‘बाबाजी लक्ष असू द्या’ हे संवाद लवकरच एखाद्या पंजाबी किंवा गुजराती मुलाच्या तोंडी ऐकू आले, तर आश्चर्य वाटायला नको. कारण ‘झी मराठी’वरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ आणि ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या दोन मालिका हिंदीमध्ये डब करण्यात आल्या असून ४ मेपासून ‘झी टीव्ही’वर दाखविण्यात येणार आहेत.
गेल्या काही वर्षांपासून प्रादेशिक वाहिन्यांना मिळणारी प्रेक्षकसंख्या लक्षात घेऊन हिंदी वाहिन्यांनी या प्रादेशिक वाहिन्यांना आणि त्यांच्या मालिकांना गंभीरतेने घेण्यास सुरवात केली आहे. नुकतीच ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेच्या कथानकावरून प्रेरणा घेऊन ‘झी टीव्ही’वर नवी मालिका सुरू करण्यात आली होती. सध्या ती हिंदीतील गाजणाऱ्या मालिकांमधील एक मालिका आहे. यानंतरचे पाऊल म्हणून वाहिनीने नवीन मालिका बनविण्याऐवजी दोन लोकप्रिय मालिकांचे डबिंग करून त्या वाहिनीवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्यावर प्रेम असूनही वडिलांच्या हट्टापोटी वेगळ्याच मुलाशी लग्न करावे लागले तरी लग्नाच्या पहिल्याच दिवशी नवऱ्याला सर्व खरं सांगणारी मेघना आणि तिचं सत्य कळल्यावरही तिच्या आयुष्याची दिशा ठरवायला तिला पूर्ण साहाय्य करणारा आदित्य या दोघांची प्रेमकथा म्हणजेच ‘जुळून येती रेशीमगाठी’ ही सध्या मराठीमधील सर्वात गाजणारी मालिका आहे. मालिकेतील मेघनाचा सच्चेपणा, आदित्यचे तिच्यावरील निस्सीम प्रेम यामुळे तरुणाईतही ही मालिका गाजत आहे. त्यातील ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी यांची जोडीही कॉलेजवासीयांमध्ये प्रसिद्ध आहे. तर एकत्र कुटुंबपद्धतीतून आलेल्या आपल्या प्रेयसीला गमवावे लागू नये म्हणून खोटे कुटुंब उभे करणारा, पण नंतर त्यांच्यातलाच एक बनलेला उमेश कामतने साकारलेला ओम आणि स्पृहा जोशीने साकारलेली त्याची प्रेयसी ईशा यांची आंबटगोड कथा म्हणजेच ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’लाही प्रेक्षकांचे तितकेच प्रेम मिळाले होते. या दोन मालिका ४ मेपासून संध्याकाळी ५ ते ६च्या दरम्यान पाहायला मिळणार आहेत.

Story img Loader