‘.. के दिल अभी भरा नहीं!’

एखाद्या नाटकावर आधीच्या कलाकारांनी आपला अमीट ठसा उमटवलेला असेल तर त्या नाटकाचं आव्हान पेलण्याचं धाडस नंतर दुसरे कलावंत सहसा करत नाहीत. याचं कारण : आधीच्या कलावंतांशी आपली तुलना होणार, हे तर असतंच; शिवाय आपण कितीही उत्तम काम केलं तरी ते दुर्लक्षिलं जाणार, ही (सार्थ) भीतीही असते. आणि आधीच्या कलावंतांनी त्या नाटकातील सगळ्या शक्यता आजमावून पाहिल्या असतील तर त्यात नवं काही करून दाखवण्याची संधीही दुरापास्तच असते. बरं, ते नाटक नव्याने बसवताना दिग्दर्शकही त्यात आशयानुकूल वा हाताळणीतले बदल करू धजत (वा इच्छित) नाही. कारण.. पुन्हा तेच : प्रेक्षक ते स्वीकारतील का? आणि समजा, एखाद्या दिग्दर्शकाने तसे केले, तरी जाणकार व प्रेक्षकांकडून ते दुर्लक्षिले जातात. मग कशाला करा ही व्यर्थ मरमर?

असं असतानाही शेखर ढवळीकर लिखित आणि मंगेश कदम दिग्दर्शित ‘..के दिल अभी भरा नहीं!’ हे नाटक वेद प्रॉडक्शनतर्फे पुन्हा रंगभूमीवर आलं आहे. विक्रम गोखले आणि रीमा यांच्या संस्मरणीय भूमिकांमुळे रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या या नाटकाचे प्रयोग विक्रम गोखले यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव मधेच थांबवावे लागले होते. परंतु प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद असलेल्या या नाटकाचे प्रयोग असे मधेच थांबवणं निर्माते गोपाळ अलगेरी यांना उचित वाटलं नाही. त्यांनी संबंधितांशी चर्चा करून नाटकाचे नव्या कलावंतांसह पुन्हा  प्रयोग सुरू करायचं ठरवलं. दिग्दर्शक मंगेश कदम आणि त्यांची अभिनेत्री पत्नी लीना भागवत यांची रंगमंचीय केमिस्ट्री उत्तम जुळलेली आहे, हे ‘गोष्ट तशी गमतीची’च्या यशामुळे त्यांच्या लक्षात आलं होतं. साहजिकच त्यांनी या जोडीला ‘..के दिल अभी भरा नहीं!’तील प्रमुख भूमिका करण्याची गळ घातली. लीना भागवत या एक सशक्त, चतुरस्र अभिनेत्री आहेत, हे सिद्ध झालेलं आहेच. ‘अधांतर’, ‘रज्जो’, ‘अशी पाखरं येती’, ‘तन-मन’मधील गंभीर भूमिकांतून, तसंच ‘गोष्ट तशी गमतीची’त त्यांची विनोदी अभिनयाची ताकद रसिकांनी अनुभवली आहे. मंगेश कदम यांनीही दिग्दर्शनाबरोबर आपण एक उत्तम अभिनेते आहोत, हे रसिकांच्या मनावर ठसवलं आहेच. त्यामुळे या जोडीची प्रमुख भूमिकांसाठी निवड करण्यात आली.

पती-पत्नीच्या नात्यातले सांसारिक ताणतणाव, त्यातून परस्परांबद्दल निर्माण झालेल्या गाठी, निरगाठी, अढी, त्यात आणखी कुटुंबीयांबरोबरच्या त्या दोघांच्या नातेसंबंधांनी घातलेली अधिकची भर.. अशी चक्रवाढ व्याजगतीनं वाढत गेलेल्या ताणाचा कधीतरी स्फोट होणार, हे ठरलेलंच. वंदना आणि अरुण नगरकर या दाम्पत्यामध्ये अशाच वर्षांनुवर्षे साचत गेलेल्या अव्यक्त दुखण्यांचं गळू हळूहळू पिकत जातं.. आणि आयुष्याच्या संध्याकाळी मावळतीची किरणं अंगावर आली असताना अचानक ते फुटतं. अरुण नगरकरांसाठी हा मोठाच धक्का असतो. परिस्थितीशी दोन हात करत स्वनिर्मित कारखान्याचे मालक बनलेल्या अरुण नगरकरांना घरात फारसं लक्ष देता येत नाही. टिपिकल भारतीय पुरुषी मानसिकतेच्या नगरकरांना त्यात काही गैरही वाटत नाही. वंदना सगळं घर, संसार मोठय़ा निगुतीनं सांभाळते. परंतु आपल्याला या घरात स्वत:ची अशी ओळख नाही, ही खंत त्यांना कायम वाटत राहते. मुलगा करीअरसाठी बायको-मुलाला घेऊन परदेशी गेल्यावर दोघांना थोडीशी उसंत मिळते. मुलगी राधिकाही आपल्या संसारात रमलेली असते. नगरकर आपल्या कारखान्याच्या कामकाजातून निवृत्त होऊन वंदनासोबत आता उरलेलं आयुष्य आपल्याला हवं तसं जगायचं असं ठरवून निवृत्ती पत्करतात. मात्र, वंदनाला आता संसारातून बाहेर पडून स्वत:साठी जगायचं असतं. आपली ओळख मिळवायची असते. ती पौराहित्याचा कोर्स करून पुरोहित म्हणून कामास सुरुवात करते. नगरकरांना मात्र तिचं हे घराबाहेर पडणं बिलकूल आवडत नाही. पण वंदना आपल्या निर्धारावर ठाम असते. त्यातून उभयतांमध्ये तणाव निर्माण होतो. नगरकरांना घरात आपण एकटय़ानं करायचं काय, असा प्रश्न पडतो. ते अनेक गोष्टी करून बघतात, पण त्यांत मन रमवणं त्यांना जड जातं.  त्यांना त्या जमतही नाहीत. त्यांची चिडचीड सुरू होते. पण वंदना त्यांच्या या त्रस्ततेकडे साफ दुर्लक्ष करते. वैतागलेले नगरकर मुलीला- राधिकाला मधे घालायचा प्रयत्न करतात. परंतु वंदना तिलाही दाद देत नाही. आजवर आपल्याला गृहीत धरणाऱ्या नगरकरांना यापुढे आपल्याला गृहीत धरता येणार नाही, हे ती आपल्या वागण्या-बोलण्यातून आणि कृतीतून सुचवू पाहते. शेवटी परिस्थिती चिघळत या टोकाला जाते, की स्फोट अटळ ठरतो. आणि तो तसा होतोही..

काय होतं मग पुढे? त्यांच्यातलं नातं तुटतं का? की त्यांच्यातलं कुणी एक माघार घेऊन पडतं घेतं? या प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष नाटकातून मिळवणंच इष्ट.

लेखक शेखर ढवळीकर यांनी नवरा-बायकोच्या नात्यातले सूक्ष्म, अव्यक्त पेच, त्यांतले ताणतणाव, राजकारण आणि त्यापायी मनात बसणाऱ्या निरगाठी उत्तमरीत्या संहितेत पेरल्या आहेत. नाटकाची रचना करताना मात्र त्यांनी कानेटकरी पद्धती अवलंबिली आहे. मेढेकर हे पात्र ही त्याचीच निष्पत्ती. असं असलं तरी पती-पत्नीच्या नात्यातला नेहमीचाच घिसापिटा संघर्ष जुनाट रीतीनं न हाताळता त्यांनी तो हसत-खेळत मांडला आहे. मानवी स्वभावातील खाचाखोचांचा त्यांचा सखोल अभ्यास त्यातून जाणवतो. शिवाय ही मांडणी नवीन वाटेल याची दक्षताही त्यांनी घटना-प्रसंगांच्या रचनेत घेतलेली आहे. मंगेश कदम यांनीच यापूर्वीचा प्रयोग दिग्दर्शित केला असला, तरी यावेळी त्यांनी वंदना आणि नगरकरांमधील संघर्ष टोकाला न नेता त्यांच्यातल्या नात्याला तरल भावपूर्णतेचं अस्तर दिसत राहील हे कसोशीनं पाहिलं आहे. ते स्वत: आणि लीना भागवत हे प्रत्यक्षातही नवरा-बायको असल्यानं नकळतही हे घडलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यानिमित्तानं कलावंतांचं प्रत्यक्षातलं नातं त्यांच्या कलेतसुद्धा प्रतिबिंबित होतं का, असा प्रश्न या ठिकाणी पडतो. इथं चांगल्या अर्थानं तसं घडलं आहे, हे आवर्जून नमूद करायला हवं. नाटकातील एका बिनसंवादाच्या प्रसंगात मोबाइलच्या साहाय्याने ‘माणसांत’ राहण्याची नगरकरांची वांझोटी धडपड बरंच काही व्यक्त करते. दिग्दर्शनातील अशा काही जागा मंगेश कदम यांच्या संवेदनशीलतेचा प्रत्यय देणाऱ्या आहेत.

वंदनाची नवऱ्याबद्दलची, त्यानं आणि घरच्यांनी आपल्यावर केलेल्या अन्यायाबद्दलची तक्रार रास्त असली तरी त्यांच्यातल्या नात्याला गंभीर तडा गेलेला नाही, हे नाटकात अधोरेखित केलेलं आहे. त्यांच्यातला संघर्ष व भांडणं ही काहीशी प्रतिक्षिप्त क्रिया आहे. त्यात कसलाही विखार नाही. याचं श्रेय अभिनेत्री लीना भागवत यांना द्यायला हवं. वंदनाचा झगडा हा स्वत:च्याअस्मितेच्या शोधापुरताच सीमित आहे याचं भान त्यांनी राखलं आहे. ती सीमारेषा त्यांनी कधीच ओलांडली नाही. नवऱ्याची चिडचीड, त्रागा, पुरुषी थयथयाट याला त्या ज्या प्रकारे प्रतिसाद देतात, त्यातून त्यांची पत्नी म्हणूनची परिपक्वता दिसून येते. नगरकरांचा यातला त्रागासुद्धा वंदनाला आजवर त्यांनी ज्या प्रकारे गृहीत धरलेलं होतं त्यातून आलेला आहे. आता आपली चूक त्यांना कळली आहे. ती ते सुधारण्याचा प्रयत्नही करताहेत. परंतु उपजत स्वभावामुळे आता या वयात सगळं दुरुस्त करणं त्यांना जमत नाहीए. त्यातून ते आणखीनच चिडचिडे होतात. त्यांच्या पुरुषी अहंकारावर शिक्कामोर्तब होतं. पण मुळात ते वाईट नाहीत. किंबहुना, वंदनाच्या त्यांच्याबद्दलच्या ज्या तक्रारी आहेत, त्यातल्या काही तक्रारी वंदनाने वास्तव समजून न घेता करून घेतलेला गैरसमज आणि त्या घटनांकडे पाहण्याचा तिचा चुकीचा दृष्टिकोन यांतून उद्भवलेल्या आहेत.  त्या- त्या वेळी त्यांचा खुलासा करून न घेता ते समज/गैरसमज आयुष्यभर सोबत वागवत राहिल्याने आजची ही परिस्थिती उभयतांवर ओढवली आहे, हेही सत्य आहे. मंगेश कदम आणि लीना भागवत यांनी पती-पत्नीमधला हा समज-गैरसमजांमधला संघर्ष ‘लव्हेबल’ केला आहे. यातल्या विनोदाच्या जागा, त्यांचं अचूक टायमिंग आणि मधली विरामस्थानं यांचा प्रत्ययकारी वापर दोघांनी केला आहे. त्यामुळे नाटक उत्तरोत्तर उंचावत जातं. चंद्रशेखर कुलकर्णी (मेढेकर) आणि बागेश्री जोशीराव (राधिका) यांची कामंही त्यांच्या त्यांच्या जागी चोख आहेत. तांत्रिक अंगं पूर्वीचीच आहेत. आणि ती उत्तमच आहेत.

Story img Loader