छोट्या पडद्यावरील ‘रंग माझा वेगळा’ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. अल्पावधीतच या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत दीपा आणि कार्तिक या जोडीला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे. या मालिकेत दिपा आणि कार्तिकच्या दोन्ही मुली दीपिका आणि कार्तिकी या चांगल्याच प्रसिद्धीझोतात आल्या आहेत. दीपिका आणि कार्तिकी या दोघींनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र आता कार्तिकीची भूमिका साकारणारी बालकलाकार साईशा भोईर हिने ही मालिका सोडली आहे. नुकतंच यामागचे कारण समोर आलं आहे.
रंग माझा वेगळा या मालिकेत कार्तिकीची भूमिका साईशा भोईर साकारताना दिसत होती. नुकतंच या मालिकेतील कार्तिकीने ही मालिका सोडली आहे. तिला एका नव्या प्रोजेक्टची ऑफर मिळाली असल्याने तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मालिकेच्या टीमकडूनही यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे. त्यामुळे साईशा लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याचे बोलले जात आहे.
‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपिका आणि कार्तिकी एका भागासाठी घेतात इतके मानधन? जाणून घ्या
साईशाच्या आई वडिलांनी तिच्यासोबत इंस्टाग्रामवर एक लाइव्ह केले होते. त्यावेळी त्यांनी कार्तिकीने मालिका का सोडली याबाबतचे कारण सांगितले होते. “रंग माझा वेगळा मालिकेत साईशा आता दिसणार नाही. तिच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जरी ती या मालिकेत दिसणार नसली तरी सोशल मीडियाद्वारे ती तुमच्या संपर्कात राहणार आहे. साईशाला कार्तिकीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळाली आहे”, असे त्यांनी म्हटले.
“पण आम्ही कल्याणला राहतो. रंग माझा वेगळाचे शूटींग हे मालाडमध्ये होते. तिकडे दररोज जाण्या-येण्यात दोन तास लागतात. त्यामुळे तिला शाळेत आणि अभ्यासासाठी फार वेळ मिळत नव्हता. तसेच यामुळे तिच्या तब्येतीवरही परिणाम जाणवू लागला आहे”, असेही त्यांनी सांगितले.
९१ हजार फॉलोवर्स, सोशल मीडिया स्टार; ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील कार्तिकी नक्की कोण?
त्यापुढे साईशा म्हणाली की, “मला खूप कंटाळा आला होता. मला शाळेत जायचे आहे. तुम्ही साईशाला कार्तिकीच्या भूमिकेत प्रेम दिले तसेच नव्या येणाऱ्या कार्तिकीलाही द्या, असे तिच्या आई वडिलांनी सांगितले. साईशा ही लवकरच तुम्हाला रुपेरी पडद्यावर काम करताना दिसणार आहे. तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती आम्ही तुम्हाला सोशल मीडियावर देत राहू”, असेही तिचे आई-वडील म्हणाले.
दरम्यान रंग माझा वेगळा ही मालिका टीआरपी रेटिंगमध्ये पहिल्या क्रमाकांवर कायम आहे. स्टार प्रवाहवर असलेल्या या मालिकेचा टीआरपी ६.८ आहे. आता कार्तिकी अर्थात साईशाने ही मालिका सोडल्यानंतर टीआरपीमध्ये काही बदल होतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.