सध्या समाजात खासकरुन तरुणाई सिगरेट, दारु, पान मसाला अशा तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी अधिक जाताना दिसत आहे. यामुळे आधीपेक्षाही तंबाखूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नेमकी हाच विषय घेत सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापिठाच्या तरुणांनी एकत्र येऊन सामाजिकतेचे भान जपत ‘काहुर’ या लघुचित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाखविण्यात येणार आहे. नितिन बनसोडे लिखित काहुर या लघुचित्रपटाच्या निर्मितीमध्ये तुषार रणवरे, नागेश नितृडकर व निलेश बुधावले या तिहेरी जोडीचे योगदान आहे.
लघुचित्रपटाची कथा सर्वसामान्य कुटुंबात घडणारी आहे. चौथीत शिकणारी मुलगी वडिलांना सतत तंबाखू खाताना पाहत असते. इतरांप्रमाणे तिलादेखील हे नित्याचे झाले असताना अचानक शाळेतील बाई विद्यार्थ्यांना तबांखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देतात. ती माहिती ऐकून शालुची होणारी मानसिक कोलाहल व वडिलांची तंबाखू सोडवण्यासाठीचा प्रवास या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. चित्रपटाच्या प्रवासाबाबत बोलताना तुषारने सांगितले की, अतिशय कडाक्याच्या थंडीत मावळ परिसरात पहाटेच्यावेळी पाहिजे असलेल्या दृश्यांसाठी चित्रपटाची अठरा जणांची टीम कशाचीही तमा न बाळगता काम करत होती.
लघुचित्रपटाची कथा अतिशय साधी सरळ आपल्या आजू-बाजूला घडणारी असली तरी कलाकारांनी केलेल्या मेहनतीमुळे ती हृदयाला चटकन स्पर्श करुन जाते. लघुपटात वडिलांच्या भूमिकेत नितीन बनसोडे, मुलीच्या भूमिकेत गौतमी काची तर आईच्या भूमिकेत सारिका काची यांनी काम केले आहे.