‘टेक्स्टाईल इंजिनीअर’असलेल्या ‘त्या’ देखण्या आणि भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा आंतरगिरणी नाटय़ स्पर्धामधून अभिनय प्रवास सुरू झाला. इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी मिळालेली असतानाही नाटकातून काम करतो म्हणून घरच्यांची नाराजीही त्यांनी पत्करली. पण ‘अभिनय’ हेच त्यांचे ध्येय, आवड आणि तळमळ होती. व्यावसायिक रंगभूमीबरोबरच मराठी, हिंदी, गुजराती, मारवाडी अशा विविध भाषांतील सत्तर चित्रपटांतूनही त्यांनी विविध भूमिका साकारल्या. व्यावसायिक रंगभूमीवर तीस ते पस्तीस नाटकांचे साडेपाच हजारांहून अधिक प्रयोग केले. दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका तसेच काही टेलिफिल्ममध्येही काम केले. भारदस्त आवाजाची देणगी लाभलेले ते व्यक्तिमत्त्व आहे बाळ धुरी यांचे. वयाच्या ७२व्या वर्षांत असलेल्या धुरी यांनी आता व्यावसायिक नाटकातून काम करणे थांबविले असले तरी चांगली भूमिका मिळाली तर चित्रपट किंवा मालिकेतून काम करण्याची त्यांची आजही तयारी आहे. लवकरच त्यांचे ‘आक्रंदन’ आणि ‘चंद्रभागा’ हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत तर पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या एका नवीन मराठी वाहिनीवरील मालिकेतही ते दिसणार आहेत.
बाळ धुरी यांचे खरे नाव ‘भिवाजी’. पण घरात भावडांमध्ये ते सगळ्यात शेंडेफळ असल्याने लहानपणापासूनच त्यांना ‘बाळ’ असे संबोधू लागले आणि ‘भिवाजी’ऐवजी ते ‘बाळ’ म्हणूनच प्रसिद्ध झाले. ‘पुनर्भेट’च्या निमित्ताने गप्पांची सुरुवात ‘रामायण’ या प्रसिद्ध मालिकेत त्यांनी साकारलेल्या ‘दशरथ’ या भूमिकेच्या विषयापासूनच झाली. मालिकेत धुरी यांच्या पत्नी आणि अभिनेत्री जयश्री गडकर यांनी ‘कौसल्या’ साकार केली होती. ‘रामायण’च्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, रामानंद सागर यांच्या कार्यालयात चित्रीकरणासंदर्भात चर्चा करण्यासाठी जयश्रीला बोलाविले होते. दीनानाथ नाटय़गृहात माझ्या ‘काचेचा चंद्र’ या नाटकाचा प्रयोग होता. जयश्रीला सागर यांच्या कार्यालयात सोडून मी पुढे प्रयोगाला जायचे असे आमचे ठरले. आम्ही दोघेही सागर यांच्या कार्यालयात गेलो. जयश्रीने माझी सागर यांच्याशी ओळख करून दिली आणि मी प्रयोगाला निघून गेलो. त्याच दिवशी रात्री सागर यांचा घरी दूरध्वनी आला आणि त्यांनी भेटायला या, असा निरोप दिला. दुसऱ्या दिवशी मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी माझ्यापुढे थेट ‘दशरथ’ आणि ‘मेघनाथ’ या दोन भूमिकांचे पर्याय ठेवले. मला ‘दशरथ’ करायला आवडेल, असे मी त्यांना म्हणालो. त्यावर सागर यांनी ‘दशरथ’ ही भूमिका तीन/चार भागांपुरतीच असून तुम्ही ‘मेघनाथ’ करा, कारण ती भूमिका मालिकेच्या अनेक भागांमध्ये आहे, असे सांगितले. त्यावर मी त्यांना नम्रपणे नकार देत मला ‘दशरथ’च करायचाय असे ठामपणे सांगितले आणि मी ‘दशरथ’ झालो. माझे काम पाहून फक्त तीन/चार भागांपुरती असलेली ही भूमिका पुढे त्यांनी २० ते २२ भागांपर्यंत वाढविली. ‘रामायण’ मालिकेने मला खूप नाव व प्रसिद्धी मिळाली. मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार ‘मंथरा’ ही भूमिका करत होत्या. एकदा त्या रामानंद सागर यांच्याकडे गेल्या आणि त्यांनी ‘बाळ सारखा देखणा अभिनेता असताना तुम्ही त्यांना ‘राम’ का नाही केले?’ अशी विचारणा त्यांच्याकडे केली. त्यावर सागर यांनी धुरी यांना ‘राम’ केले असते तर लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि सीता या भूमिकांसाठीचे कलाकारही धुरी यांच्या उंचीचे व त्यांना शोभतील असे घ्यावे लागले असते, असे उत्तर ललिता पवार यांना दिले. ‘रामायण’ मालिकेनंतर आम्ही ‘रामायण संध्या’ हा कार्यक्रम देशभरात विविध ठिकाणी केला. मालिकेतील काम करणारे कलाकार थेट रंगभूमीवर पाहायला मिळत असल्याने हा कार्यक्रमही खूप लोकप्रिय ठरला.
धुरी कुटुंबात बाळ हे सगळ्यात शेंडेफळ. त्यांना चार मोठे भाऊ. सगळे कला, वाणिज्य शाखेतील पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले. त्यामुळे बाळ ‘इंजिनीअर’ व्हावा, असे घरच्यांना वाटले. मुंबईच्या ‘व्हीजेटीआय’ मधून ते ‘टेक्स्स्टाईल इंजिनीअर’ झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेताना रंगभूमी किंवा नाटकाशी त्यांचा कधीही संबंध आला नाही. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते ‘पिरामल’मध्ये नोकरीला लागले. तेथे त्यांनी आंतरगिरणी स्पर्धेत ‘काचेचा चंद्र’ हे नाटक केले. उषा कलबाग म्हणजे आत्ताच्या उषा नाडकर्णी या अभिनेत्री त्यांच्यासोबत नाटकात होत्या. स्पर्धेत त्यांचे नाटक पहिले आलेच पण धुरी यांनाही उत्कृष्ट अभिनेता म्हणून पारितोषिक मिळाले. परीक्षक म्हणून मो. ग. रांगणेकर, शं. ना. नवरे हे मान्यवर होते. पुढे ‘आयएनटी’साठी वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘बेकेट’ या नाटकासाठी त्यांना विचारणा झाली. सतीश दुभाषी, बाळ धुरी, रवी पटवर्धन त्यात होते. ८६ वर्षांचा बिशपचा सेवक, ५५ वर्षे वयाचा वकील आणि २५ वर्षांचा तरुण अशा तीन भूमिका त्यांना या नाटकात मिळाल्या. ‘आयएनटी’चे संस्थापक दामूभाई झवेरी यांनी धुरी यांचे हे काम पाहिले होते. त्यांच्यामुळे धुरी यांना राज्य नाटय़ स्पर्धेत ‘गुरू’ हे नाटक करण्याची संधी मिळाली. आणि त्यानंतर धुरी यांचा व्यावसायिक रंगभूमीवरील प्रवास सुरू झाला. ‘गुरू’नंतर त्यांना व्यावसायिक रंगभूमीवर चार नाटके मिळाली. एकाच वेळी त्यांच्या या नाटकांचे प्रयोग सुरू होते. ‘मवाली’, ‘डंख’, ‘गारंबीचा बापू’, ‘काचेचा चंद्र’, ‘थँक्यू मिस्टर ग्लाड’, ‘गुड बाय डॉक्टर’, ‘मृत्युंजय’, ‘पहाटवारा’, ‘क्षण एक पुरे’ ही त्यांची काही गाजलेली नाटके. आजवरच्या नाटय़ प्रवासात धुरी यांनी मोहन वाघ यांच्या ‘चंद्रलेखा’ नाटय़संस्थेत सर्वात जास्त नाटके केली. ‘अमेय थिएटर्स’, ‘नाटय़संपदा’ या नाटय़संसंथेच्या नाटकातूनही त्यांनी भूमिका केल्या.
शिवाजी सावंत लिखित आणि राम मुंगी दिग्दर्शित ‘मृत्युंजय’ हे धुरी यांच्या रंगभूमीवरील प्रवासातील महत्त्वाचे नाटक. या नाटकातील ‘कर्ण’ ही भूमिका करण्यास अनेक जण उत्सुक होते, पण ती भूमिका धुरी यांना मिळाली. कोहिनूर गिरणीत कामाला असलेले दादा रेडकर आणि शिवाजी सावंत यांचा परिचय होता. नाटकातील कर्णाच्या भूमिकेसाठी शिवाजी सावंत कलाकाराच्या शोधात होते. रेडकर यांच्या सांगण्यावरून शिवाजी मंदिर येथे धुरी यांचे ‘गारंबीचा बापू’ हे नाटक पाहायला सावंत आले आणि नाटक पाहिल्यानंतर त्यांनी ‘मृत्युंजय’मधील ‘कर्ण’ ही भूमिका धुरी करणार यावर शिक्कामोर्तब केले. व्यावसायिक रंगभूमीवर नाटकांचे प्रयोग, दौरे आणि तालमी यांच्यात व्यग्र झाल्यानंतर धुरी यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.
‘थँक्यू मिस्टर ग्लाड’च्या एका प्रयोगाच्या वेळी घडलेला प्रसंग त्यांच्या आजही स्मरणात आहे. बाळ धुरी तुरुंगात कैदी असतात आणि प्रभाकर पणशीकर त्यांना लाकडी रुळ फेकून मारतात असा प्रसंग नाटकात होता. एका प्रयोगाच्या वेळी पणशीकर यांनी मारलेला लाकडी रुळ नेमका धुरी यांच्या उजव्या डोळ्याच्या खाली लागला आणि रक्त यायला लागले. त्याही अवस्थेत त्यांनी सुधा करमरकर यांच्यासोबत पुढील प्रवेश पार पाडला. प्रयोगानंतर ते गिरगावात डॉ. तेलंग यांच्याकडे गेले. डोळ्याच्या खाली गंभीर दुखापत झाली असल्याने त्या जागी सहा टाके घालावे लागले. टाके घातलेल्या अवस्थेत धुरी यांचे नाटकाचे प्रयोग सुरूच होते. काही दिवसांनी ते पुन्हा डॉक्टरांकडे टाके काढायला गेले तेव्हा डॉक्टर म्हणाले, अहो सहा टाके घातले होते. पाचच दिसताहेत. त्यावर धुरी यांनी त्यांना एक कुठे तरी स्टेजवर पडला असेल, असे हसत हसत सांगितले. धुरी यांच्या डोळ्याच्या खाली आजही त्या जखमेची खूण आहे.
मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री जयश्री गडकर आणि बाळ धुरी यांचा विवाह २१ फेब्रुवारी १९७५ मध्ये झाला. विवाहाच्या वेळी जयश्री गडकर या मराठी चित्रपटातील आघाडीच्या नायिका होत्या, तर त्यांच्या तुलनेत बाळ धुरी यांची नाटक-चित्रपटातून सुरुवात झालेली होती. या दोघांचा विवाह ‘प्रेमविवाह’ असेल असे अनेकांना वाटते. पण हा प्रेमविवाह नव्हता तर ठरवून केलेले लग्न होते. नाटय़निर्माते मोहन वाघ यांचे साडू वासू कोल्हटकर यांच्या मध्यस्थीने हा विवाह जुळून आला. लग्नानंतर एकमेकांनी दोघांवर तसेच अभिनय करण्यावर कोणतीही बंधने घातली नाहीत. दोघांनीही एकमेकांना सांभाळून संसार सुखाचा केला आणि अभिनयाची आघाडीही सांभाळली. एकाच व्यवसायातील असूनही कोणताही वाद, ईर्षां किंवा स्पर्धा या दोघांच्याही नात्यात नव्हती. त्यामुळे दोघांचा विवाह सुखी व यशस्वी ठरला. २००८ मध्ये जयश्री यांचे निधन झाले आणि ३३ वर्षांचे सहजीवन संपले.
शरद पिळगावकर यांच्या ‘नाव मोठं लक्षण खोटं’ या चित्रपटापासून मराठी रुपेरी पडद्यावरील त्यांचा प्रवास सुरू झाला. ‘चिमणी पाखरं’, ‘पाहुणी’, ‘दरोडेखोर’, ‘मुंबई ते मॉरिशस’, ‘बंध प्रेमाचे’, ‘सद्रक्षणाय’, ‘पैज लग्नाची’ हे त्यांचे काही चित्रपट. बाळ धुरी व जयश्री गडकर यांनी ‘तुळजाभवानी’, ‘पंढरीची वारी’, ‘रथ जगन्नाथाचा’, ‘सासर माहेर’, ‘अशी असावी सासू’, ‘सवत’, ‘सून माझी लक्ष्मी’ या चित्रपटांतून एकत्र काम केले. हिंदीतही त्यांनी ‘ईश्वर’, ‘सौतन की बेटी’, ‘तेरे मेरे सपने’ आदी मोजक्या चित्रपटात भूमिका केल्या. पण हिंदीतील एकूणच वातावरण, कटू अनुभव आणि हिंदीतील काही गोष्टी न पटल्याने ते हिंदीत फारसे रमले नाहीत. संजय खान यांच्या ‘ग्रेट मराठा’ या हिंदूी मालिकेत धुरी यांनी ‘थोरले बाजीराव’ तर हेमा मालिनी यांच्या ‘आम्रपाली’ मालिकेत आम्रपालीचे ‘वडील’ आणि ‘गुरू’ अशा दोन भूमिका साकारल्या.
दूरचित्रवाहिन्यांवरील वृत्तवाहिन्या व क्रीडा वाहिन्या पाहणे ही धुरी यांची आवड आहे. वाचन, पूजा-अर्चा ही त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. गप्पांच्या शेवटी त्यांनी सांगितले, मी आजवरच्या आयुष्यात नेहमीच सकारात्मक विचार करत आलो. जीवनात नकारात्मकता आणि भूतकाळात रमणे मला आवडत नाही. आपले आयुष्य आनंदात आणि समाधानात जावे, असे वाटत असेल तर दोन गोष्टी सगळ्यांनी कायम लक्षात ठेवाव्यात. पहिली म्हणजे आपण दुसऱ्यांसाठी जे काही चांगले केले असेल ते आणि दुसरी म्हणजे दुसऱ्याने आपल्यासाठी जे काही वाईट केले असेल ते हे दोन्ही पूर्णपणे विसरून जावे, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे. भूतकाळामुळे आपला वर्तमानकाळ खराब होतो आणि वर्तमान खराब झाल्यामुळे त्याचा परिणाम भविष्यकाळावर होऊन तोही वाईट होतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आजच्या वर्तमानाचा विचार करावा आणि आनंदात जगावे.
धुरी यांनी हे तत्त्वज्ञान प्रत्यक्ष त्यांच्या जीवनात आचरणात आणले आहे आणि आजही ते त्याप्रमाणे आचरण करत आहेत..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा