एखाद्या गंभीर आजारावरचा सिनेमा वा चित्रपट अथवा एखादी लेखनकृती हास्यस्फोटक, आनंददायी वगैरे असू शकते? अर्थातच.. नाहीच. यावर कुणी वादासाठी ‘आनंद’ सिनेमाकडे नक्की निर्देश करील. त्यात राजेश खन्ना कसा हसत हसत आपल्या दुर्धर आजारास सामोरा गेला, वगैरे सांगेल. ते खरं असलं तरी या सिनेमाला वेदनेची एक किनार सतत पाश्र्वभूमीला होतीच. हसतखेळत आयुष्य जगण्याचा केलेला तो एक दिखावा होता. इतरांना आपल्या वेदना जाणवू नयेत, म्हणून. दुर्धर आजाराला काही माणसं मोठय़ा हिमतीनं सामोरी जातही असली, आणि त्याही स्थितीत कर्तृत्वाची नवी क्षितीजं काबीज करतही असली, तरी त्यांना आतून पक्की जाणीव असते, की हे सगळं  लवकरच संपणार आहे. आपण काही दिवसांचेच सोबती आहोत. त्यांनी प्रकटपणे नाही दाखवली तरी मरणाची जाणीव त्यांना सतत साथ करत असतेच. ते ती व्यक्त करीत नाहीत, एवढंच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मधुमेह हा आजार आज जगभरात प्रचंड प्रमाणावर वाढतो आहे. वरकरणी त्याचे दुष्परिणाम जाणवत नसले, तरी ते होतच असतात. मधुमेह हळूहळू माणसाला पोखरत जातो. आणि एके दिवशी तो असा काही हिसका दाखवतो, की तोपर्यंत (बऱ्याचदा) खूप उशीर झालेला असतो. मधुमेहाची वेळीच दखल घेऊन त्याला आटोक्यात ठेवणं म्हणूनच गरजेचं असतं. अनेकांना ही जाणीव आत्ता-आत्तापर्यंत नव्हती. परंतु आता मोठय़ा प्रमाणावर मधुमेहासंबंधी होत असलेल्या प्रचारामुळे त्याबद्दलची जागृती लोकांमध्ये वाढीस लागली आहे. हा आजार काहींच्या बाबतीत आनुवंशिक असतो, तसाच आधुनिक जीवनशैलीचाही तो एक परिपाक आहे. म्हणूनच त्याकडे गांभीर्यानं पाहण्याची आवश्यकता आहे. मधुमेही व्यक्तींना सजग करण्यासाठी आरोग्यविषयक प्रकाशनं, शासकीय व खासगी जाहिराती, वृत्तपत्रं-नियतकालिकांमधून प्रसिद्ध होणारे लेख आपल्या परीनं धडपडत असले तरीही आपल्याकडे अजूनही एक मोठा वर्ग असा आहे, की जो मधुमेहाच्या दुष्परिणामांबद्दल अनभिज्ञ आहे. अशांना त्याच्या भयानकतेची जाणीव करून देण्यासाठी लेखक विद्यासागर अध्यापक यांनी ‘साखर खाल्लेला माणूस’ हे नाटक लिहिलं आहे. चंद्रकांत कुलकर्णी यांनी ते दिग्दर्शित केलं आहे. ‘एक शुगरकोटेड ब्लॅक कॉमेडी’ असं त्याचं जे वर्णन केलं गेलं आहे, ते शंभर टक्के सत्य आहे.

विलास नामे एक मध्यमवयीन गृहस्थ मधुमेहाचे पेशंट असल्याचं निदान होतं आणि त्यांची पत्नी माधवी ही त्यांच्यावर पथ्यपाण्याचे अनेक र्निबध घालते. सरकारी विमा कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी असलेले विलासराव अधिक उत्पन्नाच्या आमिषानं खासगी विमा कंपनीत नोकरी पत्करतात आणि मग तिथल्या ‘टार्गेट’च्या जाळ्यात अडकतात. कंपनीने दिलेली टार्गेट्स पुरी करता करता त्यांना नाकी नऊ येतात. टार्गेटच्या या अतिरेकी दडपणामुळे आणि जनसंपर्काचं कारण देत दररोज पाटर्य़ा झोडण्याने ते मद्याच्या आहारी जातात. त्यातून मानसिक ताण कमी होण्याऐवजी वाढतच जातो. आणि ते मधुमेहाच्या जाळ्यात अडकतात.  अशात त्यांची लेक ऋचा हिचं बाहेरख्याली वर्तन वाढत चालल्याचं वर्तमान माधवी त्यांच्या कानी घालते. त्यानं विलासराव खडबडून जागे होतात. ऋचाला तिच्या वर्तनाचा खडसून जाब विचारतात. परंतु तिनं दिलेल्या उत्तरांनी त्यांचा रक्तदाब आणखीनच वाढतो. हा जाबजबाब चालू असतानाच ओंकार हा ऋचाचा मधुमेहतज्ज्ञ डॉक्टर मित्र त्यांच्या घरी येऊन टपकतो. विलासराव मधुमेही असल्याचं कळल्यानं तो त्यांची मधुमेहासंबंधी शाळाच घेतो. पथ्यपाणी, मेडिटेशन वगैरेच्या माधवीच्या झक्कूने आधीच कातावलेले विलासराव ओंकारला हडतहुडूत करून घरातून चक्क हाकलूनच देतात. पण ऋचाच्या आग्रहावरून तिला मागणी घालण्यासाठी तो पुन्हा त्यांच्या घरी येतो. विलासराव त्याचा हेतू जाणून ऋचा स्वत:च त्याला लग्नाला नकार देईल अशा तऱ्हेनं तिला उचकवतात. त्यातून कथित आत्मभान आलेली ऋचा ओंकारला लग्नाला नकार देते. मात्र, नंतर आपण ओंकारपासून गरोदर असल्याचा बॉम्बस्फोट करून ती  घरातल्यांनाही हादरा देते. वर या बाळाला आपण जन्म देणार असल्याचंही ती जाहीर करते. विलासराव आणि माधवी लेकीच्या या कर्मानं गलितगात्रच होतात. ओंकारकडे परतीचे दोरही आता कापले गेलेले असतात. लेकीला गर्भपाताचा सल्ला देऊन विलासराव तिचं दुसऱ्याच एका मुलाशी लग्न लावून देण्याचा घाट घालतात. पण..

लेखक विद्यासागर अध्यापक यांनी मधुमेह केन्द्रस्थानी ठेवून रचलेलं हे नाटक चक्क विनोदी.. ब्लॅक कॉमेडी शैलीतलं आहे. मधुमेहाबद्दल जाणीवजागृती करण्याचा वगैरे कसला पवित्रा न घेता त्याची गंभीरता हसत-खेळत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर िबबवण्याचा यत्न या नाटकाद्वारे केलेला आहे. वरकरणी वास्तववादी वाटणारं हे नाटक ब्लॅक कॉमेडी अंगानं धमाल उलगडत जातं. माधवी झालेल्या शुभांगी गोखले यांनी अर्कचित्रात्मक अभिनयातून ते अधिकच ठसवलं आहे. खरं तर या नाटकात वास्तवदर्शी शैली आणि ब्लॅक ह्य़मुर यांचं संमिश्रण केलेलं आहे. यातल्या घटना कुणाही माणसाच्या जीवनात प्रत्यही घडणाऱ्या आहेत; फक्त त्यांची हाताळणी इथं वेगळी केली गेली आहे. विरोधाभासी विनोदाचे वानगीदाखल नमुने यात आपल्या अनुभवास येतात.  दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि अभिनेते प्रशांत दामले ही जोडी पहिल्यांदाच या नाटकात एकत्र आली आहे. प्रशांत दामले यांची अभिनयशैली आणि चंद्रकांत कुलकर्णी यांची दिग्दर्शकीय पद्धती यांचा मेळ न बसण्याच्या शक्यतेमुळे बहुधा आतापावेतो ते एकत्र आले नव्हते की काय, कुणास ठाऊक. या नाटकात त्यांचे सूर प्रथमच जुळून आले आहेत. हे नाटक मधुमेहासंबंधानं असलं तरी ते त्याबाबत बोधामृत पाजणारं बिलकूल नाही. हट्टी, दुराग्रही माणसाच्या वर्तन-व्यवहारांतून मधुमेहाला कसा बढावा मिळू शकतो, हे त्यात दुरान्वयानं येतं. खरं तर यात माधवीच्या हायपर वागण्या-बोलण्यातून तीच मधुमेहाची शिकार नाहीए ना, असं अधूनमधून वाटत राहतं. याउलट, विलासरावांच्या चिडण्या-संतापण्यावर त्यांचं बऱ्यापैकी नियंत्रण दिसतं. दिग्दर्शकानं वास्तवदर्शी शैली आणि ब्लॅक कॉमेडीचं बेमालूम मिश्रण यात केलेलं आहे. संहितेतल्या विनोदाच्या जागा त्यांनी काढल्या आहेतच; खेरीज संहितेत अव्यक्त असलेल्या जागाही त्यांनी विविध क्लृप्त्या वापरून बोलक्या केल्या आहेत. पात्रांच्या संवाद-विसंवादातल्या, त्यांच्या विरोधाभासी वागण्या-बोलण्यातल्या गमतीजमती त्यांनी नेमक्या हेरल्या आहेत. त्यामुळे घटना-प्रसंगांतील ताण कमी न होताही ते हास्यस्फोटक होतात. परंतु त्यातलं गांभीर्य हरवत नाही. अतिशयोक्तीपूर्ण विनोदाचा सढळ वापर नाटकात आढळतो. ओंकारच्या गंभीर व्यक्तित्त्वासमोर विलासरावांचं उच्छृंखल, बेधडक वर्तन खचितच उठावदार झालं आहे. तीच गोष्ट ऋचा व ओंकारच्याही बाबतीत. नाटक चरमसीमेला पोचतं ते मानवी जीवनाबद्दलचं एक सत्य मांडूनच. तोवरच्या हल्ल्यागुल्ल्यातला छचोरपणा एका उदात्त, उन्नत नोटवर संपतो.. आभाळ निवळतं.

प्रदीप मुळ्ये यांनी उभं केलेलं विलासरावांचं घर त्यांच्या आर्थिक स्तराची जाणीव देणारं आहे. किशोर इंगळे यांनी छायाप्रकाशाच्या खेळातून नाटकाची पिंडप्रकृती सांभाळली आहे. अशोक पत्कींचं संगीत नाटकाची मागणी पुरवतं. गुरू ठाकूर यांचं गाणं गोड आहे.  विलासरावांच्या भूमिकेत प्रशांत दामले यांनी त्यांच्या हातखंडा विनोदी शैलीला इथं काहीशी मुरड घातल्याचं जाणवतं. विशेषत: हशे वसूल करण्यासाठी पदरचे संवाद घेण्याचा मोह त्यांनी कटाक्षानं टाळला आहे. मात्र, विनोदाची शैली बदलली तरी त्यावरील त्यांची हुकुमत जराही कमी झालेली नाही. नाटक खळाळत राहतं ते त्यांच्या वाचिक, आहार्य अन् देहबोलीतून निर्माण होणाऱ्या हास्यकारी विनोदांमुळेच. शुभांगी गोखले यांनी अर्कचित्रात्मक शैलीत माधवी साकारली आहे. विलासरावांच्या सगळं काही ‘हसण्या’वारी नेण्याच्या पाश्र्वभूमीवर माधवीचं काळजीयुक्त नैतिक वर्तन विनोदाला विरोधाभासी इंधन पुरवतं. ऋचा झालेल्या ऋचा आपटे या नवखेपणामुळे त्यामानानं कमी पडतात. संकर्षण कऱ्हाडे यांनी ओंकारचा स्वर अचूक पडकला आहे. सरळमार्गी, परंतु नको त्या परिस्थितीत अकारण फसलेल्या ओंकारची हतबलता, सात्विक संताप त्यांनी पोटतिडकीनं व्यक्त केला आहे.

मधुमेहावरचं इतकं ‘गोड’ नाटक कुणीच चुकवू नये.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi play sakhar khallela manus review
Show comments