१४ फेब्रुवारीला देशभरात ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात औरंगजेब चर्चेत आहे. समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू आझमी यांनीही औरंगजेब हा उत्तम शासक होता, असं म्हटलं होतं. त्यानंतरही बराच वाद निर्माण झाला. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज नगरमधील खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर हटवून टाकावी, अशी मागणी केली जात आहे. याच मागणीला घेऊन राज्यभरात आंदोलनं, निर्दर्शनं केली जात आहेत. विशेष म्हणजे या मागणीला राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे.

सध्या महाराष्ट्रात औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा प्रचंड गाजत आहे आणि त्यामुळे अनेक वाददेखील निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहेत. पण, या वादामुळे राज्यातील इतर महत्त्वाचे मुद्दे बाजूला राहत असल्याचीही प्रतिक्रिया अनेकांकडून व्यक्त केली जात आहे. राज्यात महिला संरक्षण, शिक्षण, नोकरभरती, भ्रष्टाचार अशा अनेक समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे, अशा आशयाची मते अनेक जण व्यक्त करीत आहेत. अशातच मराठी गायक मंगेश बोरगांवकरनेदेखील (Mangesh Borgaonkar) या संपूर्ण परिस्थितीवर मत मांडलं आहे.

‘सारेगमप’मधून घराघरांत पोहोचलेला गायक मंगेश बोरगांवकर (Mangesh Borgaonkar) हा त्याच्या सुमधुर आवाजामुळे चर्चेत असतो. तो चित्रपट गीतं किंवा अल्बममधील गाणी गात प्रेक्षकांचं मनोरंजन करीत असतो. आपल्या सुमधुर आवाजानं चर्चेत राहणारा मंगेश सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करीत असतो. त्याचबरोबर तो त्याच्या गाण्यांचे व कार्यक्रमांचेही व्हिडीओ शेअर करीत असतो. अशातच त्यानं सध्याच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीवर मत मांडणारी करणारी पोस्ट शेअर केली आहे.

मंगेश बोरगांवकर इन्स्टाग्राम स्टोरी

मंगेशनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक कार्टून चित्र असलेली पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये महागाई, बेरोजगारी, गुंडगिरी, हत्या, कायदा, शेतकरी आत्महत्या, आर्थिक परिस्थिती, पाणी समस्या आणि असे राज्यातील अनेक प्रश्न असलेली कार्डे ठेवण्यात आली आहेत. मात्र, या सगळ्यात ‘औरंगजेबाची कबर’ असं लिहिलेलं एक कार्ड आहे आणि इतर सर्व कार्डांपेक्षा त्याला महत्त्व देण्यात आलं आहे. हेच कार्टून मंगेशनं शेअर करीत असं म्हटलं आहे, “वर्तमान…. भविष्याचे मूलभूत प्रश्न समोर असताना भूतकाळात रमणारे आपण. आपल्याला शत्रूची गरज नाही; आपणच पुरे आहोत!”

दरम्यान, औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात काही दिवसांपासून वातावरण तापलं आहे. ही कबर काढून टाकावी, अशी मागणी अनेकांनी केली आहे. विश्व हिंदू परिषदेने यासाठी काल (१७ मार्च) मोठं आंदोलन पुकारलं. मात्र, या आंदोलनाला गालबोट लागलं असून, दंगलसदृश स्थिती निर्माण झाली. परिणामी आजही नागपूरमधील काही भागांत तणावपूर्ण शांतता असून, संचारबंदी लागू करण्यात आली आहे.