बल्गेरियातील एका नाटय़ महोत्सवात एका मराठी दीर्घाकाची निवड झाली आहे. मेक्सिकोमधील कलाकार फ्रिडा काहलो हिच्या जीवनावर आधारित ‘ओह, फ्रिडा!’ या एकल आविष्कार (सोलो अ‍ॅक्ट) दीर्घाकाला हा मान मिळाला असला, तरी हा अनोखा नाटय़प्रयोग बल्गेरियात होण्याबाबत अनिश्चितता आहे. १२ ते १७ जून या दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाला जाण्याचा प्रवास खर्च नाटकाच्या चमूलाच करायचा आहे. मात्र आठ जणांच्या चमूपैकी सहा जणांच्या खर्चाची सोय करूनही दोघांच्या प्रवास खर्चासाठी पैसे नसल्याने या नाटकाची बल्गेरिया वारी संकटात सापडली आहे.
पुण्यातील ‘एक्स्प्रेशन लॅब’ या संस्थेतर्फे होणाऱ्या ‘गोइंग सोलो’ या स्पर्धेसाठी ‘ओ, फ्रिडा!’ या एकल आविष्काराचा पहिला प्रयोग करण्यात आला होता. पुण्यातीलच अभिषेक देशमुख लिखित आणि दिग्दर्शित या दीर्घाकात फ्रिडा काहलो या मेक्सिकन आर्टिस्टची भूमिका कृतिका भावे हिने केली होती. फ्रिडा काहलो ही मेक्सिकोतील चित्रकार ‘सेल्फ पोट्रेट’ म्हणजेच स्वत:चीच चित्रे काढण्यासाठी ओळखली जाते. या चित्रांत तिच्या खासगी आयुष्यात दडलेल्या गोष्टी असत किंवा कधी तिची स्वप्ने आणि विचारही असत. अशा आर्टिस्टवर तयार केलेल्या या दीर्घाकाला स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि उत्कृष्ट वेशभूषा ही पारितोषिकेही मिळाली.
बल्गेरियात होणाऱ्या १६व्या ‘व्हेर्मे इंटरनॅशनल युथ थिएटर फेस्टिव्हल’ या नाटय़ महोत्सवात आता आमच्या ‘ओह, फ्रिडा!’ या एकल आविष्काराची निवड झाली आहे. हा महोत्सव १२ ते १७ जून या दरम्यान बल्गेरिया येथे होणार असून गेली १५ वर्षे सुरू असलेल्या महोत्सवात कदाचित पहिल्यांदाच मराठी नाटक सादर होणार आहे.
रोहन टिल्लू, मुंबई

Story img Loader