हिंदीसह मराठी कलाविश्वात गेल्या काही दिवसांपासून ‘Mrs’ आणि ‘स्थळ’ या सिनेमांची जोरदार चर्चा चालू आहे. आजही देशातील अनेक भागात स्त्रियांना लग्नानंतर कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं, सासरी वेळोवेळी एका महिलेच्या कशा परीक्षा घेतल्या जातात… या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना ‘Mrs’ आणि ‘स्थळ’ या सिनेमांमध्ये पाहायला मिळतात. या दोन चित्रपटांबद्दल इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत प्रसिद्ध मराठी संगीतकार व गायक सलील कुलकर्णी यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
गायक सलील कुलकर्णी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा सामाजिक विषयांवर भाष्य करतात. क्रिकेट तसेच मनोरंजन विश्वात घडणाऱ्या अनेक घडामोडींबद्दल सलील कुलकर्णी पोस्ट शेअर करत आपली मतं मांडतात. त्यांनी नुकतीच ‘Mrs’ आणि ‘स्थळ’ या सिनेमांबद्दल लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
सलील कुलकर्णी यांची पोस्ट
‘Mrs’, ‘The Great Indian Kitchen’ आणि ‘स्थळ’ चित्रपट
‘पुरी पाईपलाईन बदलनी पडेगी…’ सगळं बदलायला हवं आहे… तुंबलंय पाणी आणि पाण्यात कचरा.. वर्षानुवर्षांचा…
तिला एका स्टूलवर बसवून, तिच्याकडे एक ‘स्थळ’ म्हणून पाहायचं आणि चर्चा करून सांगतो सांगायचं. मुलीचा बाप आशाळभूत नजरेने पाहणार.. मग आमच्या घरात चटणी नेहमी पाट्या वरवंट्यावरच होते, मिक्सरमध्ये नाही.. आणि बाईच्या हातचं आमच्या सासऱ्यांना चालत नाही. म्हणून मग .. तिने सगळं नवीन शिकायला हवं. उडप्याच्या हॉटेलात ऑर्डर दिल्यासारखे दोन चहा.. दोन कॉफी.. आणि नंतर त्यावर…आमची आई करते तशी नाही जमली असं म्हणून सगळ्या कष्टांची माती…
असे किती कमावणार तू ? त्यापेक्षा घर सांभाळ…
समजा… एका मोठ्या पदावरच्या स्त्रीने तिच्यापेक्षा पन्नास हजार कमी पगार असणाऱ्या नवऱ्याला असं सांगितलं तर? की मी जास्त कमावते, तू घरी थांब आणि सगळं बघ.. ०.८ टक्के पुरुष असं करत असतीलही… पण तेवढेच…
स्वतःची खोली, अभ्यासाची जागा, लाडका आरसा आणि तिला जीवापलीकडे जपणारे आई-बाबा… सगळं सोडून ती येते, ती सतत परीक्षा द्यायला का??
‘स्थळ’ या चित्रपटामध्ये MPSCची परीक्षा द्यायचं स्वप्नं बघत अभ्यास करणाऱ्या आणि कधीच परीक्षा देऊ न शकलेल्या विदर्भातल्या छोट्या गावातल्या मुलीपासून ते हिंदीतल्या Mrs. आणि त्याची मूळ आवृत्ती असलेल्या.. ‘द ग्रेट इंडियन किचन’ ( मल्याळम ) मधल्या Choreography करणाऱ्या आजच्या शहरातल्या मुलीला जेव्हा, डान्स तुझी हॉबी आहे ना.. मग त्याचा व्यवसाय वगैरे नको, त्याची नोकरी पण नको आणि आता बाळ झालं की कुठे जमणार आहे तुला ? असं विचारलं जातं.
सासऱ्यांची बहीण जेव्हा घरी येऊन, तुझ्या सासूला पण मीच शिकवलं सगळं, असं म्हणते… तेव्हा, त्या म्हाताऱ्या कर्मठ वाटणाऱ्या सासूने सुद्धा सगळी स्वप्नं पाट्या-वरवंट्यावर चटणीबरोबर रगडली असणार हे जाणवतं. प्रत्येक स्त्रीला ‘सून’ म्हणून द्यायला लागणारी परीक्षा आणि वरवर मॉडर्न, पुरोगामी, व्यापक दृष्टिकोन वगैरे बोलणारे जेव्हा आमच्या घरच्या सुनेने नोकरी केली तर लोक काय म्हणतील असं म्हणतात…तेव्हा ‘Mrs.’ मधला हा संवाद फार योग्य वाटतो ..
‘पुरी पाईप लाईन बदलनी पडेगी’
वरवर सारे शिंपण, काही आतून उमलत नाही गं … अजून उजाडत नाही गं!! (आम्ही मल्याळमच बघतो, हिंदी नाही.. असे जे सांगत असतील त्यांनी मल्याळममध्ये पाहा.. कुणी हिंदीत पाहा.. पण बघा आणि विचार करा .. Mrs ( झी ५ वर आहे ) आणि आपला ‘स्थळ’ हा आपला मराठी चित्रपट आम्ही चित्रपटगृहात पाहिला.
नेटकऱ्यांनी या पोस्टवर कमेंट्स करत सलील कुलकर्णी यांचं कौतुक केलं आहे. दरम्यान, ‘स्थळ’ या मराठी चित्रपटाबद्दल सांगायचं झालं, तर सचिन पिळगांवकर प्रस्तुत आणि जयंत सोमलकर लिखित-दिग्दर्शित ‘स्थळ’ चित्रपटात अभिनेत्री नंदिनी चिकटे प्रमुख भूमिकेत झळकली आहे. या सिनेमावर अनेक दिग्गजांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.