मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नेहमीच त्याच्या खेळाबरोबर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. जितका मन लावून तो क्रिकेट खेळतो किंवा क्रिकेटचे सामने बघतो तितकंच मन लावून तो एखाद्या कलेचंही सादरीकरण बघतो. तो कलाप्रेमी आहे. नुकतीच एका लोकप्रिय मराठी शास्त्रीय गायिकेला सचिन तेंडुलकर आणि त्याच्या जवळच्या व्यक्तींसाठी खासगी मैफिल करण्याची संधी मिळाली. त्याचा अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर करत सचिन तेंडुलकर आणि अंजली यांचा स्वभाव कसा आहे हे सांगितलं.
बेला शेंडेची बहिण लोकप्रिय शास्त्रीय गायिका सावनी शेंडे सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या कार्यक्रमाबद्दल आणि कार्यक्रमांदरम्यान आलेल्या अनुभवांबद्दल चाहत्यांना अपडेट्स देत असते. नुकतीच तिला खास सचिन तेंडुलकरसमोर गायची संधी मिळाली. यादरम्यानचा अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आणखी वाचा : “मराठी रंगभूमीला मानाचे स्थान…” सचिन तेंडुलकरची ‘विक्रमवीर’ प्रशांत दामलेंसाठी खास पोस्ट
सावनी शेंडेने तिचे आणि सचिन तेंडुलकरचे काही फोटो पोस्ट करत लिहिलं, “काल खास भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासाठी शास्त्रीय गायन करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे. क्रिकेटचा देव माझ्यासमोर बसून शास्त्रीय संगीत ऐकत होता… माझा आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे खरोखरच शब्द नाहीत. काय व्यक्तिमत्त्व आहे त्यांचं! खूप साधे, नम्र आणि समोरच्याला खूप आदर देणारे. मी शास्त्रीय संगीतातील बारकावे सांगितल्यावर ते ज्या प्रकारे तल्लीन होऊन आणि मन लावून शास्त्रीय गायन ऐकत होते ते खरंच बघण्यासारखं होतं.”
पुढे तिने लिहिलं, “अंजलीदेखील स्वभावाने खूप चांगल्या आहेत… हॅट्स ऑफ. विक्रम आणि निलेश, मला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. ही माझ्यासाठी अविस्मरणीय आठवण राहील. कायम माझ्या हृदयाजवळ असेल. कार्यक्रमाचा क्षण अन् क्षण एन्जॉय केल्याबद्दल सचिन आणि अंजली तुमचे खूप आभार.” तर आता सावनी शेंडेची या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं असून त्यावर नेटकरी कमेंट करत तिच्याबद्दल आनंद व्यक्त करत आहेत.