कलर्स मराठीवरील ‘राजा राणीची गं जोडी’ ही मालिका सध्या बरीच गाजताना दिसतेय. या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता मनिराज पवार यांच्या मुख्य भूमिका आहेत. मालिकेत या दोघांनी साकारलेल्या ‘रणजीत ढालेपाटील’ आणि ‘संजीवनी ढालेपाटील’ या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या या मालिकेत लवकरच रंजक वळण येणार आहे. रणजीत ढालेपाटील म्हणजेच अभिनेता मनिराज पवार पुन्हा एकदा खाकी वर्दीत दिसणार आहे.
संजीवनी अल्पवयीन असताना तिच्याशी लग्न केल्यामुळे सस्पेंड झालेला एसीपी रणजीत पुन्हा वर्दीत कधी दिसणार याबाबत प्रेक्षकांना बऱ्याच काळापासून उत्सुकता होती पण आता लवकरच प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार असून रणजीत ढालेपाटील पुन्हा एकदा एसीपी रणजीत ढालेपाटील म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून त्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा होताना दिसत आहे.
आणखी वाचा- लाइट्स, कॅमेरा अँड अॅक्शन! जिनिलिया डिसूझाने सुरू केलं नव्या चित्रपटाचं शूटिंग
कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये संजीवनीसोबत रणजीत देखील गुंडांशी दोन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये तो खाकी वर्दीत म्हणजेच पोलीसांच्या गणवेशात दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना ‘जो कायदा तोडणार, त्याला रणजित फोडणार…’ असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाइक्सचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे.