, आलिशान घर, हायफाय जीवनशैली, परदेशयोग, मुलंबाळं यासंबंधीची त्याची भाकितं ऐकून एकीकडे त्यांना बरंही वाटतं आणि त्यातून त्यांच्यात भांडणंही लागतात. आपल्यापेक्षा संजीवनी वरचढ होणार म्हटल्यावर किशोरची  पुरुषी वृत्ती डोकं वर काढते. तो त्या भविष्यवेत्त्याला हाकलून देतो. तरीही तो पुन्हा पुन्हा येत राहतो. त्यांच्या आयुष्यात भविष्यात घडणाऱ्या घटना-घडामोडींबद्दल सांगत राहतो. भविष्यकथनाने ते कधी सुखावतात, तर कधी त्यांच्यात बेबनाव होऊन ते  परस्परांचा द्वेषही करतात.

मागास भागातून शहराच्या विस्तीर्ण अवकाशात येऊ पाहणाऱ्या आणि सो कॉल्ड ‘मॉडर्न’ होऊ बघणाऱ्या; परंतु त्यासाठी जी मानसिक, भावनिक वगैरे तयारी लागते, ती न झालेल्या माणसांची जी ससेहोलपट होते, त्यांच्या वाटय़ाला जे दुभंगलेपण येतं, त्यावर या नाटकात लेखक युगंधर देशपांडे यांनी हसतखेळत भाष्य केलं आहे. आपल्या भावनिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक मर्यादांनिशी ‘मॉडर्निटी’ला झटू पाहणाऱ्या माणसांना ना धड मॉडर्न होता येत, ना मागास जिणं जगता येत. अशी र्अधकच्ची आधुनिकता पत्करणाऱ्यांना तुटलेपण, असुरक्षिततेची भावना, भविष्याबद्दलची अनिश्चितता, भयगंड ग्रासून राहतो. आपलं हे असं कशामुळे झालंय, हे त्यांचं त्यांना कळत नाही. आणि कळलं, तरी वास्तव स्वीकारायची तयारी नसते. मग प्रवाहाबरोबर ते वाहवत जातात. नाती, मूल्यं, माणूसपण साऱ्याचीच फरफट होते. अखेर हाती काय लागतं? तर- जीवघेणं एकाकीपण, तुटलेपण, संभ्रमावस्था! हेच लेखकाला यात मांडायचं आहे. त्यासाठी त्याने लेखनाचा जो फॉर्म निवडलाय त्यात श्याम मनोहरी शैली जाणवते. विशेषत: आजच्या माणसाचं गोंधळलेपण, सैरभैरपण अधोरेखित करताना व्यक्त-अव्यक्ताचा जो खेळ श्याम मनोहर त्यांच्या साहित्यकृतींतून मांडतात, तसाच या नाटकातही मांडलेला दिसतो. नाटकातल्या वरकरणी असंबद्ध वाटणाऱ्या संवादखंडांतून एक आशयसूत्र असल्याचं जाणवतं. मनोपटलावर उधाणलेल्या सागरातील भावभावना आणि विचारांचे कल्लोळ, त्यातली संभ्रमितता, कोंडी, त्यातून बाहेर पडण्याची मनुष्याची केविलवाणी धडपड असं सारं काही यात आहे. मग यात मेलेला बैल कोण? कुठला? या प्रश्नाचं उत्तर ज्याचं त्यानं मिळवावं. आपल्या परीनं.

दिग्दर्शक ललित प्रभाकर यांनी संहितेतील साधं-सरळपण प्रयोगातही उतरेल याची काळजी घेतली आहे. म्हणजे वरकरणी तरी किशोर, संजीवनी आणि तो भविष्यवेत्ता यांच्यातलं बोलणं कुणालाही समजेल असंच आहेत. त्यातून मानवी मनातले दृश्य-अदृश्य खेळ सहज आकळतात. अर्थात नाटकात याहीपलीकडचं बरंच काही अव्यक्तातून व्यक्त झालेलं आहे. जे ज्याचं त्यानं समजून घेणं अपेक्षित आहे. ललित प्रभाकर यांनी त्यासाठीचा अवकाश सादरीकरणात उपलब्ध करून दिला आहे. यातली पात्रं तुमच्या-आमच्यासारखीच सामान्य आहेत. त्यांच्या इच्छा-आकांक्षा सर्वसामान्यांसारख्याच आहेत. अन् ‘मॉडर्न’ होतानाची त्यांची कुतरओढही आपली आहे. हे सारं प्रयोगातून जाणवतं. म्हणूनच नाटक भावतं. नाटकात एके ठिकाणी भविष्यवेत्ता- ‘शिवाजीमहाराज पुन्हा जन्माला आलेत’ किंवा ‘टिळक सार्वजनिक गणेशोत्सवाला सील ठोकणार आहेत’ असं त्यांना सांगतो तेव्हा दोघंही रिअ‍ॅक्ट होत नाहीत. त्याच्या त्या गौप्यस्फोटाकडे ते दुर्लक्षच करतात. कारण त्यांच्या लेखी ‘मॉडर्न’ होण्याशी या महापुरुषांचा काहीच संबंध नाही. सादरीकरणातलं साधेपण ही या नाटकाची ताकद आहे. त्यातून अपेक्षित परिणाम साध्य होतो. समीर-अमोल यांनी पाश्र्वसंगीताचे योजलेले तुकडे यातली नाटय़ात्मकता ठाशीव करतात. सूचक, सांकेतिक नेपथ्य योजून आशयावरून प्रेक्षकाचं लक्ष विचलित होणार नाही याची खबरदारी ललित प्रभाकर यांनी घेतली आहे. डगमगणारा सोपा आणि त्याला कागदी टेकू देऊन तो स्थिर करण्याची धडपड नाटय़ाशय अधिकच गहिरा करते.

विकास पाटील यांनी अंतर्यामी ग्रामीण, पारंपरिक, मागास असलेला, परंतु शहरात येऊन सो कॉल्ड मॉडर्न जीवनशैली आत्मसात करू बघणारा किशोर लाजवाब साकारला आहे. विशेषत: त्याच्या कथनी व करणीतला विरोधाभास त्यांनी ठोसपणे व्यक्त केला आहे. जणू मानवी मनोवृत्तीचा इरसाल नमुनाच. आरती वडगबाळकर यांनीही नाटकाचा सूर बिनचूक पकडला आहे. संजीवनीने मॉडर्न होण्याकरता धारण केलेला उठवळपणा, उच्छृंखल वृत्ती हास्याचे फवारे निर्माण करते. आतून खरं तर मागास, पण वरपांगी मॉडर्न होण्यासाठी आसुसलेली संजीवनी त्यांनी धमाल उभी केली आहे. संजीवनीच्या वागण्या-बोलण्यातला उपहास, उपरोध त्यांनी नेमकेपणी टिपला आहे. नाटकात ‘बिटविन द लाइन्स’ व्यक्त करणं महत्त्वाचं असतं. ते या दोघांनी अप्रतिम पोचवलं आहे. जयेश जोशी (भविष्यवेत्ता) यांनीही त्यांना नेटकी साथ केली आहे.