डॉक्टरी हा आज सेवाभावी पेशा उरला नसून तो एक व्यवसाय वा धंदा झालेला आहे. अर्थात त्याची अनेक कारणं आहेत. वैद्यकशिक्षण घेण्यासाठी आणि त्यानंतर वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू करण्यासाठी कोटय़वधी रुपये मोजावे लागत असल्याने ते सव्याज वसूल करण्याकडे मानवी कल असणं स्वाभाविक होय. पूर्वी या पेशात येणाऱ्यांचा दृष्टिकोन मूलत: सेवावृत्तीचा असे. याचं कारण त्याकाळी समाजात डॉक्टरांना असलेलं परमेश्वराचं स्थान! असं असलं तरी तेव्हाही वैद्यकीय पेशात काळे धंदे चालत नसत अशातला भाग नाही. डॉ. अरुण लिमये यांनी ‘क्लोरोफॉर्म’ या पुस्तकाद्वारे डॉक्टरी पेशातील या काळ्या धंद्यांवर प्रकाशझोत टाकून एकच खळबळ उडवून दिली होती. अजित दळवीलिखित ‘डॉक्टर, तुम्हीसुद्धा!’ या नाटकानंही डॉक्टरी पेशातील गैरप्रकारांचा पर्दाफाश केला होता. या गैरव्यवहारांना पायबंद घालण्यासाठी आता सरकार ‘कट प्रॅक्टिस’विरोधी कायदा करण्याच्या तयारीत आहे. डॉक्टरी पेशातील अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कायदा करावा लागणं याचाच अर्थ परिस्थिती किती हाताबाहेर गेलीय हे दिसून येतं. आज रुग्ण व त्यांच्या नातलगांमध्येही आपल्या हक्कांबद्दल जाणीवजागृती झालेली आहे. डॉक्टरांच्या व्यवहारांकडे ‘ग्राहक’ म्हणून ते सजगतेनं पाहू लागले आहेत. आणि असा एखादा गैरव्यवहार त्यांना आढळून आला तर त्याबद्दल डॉक्टरांना न्यायालयात खेचायलाही ते मागेपुढे पाहत नाहीत. आणि इतकं असूनही ‘कट प्रॅक्टिस’, तसंच स्त्रीभ्रृणांच्या अवैध गर्भपाताचा धंदा आजही सुरूच आहे.
नमनालाच या घडाभर तेलाची चर्चा करायचं कारण- ‘गणरंग’ निर्मित ‘तोच परत आलाय!’ हे नाटक! निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते विनय आपटे यांची ‘गणरंग’ ही नाटय़संस्था मध्यंतरी काही काळ बंद होती. या नाटकाद्वारे ती पुनश्च सक्रीय होत आहे. प्रवीण धोपटलिखित आणि मंगेश सातपुते दिग्दर्शित ‘तोच परत आलाय!’ या नाटकाचा विषयही डॉक्टरी पेशातील गैरप्रकार हाच आहे. निष्णात, बुद्धिमान डॉक्टर आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा आणि रुग्णाने आपल्यावर टाकलेल्या विश्वासाचा कसा व कुठल्या थराला जाऊन गैरवापर करतात आणि मानवी मूल्ये कशी पायदळी तुडवतात, याचं भेदक चित्रण या नाटकात आढळतं.
आयव्हीएफ तंत्राद्वारे विनापत्य जोडप्यांना अपत्यसुख मिळवून देणारा डॉ. आनंद परांजपे आपलं अद्ययावत सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचं स्वप्न सत्यात आणण्यासाठी धडपडतो आहे. त्याकरता वाट्टेल ती किंमत मोजण्याची त्याची तयारी आहे. त्याचं हे स्वप्न आता वास्तवात उतरण्यासाठी थोडाच कालावधी उरलाय. केवळ आरोग्यमंत्र्याकडून भूखंडाची फाईल क्लीअर झाली की झालं! त्यांना कसं मॅनेज करायचं, याचीही ‘व्यवस्था’ त्याने केलीय. त्या सगळ्या गडबडीत डॉ. आनंद व्यग्र आहे.
..आणि अचानक कुणीएक गृहस्थ डॉ. आनंदच्या घरी आगंतुकपणे अवतरतो आणि त्याच्याकडे थेट पाच लाख रुपयांची मागणी करतो. का, कशासाठी.. कसलाही खुलासा न करता! आनंद त्याला साफ उडवून लावतो. ‘तू कोण? कशासाठी आलायस? मी कशासाठी तुला पैसे द्यायचे?’ या त्याच्या प्रश्नांची सरळपणे उत्तरं न देता तो गृहस्थ बराच वेळ तिरकसच बोलत राहतो. आपलं नाव रोहिदास सदाशिव भोसले असल्याचं सांगून पैसे घेतल्याशिवाय आपण इथून जाणार नाही, असं तो आनंदला धमकावतो. शेवटी आनंद पोलिसांना बोलावण्याची धमकी देतो तेव्हा तो गृहस्थ जातो.. पण ‘पुन्हा पैसे घ्यायला येईन,’ हे सांगूनच.
दरम्यान, डॉ. आनंद व प्रा. मानसीचा मुलगा रोहन हा क्लासला गेला असताना त्याला घ्यायला गेलेल्या ड्रायव्हरला वाटेत थोडा उशीर होतो आणि तो क्लासमध्ये पोहोचतो तेव्हा रोहन तिथे नसतो. रोहनच्या अचानक बेपत्ता होण्याने मानसी हवालदिल होते. पण काही वेळानं तो सापडतो. या घटनेनंतर भोसले पुन्हा एकदा आनंदच्या घरी येतो तेव्हा मानसी घरी असते. तो तिच्याकडे रोहनची चौकशी करतो. भोसलेला रोहनशी काय देणंघेणं, हे मानसीला कळत नाही. तशात रोहनच्या बाबतीत ‘ती’ घटना नुकतीच घडलेली. त्यामुळे ती खूप बेचैन होते. ती भोसलेच्या घरी येण्याबद्दल आणि त्याने रोहनच्या केलेल्या चौकशीबद्दल आनंदला सांगते. आपल्याकडे पाच लाख रुपये मागणारा भोसलेच पुन्हा घरी आला असणार, हे त्याच्या ध्यानी येतं. मानसीची भीती रास्त आहे, भोसले खंडणीसाठी काहीही करू शकेल, हे ध्यानी येऊन तो आपला मित्र- इन्स्पेक्टर समीर पाठारेला या घटनेची माहिती देतो आणि त्याचा बंदोबस्त करायला सांगतो.
परंतु यानंतर भोसले पुनश्च एकदा आनंदच्या घरी येऊन दहा लाखांची मागणी करतो. रोहन हा विठ्ठल सोनावणेचा मुलगा असल्याचं आपल्याला माहीत आहे, हे तो डॉ. आनंदला सांगतो. चिडलेला आनंद विठ्ठलला हॉस्पिटलमध्ये बोलावून घेऊन त्याला चांगलाच फैलावर घेतो. भोसलेकरवी आपल्याला तो ब्लॅकमेल करत असल्याचं आनंद इन्स्पेक्टर समीरला सांगतो. परंतु विठ्ठल सोनावणे भोसलेबद्दल कानांवर हात ठेवतो. आपल्याला असा कुणी गृहस्थ माहीतच नसल्याचं सांगतो. समीर पोलिसी खाक्यानं त्याच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करतो, पण सोनावणेला खरंच यातलं काहीच माहीत नाही हे त्याच्या लक्षात येतं.
मात्र, भोसलेचा पैशांसाठीचा तगादा थांबत नाही. शेवटी पोलिसांच्या जाळ्यात भोसलेला अडकवायचं ठरवून आनंद त्याला पैसे द्यायचं कबूल करतो. पण भोसलेही कच्च्या गुरूचा चेला नसतो. तो ते पैसे घेत नाही. उलट, विठ्ठल सोनावणे व त्याच्या बायकोला (सुशीला) तिथे हजर करून त्यांनाच रोहनचं रहस्य खुलं करायला सांगतो.
यानंतर पुढं काय होतं, हे प्रत्यक्ष नाटकात पाहणंच योग्य.
लेखक प्रवीण धोपट यांनी नाटकाची रचना काहीशी रहस्यनाटय़ासारखी केली असली तरी पुढे ते वास्तवाकडे झुकतं. चढत्या रंगतीनं प्रसंगांची मालिका रचण्यात लेखक यशस्वी झाला आहे. कथाबीज कुठलं वळण घेणार, याबद्दलचे ठोकताळे प्रेक्षक मनाशी बांधेतोवर धक्कातंत्रानं त्यांना खिळवून ठेवण्यात लेखकानं आपलं कौशल्य पणाला लावलं आहे. सरतेशेवटी डॉ. आनंदला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्यानंतर आनंद जो वकिली युक्तिवाद करतो, तो भोसलेलाही निरुत्तर करतो. डॉक्टरी पेशातील निष्णात व्यक्ती कुठल्या थराला जाऊन बुद्धय़ाच केलेल्या वा अजाणता हातून घडलेल्या चुकांवर वा आपण केलेल्या गुन्ह्य़ांवर सफाईनं पांघरूण घालू शकतात याचं दर्शन त्यातून घडतं. व्यक्तिरेखाटन, प्रसंग-मांडणी तसंच नाटकाचा आलेख यावर लेखकाची जबर हुकूमत असल्याचं ‘तोच परत आलाय!’मध्ये प्रकर्षांनं जाणवतं.
दिग्दर्शक मंगेश सातपुते यांनीही ताकदीनं प्रयोग उभा केला आहे. संहितेतल्या रिक्त जागा त्यांनी दिग्दर्शकीय कौशल्यानं भरून काढल्या आहेत. विशेषत: व्यक्तिरेखांच्या अस्सलतेवर त्यांनी बारकाईनं काम केलं आहे. कलाकारांची निवड ते त्यांच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीपर्यंत तपशिलांत त्यांनी विचार केलेला जाणवतो. मात्र, मानसीने एक ‘आई’ म्हणून उपस्थित केलेल्या प्रश्नांपाशी नाटक संपलं असतं तर ते अधिक उंचीवर गेलं असतं असं राहून राहून वाटतं. त्यापुढचा डॉ. आनंदच्या अध:पतनाचा प्रवास संदिग्ध ठेवण्यानं काही बिघडलं नसतं. परंतु ‘हीरोइझम’च्या प्रभावाखाली नाटककर्त्यांकडून हे घडलं असावं. असो.
प्रदीप मुळये यांनी डॉ. आनंदचं उभारलेलं आलिशान घर आणि हॉस्पिटलचा भाग नाटकाची मागणी पुरवतं. अशोक पत्कींनी पाश्र्वसंगीतातून यातलं क्षोभनाटय़ आणखीन गहिरं केलं आहे. शीतल तळपदेंची प्रकाशयोजना वातावरणनिर्मितीत मोलाचा वाटा उचलते. रंगभूषाकार अनिल ओरोसकर यांचा तर विशेष उल्लेख करायला हवा. त्यांनी विठ्ठल सोनावणेची केलेली रंगभूषा अफलातून आहे. पूर्णिमा ओक यांनी वेशभूषेतून पात्रांचा सामाजिक-आर्थिक स्तर दर्शविला आहे.
सगळ्याच कलाकारांनी यात मन:पूर्वक कामं केली आहेत. प्रथम उल्लेख करायला हवा तो विठ्ठल सोनावणे साकारणाऱ्या सुनील खंडागळे यांचा. त्यांनी रोजंदारी मजुराचं निरपराध भांबावलेपण ज्या उत्कटतेनं व्यक्त केलं आहे त्याला ‘लाजवाब’ हे विशेषणही तोकडं पडेल. संपूर्ण नाटकभर त्यांनी आपलं हे ‘गरीब बिच्चारेपण’ अस्सलतेनं वठवलं आहे. डॉ. आनंदच्या भूमिकेत गिरीश परदेशी आपल्या भारदस्त व्यक्तिमत्त्वासह संवादफेकीतील विशिष्ट शैलीनं चांगलेच शोभले आहेत. मनात अपराधीभाव वागवताना वरकरणी बेमुर्वतखोरपणा दाखवताना त्यांची चाललेली केविलवाणी धडपड त्यांनी यथार्थपणे व्यक्त केली आहे. शृजा प्रभुदेसाई यांनी प्रा. मानसीचं ‘रॅशनल’ व्यक्तिमत्त्व आणि रोहनची आई म्हणून होणारी तगमग, घुसमट आणि बेचैनी प्रत्ययकारीतेनं दर्शवली आहे. ‘जैविक आई आणि मुलाला मातृत्वाच्या त्याच असोशीनं वाढवणारी आई यांच्यात कुठला फरक असतो? मग माझ्या आईपणाचं काय?’ हा त्यांनी विचारलेला सवाल अंतर्मुख करणारा आहे.
संग्राम समेळ यांनी रोहिदास भोसलेचं रहस्यमय व्यक्तिमत्त्व उत्तम पेललं आहे. संवादांतील ठाशीव नाटय़पूर्णतेनं त्यांनी त्याला वेगळा कंगोरा बहाल केला आहे आणि आपण अभिनय क्षेत्रात ‘लंबी रेस का घोडा’ आहोत हे ठोसपणे ठसवलंय. सुशीला झालेल्या समता जाधव-कळंबे यांनी अशिक्षित स्त्रीचं आईपण सार्थपणे व्यक्त केलं आहे. रमेश रोकडे यांचा इन्स्पेक्टर समीर पोलिसी खाक्याचा अर्क आहे.
एकुणात, एक उत्तम नाटक पाहिल्याचं समाधान हे नाटक देतं, यात बिलकूल शंका नाही.