दिवंगत प्रा. डॉ. सरोजिनी वैद्य यांनी लिहिलेल्या ‘कहाणी लंडनच्या आजीबाईंची’ या पुस्तकावर आधारित राजीव जोशी यांनी लिहिलेले ‘लंडनच्या आजीबाई’ हे द्विपात्री नाटक याच महिन्यात रंगभूमीवर दाखल होणार आहे. ३१ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत नाटकाचे प्रयोग लंडन आणि ब्रिटन येथे होणार आहेत. अभिनेते अशोक सराफ व त्यांचे बंधू सुभाष सराफ यांनी त्यांचे मामा गोपीनाथ सावकार कलामंदिर या नाटय़संस्थेचे पुनरुज्जीवन केले असून या संस्थेतर्फे हे नाटक सादर होणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी या नाटकात प्रमुख भूमिकेत आहेत.
१९५० च्या दशकात राधाबाई वनारसे (पूर्वाश्रमीच्या राधा डोमाजी डहाके) या लंडनला गेल्या आणि घरकाम करता करता त्यांनी भारतातून तिकडे गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘आजीबाईंची खानावळ’ सुरू केली. पुढे काही वर्षांनी ही खानावळ तेथील सामाजिक व सांस्कृतिक केंद्र बनले. या राधाबाई वनारसे यांच्या जिद्दीची ही कहाणी सरोजिनी वैद्य यांनी ‘कहाणी लंडनच्या आजीबाईं’ची या पुस्तकातून मांडली होती. राजहंस प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले होते. पुस्तकाची पहिली आवृत्ती २४ सप्टेंबर १९९६ मध्ये प्रकाशित झाली होती. आजवर पुस्तकाच्या आठ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.
‘लंडनच्या आजीबाई’ हे नाटक दोन पात्रांचे असून आजीबाईच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी असून दीर्घकालावधीनंतर त्यांचे रंगमंचावर पुनरागमन होत आहे. नाटकाचे दिग्दर्शन संतोष वेरुळकर यांनी केले असून उषा नाडकर्णी यांच्यासमवेत वेदांगी कुलकर्णी ही युवा अभिनेत्री यात आहे. स्मिता सराफ या निर्मात्या असून सुभाष सराफ व जुईली शेंडे हे कार्यकारी निर्माते आहेत.
नाटकाचा मुहूर्त नुकताच पार पडला. या वेळी बोलताना अशोक सराफ म्हणाले, माझे मामा गोपीनाथ सावकार यांच्या नाटय़संस्थेचे पुनरुज्जीवन करायचे होते. संस्थेतर्फे नव्याने नाटक सादर करण्यासाठी वनारसे आजींची ही कहाणी आम्हाला आवडली आणि आम्ही हे नाटक करायचे ठरविले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा