मराठी रंगभूमीवर चर्चेत असलेल्या नाशिकमधील दत्ता पाटील लिखित आणि सचिन शिंदे दिग्दर्शित ‘गढीवरच्या पोरी’ या नाटकाला झी नाटय़ गौरवसाठी लेखन, अभिनय, वेशभूषा व विशेष नाटक म्हणून चार विभागात तब्बल आठ नामांकने जाहीर झाली आहेत.
प्रायोगिक नाटकासाठी असलेल्या नामांकनात सवरेत्कृष्ट लेखक म्हणून दत्ता पाटील, सवरेत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री म्हणून या नाटकातील पाचही अभिनेत्रींना म्हणजे दीप्ती चंद्रात्रे, मयूरी मंडलिक, नूपुर सावजी, श्रद्धा देशपांडे आणि मोहिनी पोतदार यांना नामांकने जाहीर झाली आहेत. वेशभूषेसाठी याच नाटकाने बाजी मारली असून सारिका पाटील यांना नामांकन आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, ‘विशेष लक्षवेधी सांघिक प्रयत्न’ यासाठीही गढीवरच्या पोरी या नाटकाने नामांकनात बाजी मारली असून या गटात एकाच नाटकाचे नामांकन झाले आहे. विलक्षण विषय, कसदार लेखन, सकस आणि दर्जेदार दिग्दर्शन, उच्च दर्जाचा अभिनय यामुळे गेल्या काही महिन्यांपासून हे नाटक चर्चेत आहे. मराठी प्रायोगिक रंगभूमीवरील एक महत्त्वाचे समकालीन नाटक म्हणून त्याकडे पाहिले जाते. झी नाटय़ गौरव नामांकनातील हा विक्रम असून इतकी नामांकने मिळविणारे नाशिकच्या रंगभूमीच्या इतिहासातील हे पहिलेच नाटक आहे. यापूर्वीही दत्ता पाटील व सचिन शिंदे या जोडीला ब्लॅकआऊट, बगळ्या बगळ्या कवडी दे या नाटकांसाठी झी गौरव मिळाले आहेत. मराठी रंगभूमीवर हे नाटक आपले वेगळेपण सिद्ध करणार याबद्दल खात्री होती. लेखनातील वेगळा प्रयोग रंगभूमीवर आणणे आव्हानात्मक होते. या प्रयत्नांची मोठय़ा पातळीवर दखल घेतली गेल्याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया शिंदे यांनी व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा