‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढूनी खेळ खेळूया नवा’, हे गाणे वाजू लागले की अनेकांच्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे लाडके भावोजी, म्हणजेच आदेश बांदेकर. सर्वसामान्य गृहिणींना तारकांप्रमाणे सर्वांसमोर आणत त्यांच्या संसाराची गोष्ट, सहजीवनाचा प्रवास खेळीमेळीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. गेल्या १३ वर्षांपासून हा कार्यक्रम अविरतपणे सुरु आहे. ‘होम मिनिस्टर’च्या लोकप्रियतेमध्ये बांदेकरांच्या खुमासदार सुत्रसंचालनासोबतच आणखी एका गोष्टीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ती गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाचे शीर्षक गीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘दार उघड बये… दार उघड…’ अशी आरोळी ठोकत संध्याकाळी सातच्या ठोक्याला हे गाणं घराघरात वाजतं. त्यावेळी अनेकजण त्यावर ठेकाही धरतात. नकळत प्रेक्षक या गाण्याच्या ठेक्यावर टाळ्यांची साथ देतात. अशा या भन्नाट गाण्याचे एक नवे व्हर्जन ‘मराठी मीम्स’ या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आले आहे. मनोज शिंगुस्टेच्या कलात्मकतेची झलक या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. यामध्ये जस्टिन बिबरच्या कॉन्सर्टमधील एका व्हिडिओचे आणि ‘होम मिनिस्टर’च्या शीर्षक गीताचे सुरेख मिश्रण करण्यात आले आहे. त्यामुळे खुद्द जस्टिन आणि त्याचे साथीदारच ‘होम मिनिस्टर’चे हे गीत गाण्यात व्यग्र असल्याचा भास होत आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ प्रचंड गाजत असून, हजारो युजर्सनी तो लाइक आणि शेअर केला आहे.

वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा

‘चला मराठी परत यो बनवू’ या टॅगलाइनअंतर्गत या फेसबुक पेजवर असे बरेच व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत. सोशल मीडियाचे वाढते प्रस्थ पाहता मीम्स आणि अशा प्रकारचे व्हिडिओ सध्या बरीच लोकप्रियता मिळवत आहेत. तेव्हा ‘होम मिनिस्टर’चा हा व्हिडिओ पाहून खुद्द ‘बांदेकर भावोजीं’ची काय प्रतिक्रिया असणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.