छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून स्वाभिमान मालिकेला ओळखले जाते. स्वाभिमान ही मालिका सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. या मालिकेतील शांतनूचे पात्र साकारणारा अभिनेता अक्षर कोठारीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेल्या अक्षरने नुकतंच त्याच्या आयुष्यातील वाईट प्रसंगाबद्दल वक्तव्य केले आहे. पत्नीपासून घटस्फोट ते लहान भावाच्या मृत्यूपर्यंत अनेक गोष्टींवर त्याने भाष्य केले.
अक्षरने नुकतंच हिंदुस्थान टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या काही गोष्टींबद्दल खुलासा केला. यावेळी तो म्हणाला, २०१९ हे वर्ष प्रचंड कठीण आणि परीक्षा पाहणारं गेलं. मी कित्येक रात्री जागून काढल्या. मला सतत वाटायचं माझ्या भावाला काही झालं तर? माझ्या डोक्यात नेहमी तेच सुरू असायचं. पण कलाकाराचं आयुष्य कसं असतं, त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काहीही घडत असलं तरी त्याला पडद्यावर मात्र नेहमी हसतमुखचं राहावं लागतं. त्यावेळी मी प्रचंड अस्वस्थ होतो.
एकीकडे माझा भाऊ रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता आणि त्या ठिकाणी असणारे कर्मचारी हे माझ्यासोबत फोटो काढण्यात गुंतले होते. त्यावेळी मला कलाकारांचं आयुष्य किती वेगळं असतं, या गोष्टीची जाणीव झाली. प्रेक्षकांना सगळ्यांना कलाकारांच्या चेहऱ्यावर फक्त हसू बघायचं असतं. मी त्याबाबत चांगला नसलो तरी ते करण्याचा निश्चितच प्रयत्न करतो, असेही अक्षर म्हणाला.
मला त्या दिवसांनी खूप काही शिकवलं. त्या दिवसातच मी माणूस म्हणून परिपक्व झालो. मात्र कलाकारांना अशा घटनांची मदत त्यांच्या भूमिका चांगल्या करण्यासाठी होते. अभिनेता होणं हा सर्वस्वी माझा निर्णय होता. त्यावेळी माझ्या कुटुंबाने मला यासाठी फार विरोध केला.
“दोनाचे ते चार झाले”, ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ मालिकेतील देवकीची ‘ती’ पोस्ट चर्चेत
त्यात माझा लहान भाऊ हा स्पेशल चाइल्स असल्याने मी नीट पगार असलेली एखादी नोकरी करावी, अशी त्यांची इच्छा होती. मला त्यांचे मन वळवण्यासाठी तब्बल पाच वर्षे लागली. पण त्याकाळात मी माझा भाऊ गमावला. परंतु मी त्या काळात ज्या अडचणींना सामोरी गेलो त्यांनी मला खूप काही शिकवलं, असेही अक्षरने सांगितले.