मुंबईत काल दोन दसरा मेळावे पार पडले यातील एक दसरा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा तर दुसरा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा. या दोन्हीही दसरा मेळाव्यात आरोप-प्रत्यारोप, टोलेबाजी, टीका करण्यात आली. त्यामुळे हे दसरा मेळावे चांगलेच गाजले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी अनेक कलाकारांनीही उपस्थिती दर्शवली. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. या दसरा मेळाव्याला गायक अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकरने हजेरी लावली.
या दसरा मेळाव्यात अवधूत गुप्तेंनी शिवसेना शिवसेना हे गाणं सादर केले. नव्या जोमात हे गाणं सादर झाल्याने हजारो शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमातही ते हजर होते. यावेळी त्यांनी लोकनाथ हे गाणं गायलं होतं. या दोन्हीही कार्यक्रमानंतर अवधूत गुप्ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र नुकतंच त्यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना याबद्दल स्पष्टीकरण दिलं.
आणखी वाचा : ‘बाळासाहेबांच्या मुलाने काय केलं…?’ शरद पोंक्षेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
अवधूत गुप्ते यांनी नुकतंच ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना याबद्दल प्रतिक्रिया दिली. त्यात ते म्हणाले, “कलाकार हा फक्त कलाकार असतो. मी याआधी अनेक पक्षांसाठी गाणी गायली आहेत. ती लिहिली आहेत. तसेच संगीतबद्धही केली आहेत. मी खास शिंदे गटासाठी असं काही वेगळं गाणं केलेलं नाही. महेश-चिनार यांनी बनवलेले गाणे मी फक्त सादर केले. मी शिंदे गटासाठी गाणं गातो याचा अर्थ मी त्या पक्षाचे सदस्यत्व घेतलं, असं होत नाही.”
आणखी वाचा : आलिया भट्टच्या चेहऱ्यावर दिसला प्रेग्नन्सी ग्लो, डोहाळे जेवणाचे फोटो समोर
दरम्यान एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याला अनेक कलाकार उपस्थित होते. यात अभिनेता प्रसाद ओक, दिग्दर्शक- लेखक प्रविण तरडे, ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, गायक नंदेश उमप यांनी हजेरी लावली. यावेळी शरद पोंक्षे यांनी भाषण केले. तर एकनाथ शिंदेंचे व्यासपीठावर आगमन होताच प्रसाद ओक आणि प्रवीण तरडेंनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष एकनाथ शिंदेंना समर्थन दिले. यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. तसेच याची सर्वत्र चर्चाही रंगली आहे.