लष्करी जीवनातील कडक शिस्तबद्धतेबद्दल सर्वसामान्यांना फारच कमी माहिती असते. लष्करी व्यवहार हे सार्वजनिक चर्चेपासून दूर राहतील याची कटाक्षानं दक्षता घेतली जाते. शत्रूपक्षाला आपल्या लष्करी ताकदीची आणि गुपितांची खबर लागू नये यासाठी ती आवश्यकही असते. परंतु तरीही लष्करी सामग्री खरेदीतील घोटाळे, हेरगिरी वगैरे गोष्टी अधूनमधून उघड होतच असतात. त्यात सत्ताधाऱ्यांबरोबरच लष्करी अधिकारीही सामील असल्याचे आढळून येते. परंतु अशा गोष्टी क्वचितच उघड होतात. देशाच्या संरक्षणसिद्धतेतील त्रुटींबद्दल शत्रू अवगत होऊ नये हे त्यामागचे कारण असते. लष्करी जवानांना अत्यंत खडतर प्रशिक्षणाला सामोरे जावे लागते. त्यात त्यांना जराही सूट नसते. अगदीच एखाद्या जवानाला शारीरिकदृष्टय़ा विश्रांतीची निकड आहे असे डॉक्टरांनी प्रमाणपत्र दिले तरच त्याला सूट मिळते. अन्यथा कायम त्यांना तंदुरुस्त व सज्ज राहावे लागते. त्यासाठी कडक नियम व बंधने असतात. ते मोडणाऱ्यांना कशा प्रकारे हाताळायचे याचे वेगळे लष्करी कायदेकानू असतात. लष्करी शिस्त मोडणाऱ्याचा तसेच युद्ध-गुन्हेगारांचा कोर्टमार्शलद्वारे निवाडा होतो आणि त्यांना शिक्षा फर्मावली जाते. सीमेवरील तसेच काश्मीरसारख्या संवेदनशील प्रदेशातील लष्कराला काही ज्यादा अधिकार दिले गेले आहेत. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच दहशतवादी व समाजविघातक शक्तींशी मुकाबला करण्यासाठी ते दिले आहेत. कधीमधी लष्कराकडून त्यांचा गैरवापर होऊ शकतो. अशावेळी मानवाधिकार संस्था त्याविरोधात आवाज उठवतात आणि अशा घटनेची कोर्टमार्शलद्वारे चौकशी होऊन न्यायनिवाडा केला जातो. ज्यादा अधिकारांद्वारे लष्कराला कायद्याचे संरक्षण दिले गेले असेल तर त्यांच्या कारवाईकडे आणीबाणी प्रसंगीची कारवाई म्हणून पाहिले जाते.
लष्करी कायदेकानू कितीही कठोर असले तरी लष्करात नेहमी आलबेल असतं असंही नाही. तिथंही भ्रष्टाचार, गैरव्यवहार, अन्याय, शोषण वगैरे गोष्टी होत असतात. मात्र, त्या दडपल्या जातात, किंवा मग त्याविरुद्ध संबंधितांकडून आवाज उठवला जाणार नाही याची खबरदारी घेतली जाते. अशा गैरप्रकारांना वाचा फोडणारं ‘अ फ्यू गुड मेन’ हे नाटक लेखक अ‍ॅरॉन सॉर्किन या अमेरिकी लेखकानं १९८९ साली लिहिलं आणि ते ब्रॉडवेवर सादर झालं. कायद्याचं शिक्षण घेतलेल्या सॉर्किनच्या बहिणीने अमेरिकन लष्करी न्यायालयात तीन वर्षे सेवा बजावली होती. या दरम्यान तिने त्याला सांगितलेल्या एका कोर्टमार्शलच्या घटनेवर आधारीत हे नाटक आहे. अमेरिकी नौदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करताना नौसैनिकांच्या हातून खुनाचा गुन्हा घडतो. त्याबद्दल त्या नौसैनिकांवर कोर्टमार्शल होतं. यानिमित्ताने कडवी लष्करी शिस्त, त्यासंबंधित कायदेकानू आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणारा त्यांचा अतिरेक वापर याचा त्यात ऊहापोह होतो. शिस्तीचा अतिरेकी बडगा आणि मानवीय दृष्टिकोण यांचा तोल न राखल्याने हकनाक बळी गेलेला एक जीव- यासंबंधी हे नाटक आहे.
हे नाटक नंतर जर्मन भाषेतही रूपांतरित झालं. १९९२ साली त्यावर आधारीत चित्रपटही निघाला. गुजराती रंगभूमीवर सध्या या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. मराठी रंगभूमीवर नुकतंच ‘उडऊए मंत्र’ या नावाने हे नाटक ‘रसिका-अनामिका’ संस्थांतर्फे अवतरले आहे. विजय निकम यांनी त्याचं रूपांतर केलं असून, राजेश जोशी यांनी ते दिग्दर्शित केलं आहे. ‘उडऊए मंत्र’चं हे रूपांतर भारतीय परिप्रेक्ष्यातून करण्यात आलं आहे.
भारतीय सीमेवरील मराठा रेजिमेंटमधील जवान रवी शेलार याला खडतर प्रशिक्षण व कवायती झेपेनाशा झाल्याने त्याने वरिष्ठांकडे आपल्या बदलीची मागणी केलेली असते. परंतु कर्नल प्रतापराव निंबाळकर त्याच्या या मागणीकडे दुर्लक्ष करतात. आपल्या रेजिमेंटची शान अशा दुर्बळ व मानसिकदृष्टय़ा कमकुवत जवानांमुळे कमी होते असे त्यांचे म्हणणे असते. त्याला सख्त प्रशिक्षणाने आणि वेगळ्या मार्गाने (‘कोड मंत्र’- एक प्रकारचे रॅगिंग!) कणखर बनविण्याचे आदेश ते कमांडर शशिकांत जाधव यांना देतात. लेफ्टनंट विनायक थत्ते यांना रवीवर अशा प्रकारे कोड मंत्राचा वापर करणे मान्य नसते. ते तसे करणे कर्नल निंबाळकरांना सांगतातही. कारण खरंच रवी शारीरिक व मानसिकदृष्टय़ा तंदुरुस्त नसतो. परंतु कर्नल निंबाळकर त्यांचा सल्ला धुडकावून लावतात. कमांडर जाधव निंबाळकरांच्या आदेशानुसार रवी शेलारवर कोड मंत्राचा वापर करण्याचे आदेश जवान विक्रमला देतात. त्यानुसार विक्रम त्यांच्या आदेशाची तामिली करत असताना रवीचा मृत्यू होतो. साहजिकच कोर्टमार्शलद्वारे विक्रमवर खुनाचा खटला भरला जातो. योगायोगाचा भाग म्हणजे विशाल हा रवीचा सख्खा भाऊच असतो. विक्रम गुन्हा कबूल करतो. त्यामुळे त्याला शिक्षा होणार हे निश्चित असतं. मात्र, वरिष्ठांनी त्याला कमीत कमी शिक्षा कशी होईल हे आपण पाहू, अशी हमी त्याला दिलेली असते.
रवीची आई सुमित्रा शेलार या लष्करी कायद्यातील एक तज्ज्ञ अहिल्या देशमुख यांची भेट घेऊन त्यांना ‘विक्रमने खून केलेला नाही’ असे सांगून त्याचा बचाव करण्याची विनंती करतात. परंतु विक्रमने स्वत:च गुन्हा कबूल केलेला असल्याने आपण काहीच करू शकत नाही, असे त्या त्यांना स्पष्टपणे सांगतात. तरीही त्यांच्या आत्यंतिक आग्रहामुळे विक्रमची केस समजून घेण्यास अहिल्या देशमुख राजी होतात. तथापि विक्रमच्या भेटीत तो- आपणच रवीच्या मृत्यूस कारणीभूत आहोत, हे कबूल करतो. अहिल्या त्याच्याकडून खोलात जाऊन माहिती काढून घेऊ इच्छितात, परंतु त्यातून काही निष्पन्न होत नाही. मात्र, सरकार पक्षातर्फे वकील म्हणून विश्वास राजेशिर्के हे काम पाहणार आहेत हे कळल्यावर अहिल्याला या प्रकरणात काहीतरी पाणी मुरतंय असा संशय येतो. कारण देशातील एका निष्णात वकिलाला या नगण्य केसमध्ये रस का, असा त्यांना प्रश्न पडतो. मग आपल्या परीने त्या या केसचे खोदकाम सुरू करतात.
आणि..
लष्करी जीवनावर आधारीत नाटक मराठी रंगभूमीवर आजवर अपवादानंच आलेलं आहे. या पाश्र्वभूमीवर संपूर्णत: लष्करी जीवनावर आधारीत ‘कोड मंत्र’सारखं नाटक रंगभूमीवर येणं हा एक सुखद अनुभव आहे. त्यातही लष्करातील कोर्टमार्शल प्रकरण यानिमित्ताने मराठी प्रेक्षकांना प्रथमच अनुभवायला मिळते आहे. अ‍ॅरॉन सोर्किन यांच्या नाटकाचं व्हाया गुजरातीतून आलेलं हे मराठी रूपडं विलक्षण प्रत्ययकारी उतरलं आहे. रूपांतरकर्ते विजय निकम यांना याचं काहीएक श्रेय द्यायलाच हवं. चाळीसेक पात्रांचं हे नाटक सध्याच्या काळात रंगभूमीवर आणण्याचं धाडस करणारे निर्मातेसुद्धा कौतुकास पात्र आहेत.
कठोर लष्करी शिस्तीचा अतिरेक आणि त्यासाठी अवलंबिलेले अनुचित मार्ग या विषयाभोवती हे नाटक गुंफलेलं आहे. कोणत्याही गोष्टीस मानुषतेचा पैलू नसेल तर ती अयोग्यच होय. लष्करी शिस्तीत असा मानवीय दृष्टिकोण परवडणारा नसतो, हे मान्य. परंतु काहीही झालं तरी मानवी जीवन हे नेहमीच श्रेष्ठ आहे आणि पुढेही राहील. मानवाधिकारांचा भंग झाल्यावर जगभर कल्लोळ माजतो तो त्यामुळेच. ‘कोड मंत्र’मध्येही हाच मुद्दा ऐरणीवर आणला गेला आहे. त्यासाठी लष्करातील एका घटनेचा आधार घेतला गेला आहे. यातील नाटय़पूर्ण योगायोगाच्या गोष्टी आणि नाटककर्त्यांनी घेतलेलं नाटय़ात्म स्वातंत्र्य काही क्षण दृष्टीआड केल्यास एक विलक्षण प्रभावी नाटय़कृती पाहिल्याचं समाधान प्रेक्षकास निश्चितपणे मिळतं. अस्सल लष्करी वातावरणनिर्मिती, घटितातील गुंतागत, त्यातले ताणेबाणे, कोर्टमार्शलमध्ये झडणारे चित्तथरारक वकिली युक्तिवाद व पेच, त्यातून होच जाणारी गुन्ह्य़ाची उकल आणि शेवटची मानवीय परिणती.. अशा रोलरकोस्टर राईडप्रमाणे अत्यंत वेगवान घटनाक्रमांतून चढत्या रंगतीने नाटक उंच उंच जातं. दिग्दर्शक राजेश जोशी यांनी लष्करी पेशातील बारीकसारीक तपशील, कर्तव्यपूर्तीच्या ध्यासात लष्कराकडून घडणारे अमानवी वर्तनव्यवहार, त्याची भयावह परिणती आणि त्यावर कडक शिस्तीच्या नावाखाली घातलं जाणारं पांघरुण आणि दडपली जाणारी मानवी मूल्यं.. असा सगळा पट अत्यंत रेखीवपणे आकारला आहे. यथार्थ पात्ररेखाटन हे या नाटकाचं वैशिष्टय़ उन्मेखून नमूद करायलाच हवं. प्रसाद वालावलकर यांच्या सीमेवरील घटनास्थळाच्या त्रिमित नेपथ्याने प्रयोगाला अस्सलता प्राप्त करून दिली आहे. जवानांची परेड, त्यांच्या दिनक्रमातले प्रसंग, तसंच कोर्टमार्शलची धीरगंभीर कार्यवाही यांतून नाटक अधिकच गडद-गहिरं होत जातं. सचिन जिगर यांचं वातावरणपोषक पाश्र्वसंगीत तसंच भौतेष व्यास यांच्या नाटकाचा मूड पकडणाऱ्या प्रभावी प्रकाशयोजनेनं आणि अजय खत्री यांच्या वेशभूषेनं नाटकाच्या परिणामकारकतेत महत्त्वाची भर घातली आहे. लष्करी पेशातील तपशिलांशी जास्तीत जास्त प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न त्यातून जाणवतो.
लष्करी कायद्यातील तज्ज्ञ वकील अहिल्या देशमुखच्या प्रमुख भूमिकेत मुक्ता बर्वे यांनी तल्लख वकिली कौशल्य तर दाखवलं आहेच; त्याचबरोबर मानवी मूल्यांची खंदी पुरस्कर्ती या नात्याने एखाद्या रणरागिनीप्रमाणे विक्रमची बाजू जोरकसपणे मांडली आहे. अर्थात त्याला अहिल्येच्या वैयक्तिक जीवनातील दुखरा सलही कारण आहेच. कोर्टमार्शलदरम्यान फिर्यादी पक्षाचे वकील विश्वास राजेशिर्के यांच्याबरोबर अहिल्येचा झडलेला वकिली मुकाबला अविस्मरणीयच होय. मुक्ता बर्वे यांच्या अभिनय कारकीर्दीतील बहुमानाचा शिरपेच चढवणाऱ्या मोजक्या भूमिकामध्ये ही एक गणली जाईल. अजय पूरकर यांनी रंगवलेले कर्तव्यकठोर कर्नल प्रतापराव निंबाळकर हीसुद्धा अशीच एक दीर्घकाळ लक्षात राहणारी व्यक्तिरेखा. कर्तव्यापुढे कशाचंच भान न राहणारा हा शिपाईगडी. जवानाची अविचल निष्ठा म्हणजे काय असते, याचा रोकडा प्रत्यय देतात- जवान विक्रम शेलार झालेले मिलिंद अधिकारी! अतुल महाजन यांनी लेफ्टनंट विनायक थत्तेंच्या रूपात लष्करी गणवेशातही मानवीयता जपणारा अधिकारी उत्कटपणे साकारला आहे. त्यांच्या अवघ्या देहबोलीतूनही ते जाणवतं. वरिष्ठांच्या आदेशांचे आंधळेपणाने पालन करणारे कंपनी कमांडर शशिकांत जाधव- उमेश जगताप यांनी वास्तवदर्शीपणे उभे केले आहेत. विक्रम गायकवाड (सरकार पक्षाचे वकील विश्वास राजेशिर्के), स्वाती (सुमित्रा शेलार), कौस्तुभ दिवाण (अहिल्येचे वकील पती), अमित जांभेकर (बलविंदर सिंग), अजय कासुर्डे (डॉ. गोखले), फैज खान (रवी शेलार/अवतार सिंग), संजय महाडिक (न्यायाधीश), संजय खापरे (कमांडो) यांनीही धडाडीने आपल्या भूमिका निभावल्या आहेत. अन्य जवानांनीही आपल्या कामात सर्वस्वानं प्राण ओतले आहेत.
‘कोड मंत्र’ पाहिल्यानंतर एक विलक्षण थरारक नाटय़ अनुभवल्याची जाणीव सोबत घेऊनच आपण घरी परततो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रवींद्र पाथरे

रवींद्र पाथरे