माणूस हा अगम्य प्राणी आहे. आयुष्यभर एकाच छताखाली राहूनही माणसं एकमेकांना कळतात असं नाही. जिला आपण चांगलं ओळखतो असं आपल्याला वाटत असतं, ती व्यक्ती अचानक कधीतरी काहीतरी वेगळंच वागते/ बोलते तेव्हा आपल्याला जबर धक्का बसतो. ती मग आपल्याला अपरिचित वाटू लागते. हे अर्थातच समस्त मनुष्यप्राण्याच्या बाबतीत सत्य आहे. अथपासून इतिपर्यंत माणूस समजणं ही अशक्यकोटीतलीच गोष्ट. तसा दावा जर कुणी करत असेल तर तो सपशेल तोंडावर आपटण्याचीच शक्यता जास्त. जिथं माणूस स्वत:लासुद्धा कधी संपूर्णपणे ओळखू शकत नाही, तिथं दुसऱ्याची काय कथा! माणसाला स्वत:ला तरी आपण नेमके कसे आहोत, हे पूर्णाशानं माहीत असायला हवं ना? पण नाही! त्याला स्वत:लाही अकस्मात कधीतरी आपल्यातल्या वेगळ्या जाणिवांची ओळख होते आणि दुग्ध्यात पडायला होतं. खरंच, आपण असेही आहोत?
नवरा-बायकोच्या नात्यात नितळ पारदर्शीपणा हा गृहीतच धरला जातो. निदान तो असायला हवा असं मानलं जातंच जातं. वैवाहिक नात्यांतले बहुतेक बेबनाव हे अपेक्षित विश्वासाला तडा गेल्यानंच होत असतात. वरकरणी सुखी, समाधानी भासणाऱ्या संसारांतही सारं काही आलबेल असतं असं नाही. कदाचित अज्ञाताच्या पायावरही तो सुखाचा इमला रचलेला असू शकतो. याचं कारण- माणसाचं चंचल, उच्छृंखल मन! मनाच्या अथांग डोहात काय काय चाललेलं असतं, हे प्रत्यक्ष ती व्यक्ती सोडल्यास दुसऱ्या कुणाला कळणंच शक्य नसतं. समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय, हे तिच्या बाह्य़ वर्तनात उमटलेच असं नाही. म्हणूनच जगण्यातले अगणित पेच निर्माण होतात. आणि याला स्त्री वा पुरुष कुणीच अपवाद असत नाही.
मिलिंद बोकील यांच्या ‘समुद्र’ कादंबरीतले भास्कर व नंदिनी हे जोडपं मनातल्या अशाच अज्ञात खळबळींची शिकार आहेत. कादंबरीच्या अखेरीस त्याचा उलगडा होत असला तरी मुळात त्यांच्यात निर्माण झालेला तणाव हा माणूस समजून घेण्याच्या प्रक्रियेतल्या त्रुटींचाच परिपाक होय. कर्तृत्व आणि अविश्रांत परिश्रमांवर जलशुद्धीकरणाचा कारखाना उभा करणारा भास्कर स्वत:ला एक सुखी, संसारी माणूस समजत असतो. नंदिनीसारखी बुद्धिमती पत्नी आणि बोर्डिगमध्ये शिकणारा राजूसारखा हुशार मुलगा यांच्यासोबतच्या आयुष्यात आणखी काही मिळवणं बाकी आहे असं त्याला वाटत नाही.
परंतु अचानक एके दिवशी त्याला नंदिनीचं एक गुपित कळतं आणि तो भयंकर हादरतो. आपल्याशिवाय ती अन्य कुणात तरी गुंतलीय, हे ते गुपित. त्याला हे समजलंय, हे तो नंदिनीला जाणवून देत नाही. तीही (बहुधा) त्याला यातलं काही माहीत नाही, या समजात. किंवा, त्याला कळलं तरी त्यानं आपल्या नात्यात काय फरक पडतो, असाही तिचा विचार असावा. त्यामुळे तीही त्याला काही सांगण्या सवरण्याच्या भानगडीत पडत नाही. वरपांगी त्यांचा सुखी संसार सुरळीत सुरू असतो.
..आणि एके दिवशी भास्कर तिला एकत्र सुट्टी घालवण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावरील एका पर्यटनस्थळी घेऊन येतो. तिथं आल्यावर मात्र त्याच्या संयमाचा बांध फुटतो. तो सुरुवातीला तिला आडवळणानं आणि नंतर सूचकपणे- तिचं नेमकं काय चाललंय, असं विचारतो. ती सुरुवातीला ‘कुठं काय? काहीच नाही..’ म्हणत त्याचा प्रश्न हसण्यावारी नेते. पण मग तो थेटपणेच तिला गणेश ग्रामोपाध्येबद्दल विचारतो. त्यांना एकदा परस्परांचे हात हातात घेतल्या अवस्थेत त्यानं पाहिल्याचं सांगतो. तेव्हा नंदिनीला त्याच्या धुमसण्यामागचं कारण कळतं. तीही मग स्वच्छपणे सांगते.. ‘गणेश माझा मित्र होता. त्याला माझ्या मनातलं सगळं कळायचं. त्यातून आमची मैत्री घट्ट होत गेली. आणि त्या मैत्रीची पुढची अपरिहार्य पायरी म्हणून आमच्यात संबंधही आले. पण त्यात मी तुझ्याशी प्रतारणा करतेय अशी भावना कधी नव्हती.. आजही नाही. ती निखळ मैत्री एकीकडे आणि आपलं नवरा-बायकोचं नातं एकीकडे. या मैत्रीनं आपल्यातल्या भावबंधांना काही तडा दिलाय असं मला बिलकूल वाटत नाही.’ तिच्या या स्पष्ट कबुलीनं त्याचा संशय खरा ठरतो. त्यानं भास्कर खवळतो. ‘ही तू माझ्याशी केलेली शुद्ध प्रतारणाच नाही तर काय? मी कुठं कमी पडलो म्हणून तुला गणेशची गरज भासली?’ असं संतप्त भास्कर विचारतो. नंदिनीचं यावर म्हणणं असं : ‘तू कुठं कमी पडत होतास म्हणून नव्हे, तर ती माझी आंतरिक गरज होती. आणि त्यानं माझ्या आयुष्यातल्या तुझ्या स्थानाला कुठलाही धक्का पोचलाय असं मला कधी वाटलंच नाही.’
भास्करच्या मात्र हे सारं डोक्यावरून जातं. त्याचा संताप शिगेला पोहचतो आणि याउप्पर आपल्यात कसलंही नातं राहणं शक्य नाही, असं तो स्वच्छपणे तिला सांगतो. गणेशबरोबरच्या आपल्या निखळ मैत्रीचा भास्करनं एवढा बाऊ का करावा, हे नंदिनीला खरोखरीच कळत नाही..
‘समुद्र’ या मिलिंद बोकील यांच्या स्त्री-पुरुष मैत्रीच्या नात्यावरील अनवट कादंबरीचं चिन्मय मांडलेकर यांनी त्याच नावानं नाटय़रूपांतर केलं आहे. आणि भद्रकाली संस्थेनं ते रंगमंचावर आणण्याचं धाडस केलेलं आहे. चिन्मय मांडलेकरांनीच त्याचं दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिकाही निभावली आहे. तर नंदिनीच्या भूमिकेत आहे- स्पृहा जोशी. स्त्री-पुरुष नात्यातील निखळ मैत्री आणि माणूसपणाचा शोध घेणाऱ्या या नाटकातला हा विचार पारंपरिक भारतीय मानसिकतेला खचितच झेपणारा नाही. किंबहुना, गणेश-नंदिनीच्या नात्यात तिला अपेक्षित असलेल्या तरल अलवारतेला धक्का देणारं वक्तव्य जेव्हा गणेशकडून होतं, तेव्हा नंदिनीच्या दारुण अपेक्षाभंगाबरोबरच ‘समुद्र’चा संवेदनशील गाभाही ध्वस्त होतो आणि नाटक फिरून पुन्हा चाकोरीत परततं. यानंतर भास्करचा माणूसपणाकडचा प्रगल्भ प्रवास ‘समुद्र’मध्ये पाहायला मिळतो. त्यानं नंदिनीसोबत आपणही सुखावतो.. अधिक समृद्ध होतो.
केवळ दोन पात्रांच्या या नाटकात मानसिक-भावनिक संघर्ष हाच केन्द्रस्थानी आहे. समुद्राला साक्ष ठेवून त्याच्याच साथीनं नंदिनी-भास्करचा प्रगल्भ माणूसपणाकडचा हा प्रवास उलगडत जातो. लेखक-दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी तो अधिकस्य अधिक विश्वासार्ह व्हावा यासाठी प्रचंड कष्ट घेतले आहेत. त्यामुळेच लेखन ते सादरीकरणापर्यंत स्त्री-पुरुष नातं लिंगभेदापल्याड माणूसपणाकडे नेण्यात ते यशस्वी झाले आहेत. परंतु या प्रवासादरम्यान गणेशकडून झालेला नंदिनीचा भ्रमनिरास निखळ माणूसपणातलं सत्त्व थोडंसं कमी करतं. गणेश ‘तसं’ न वागता तर..? तरीही नंदिनी आणि भास्करमधील नातं अबाधित राहिलं असतं का? हा खरा प्रश्न आहे. तसं जर ते अबाधित राहतं, तर मात्र माणसाच्या प्रगल्भतेची पातळी कितीतरी पायऱ्या वर गेल्याचं समाधान प्रेक्षकांना मिळालं असतं. असो. परंतु जे आहे ते नितळपणे मांडण्याचा प्रयत्न ‘समुद्र’मध्ये केला गेला आहे. गणेशसोबतच्या नात्याबद्दलचा नंदिनीचा वैचारिक प्रतिवाद स्वीकारार्ह वाटत नाही. ती जरी आपलं म्हणणं ठाशीवपणे पुन:पुन्हा मांडत राहते तरी त्यातलं सच्चेपण ना भास्करच्या मनाला स्पर्श करत, ना प्रेक्षकांच्या! ही उणीव ‘समुद्र’मध्ये प्रकर्षांनं जाणवते. कदाचित गणेश ‘तसं’ न वागता तर हा प्रश्न उद्भवला नसता. तसंच या दाहक वास्तववादी नाटकात कवितांचा वापर अस्थानी वाटतो, ही बाबही नमूद करायला हवी.
राजन भिसे यांनी समुद्राकाठच्या कॉटेजचं नेपथ्य नेमकेपणी उभं केलं आहे. त्यातलं सूचकता आणि वास्तवाचं संमिश्रण दाद देण्याजोगं. मयूरेश माडगावकरांनी समुद्राच्या गाजेसह पात्रांच्या मनातली खळबळ पाश्र्वसंगीतातून अधोरेखित केलीय. जयदीप आपटे यांच्या प्रकाशयोजनेनं नाटय़ांतर्गत मूड्स गहिरे केलेत.
चिन्मय मांडलेकर यांनी साध्या, सरळमार्गी भास्करचं नंदिनीच्या प्रतारणेनं खोल दुखावलं जाणं, त्यातून मनात धुमसणारा ज्वालामुखी, त्याचा नंतर झालेला उद्रेक आणि त्यानंतरचं त्याचं हळूहळू निवळत जाणं, परिपक्व माणूसपणाकडे झालेला त्याचा प्रवास या सगळ्या उलथापालथी सच्चेपणानं व्यक्त केल्या आहेत. स्पृहा जोशी यांनी लिंगभेदापल्याडचा निखळ मैत्रभाव शोधणारी बुद्धिमती नंदिनी उत्कटतेनं साकारली आहे. तिचा वैचारिक ठामपणा तितक्याच आग्रहीपणे व्यक्त होतो. तथापि, गणेशच्या वागण्यानं स्त्री-पुरुष मैत्रीसंदर्भातलं तिचं म्हणणं, त्यामागील वैचारिक अधिष्ठान यावर चक्क पाणी फेरतं. त्यातून निर्माण झालेल्या नवरा-बायकोतील दरीनंतरचा भास्करचा माणूसपणाकडचा प्रवासात त्यांच्यातलं नातं अधिक प्रगल्भ, परिपक्व बनवतं. यात तिच्या वैचारिकतेचा कळत-नकळत वाटा आहेच. मराठी रंगभूमीला प्रागतिक का म्हटलं जातं, याचं प्रत्यंतर ‘समुद्र’सारख्या नाटकांतून येतं, हे मात्र नि:संशय
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा