कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील वापरावर मर्यादा असायला हव्यात. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे मनोरंजन क्षेत्रातील अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा येते आहे म्हणून हॉलीवूडमधील चित्रपटकर्मी आणि लेखकांनी निषेधयुद्ध छेडलं होतं. एकीकडे चॅटजीपीटीसारख्या एआय तंत्रज्ञानाच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं असताना दुसरीकडे ‘जनरेटिव्ह एआय’ तंत्रज्ञानामुळे मनोरंजन माध्यमात कल्पनांच्या भराऱ्या घेत कथा रंगवणं शक्य झालं आहे. याच ‘जनरेटिव्ह एआय’ तंत्रज्ञानाचा वापर पहिल्यांदाच सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेसाठी केला जातो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘तू भेटशी नव्याने’ या सोनी मराठी वाहिनीवरील नव्या मालिकेचा प्रोमो झळकल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. या नव्या प्रोमोमध्ये अभिनेता सुबोध भावे दोन रूपांत प्रेक्षकांसमोर आले आहेत. प्राध्यापक अभिमन्यू म्हणून ते त्यांच्या नेहमीच्या रूपात प्रेक्षकांना दिसतात. तर एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमाने तरुणपणीची त्यांची प्रतिमा तयार करण्यात आली असून माही हे या तरुण व्यक्तिरेखेचं नाव आहे. अशा पद्धतीने एआय तंत्रज्ञानाचा वापर करून एखाद्या कलाकाराची तरुण प्रतिमा निर्माण करत त्याचा वापर पहिल्यांदाच मालिकेत करण्यात आला आहे.

‘सोनी मराठी’ वाहिनीच्या या नव्याकोऱ्या आणि संपूर्ण मालिकाविश्वातील पहिल्या एआय प्रयोगाविषयी बोलताना वाहिनीचे व्यवसाय प्रमुख अजय भालवणकर यांनी मालिकेची कथाकल्पना फुलवणं आणि एआय तंत्रज्ञानाच्या वापराचा योग जुळून यायला अंमळ वेळ लागल्याची माहिती दिली. ‘या मालिकेच्या कथानकावर आम्ही बरेच दिवस काम करत होतो, पण दोन काळात घडणाऱ्या या कथेचं चित्रीकरण करताना मर्यादा येत होत्या. दोन वेगळ्या कलाकारांना घेऊन करणं किंवा एकाच कलाकाराला रंगभूषेच्या साहाय्याने दोन वेगवेगळ्या रूपात दाखवायचा विचार केला तरी ते तितकं विश्वासार्ह किंवा प्रभावी ठरलं नसतं. मात्र सोनी एन्टरटेन्मेट समूहाचं संशोधन केंद्र आणि एआय तंत्रज्ञानावर सुरू असलेला त्यांचा अभ्यास यातून या प्रयोगाची कल्पना सुचली’, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा >>>६ हजारांसाठी झाला होता कंगना रणौतच्या को-स्टारचा खून, चार दिवसांनी घरातून कुजलेल्या अवस्थेत सापडलेला अभिनेत्रीचा मृतदेह

‘अॅनिमेशन-ग्राफिकसह अन्य तंत्रज्ञानाच्या बाबतीत सोनी कंपनी कायमच आघाडीवर राहिलेली आहे. सोनी वाहिनी समूहाचं टोकियो इथे मोठं संशोधन केंद्र आहे. शिवाय, बंगळूरु येथेही एक संशोधन केंद्र आहे. मधल्या काळात एआयसह आधुनिक तंत्रज्ञानासंदर्भात आमचं प्रशिक्षण सुरू होतं. त्यातून या तंत्रज्ञानाचा वापर मालिकेसाठी कसा करता येईल याच्या शक्यता दिसू लागल्या. गेले आठ महिने या मालिकेसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल यावर काम सुरू होतं’, असं भालवणकर यांनी सांगितलं.

याआधी इमेज-ग्राफिक तंत्रज्ञानाच्या वापराने कलाकारांना तरुण दाखवणं, सिक्स पॅक अॅब्ज दाखवणं असे प्रयोग हिंदी चित्रपटातून आपण कैकदा पाहिले आहेत. मात्र अशा पद्धतीने काम करतानाही ६ ते ८ महिन्यांचा कालावधी लागतो. इथे आम्ही दैनंदिन मालिकेसाठी एआयच्या वापराचा विचार करत होतो. जनरेटिव्ह एआय या एआय तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक आवृत्तीचा वापर करत सोनी वाहिनीने या मालिकेसाठी स्वतंत्रपणे खास एआय आधारित डिझाईन तयार केलं आहे. असा प्रयोग पहिल्यांदाच केला गेला आहे, अशी माहितीही भालवणकर यांनी दिली. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या काळातील कथा समांतर पद्धतीने या मालिकेत दाखवण्यात येणार आहेत.

अशा पद्धतीने एकाच वेळी दोन वेगवेगळ्या काळातील भूमिका साकारायच्या तर कलाकारही तितकाच ताकदीचा असावा लागतो. त्यामुळे अभिनेता सुबोध भावे यांना डोळ्यासमोर ठेवूनच ही कथा लिहिण्यात आली होती. त्यांनाही पहिल्यांदा या प्रयोगाची कल्पना देण्यात आली तेव्हा निश्चितच ती वेगळी वाटली, असं त्यांनी सांगितलं. सुबोध भावे आणि अभिनेत्री शिवानी सोनार यांची मुख्य भूमिका असलेली ‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi serial world first ai experiment amy
Show comments