दिग्दर्शक मंगेश कदम, विजय केंकरे हे दिग्दर्शित करीत असलेली नवी नाटके, अभिनेता भरत जाधव साकारणार असलेले ‘मोरूची मावशी’, अभिनेते प्रशांत दामले यांची भूमिका असलेले विनोदी नाटक आणि अन्य काही नवीन नाटके रसिकांना नव्या वर्षांत पाहायला मिळणार आहेत. मराठी व्यावसायिक नाटय़निर्माता संघातर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी पुढील महिन्यात मुंबईत होणार आहे.
भरत जाधव साकारणार ‘मोरूची मावशी’
दूरदर्शन मालिका, चित्रपट आणि नाटकातून अत्यंत व्यस्त असलेला अभिनेता भरत जाधव याचे नवीन नाटक रसिकांना पाहायला मिळणार आहे. या नाटकात भरत जाधव एका वेगळ्या ‘लूक’मध्ये दिसणार आहे. आचार्य अत्रे लिखित ‘मोरूची मावशी’ हे जुने नाटक याच महिन्यात रंगभूमीवर येत आहे. अभिनेते विजय चव्हाण यांनी रंगविलेली ‘मोरूची मावशी’ आता भरत जाधव साकारणार आहे. भरत या भूमिकेत कसा दिसतो आणि काम करतो याची उत्सुकता रसिकांना आहे.
‘सुयोग’ची चार नाटके
दर्जेदार नाटके सादर करण्याची परंपरा जोपासणाऱ्या ‘सुयोग’ या नाटय़संस्थेतर्फे या नव्या वर्षांत चार नाटके सादर होणार आहेत. अशोक पाटोळे लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘चल थोडं एन्जॉय करू’, याच जोडीचे ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’, तसेच मिहिर राजदा लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या नाटकाचा यात समावेश आहे. रत्नाकर मतकरी लिखित आणि मंगेश कदम दिग्दर्शित ‘चि. सौ. कां. चंपा गोवेकर’ हे यापूर्वी रंगभूमीवर सादर झालेले नवे नाटकही पुन्हा एकदा नव्याने याच वर्षांत सादर होणार आहे.
भद्रकाली प्रॉडक्शनचे ‘हलकं फुलकं’
भद्रकाली प्रॉडक्शनतर्फे ‘हलकं फुलकं’ हे नाटक पुन्हा नव्याने रंगभूमीवर सादर होणार आहे. काही वर्षांपूर्वी सादर झालेल्या या नाटकात विजय कदम आणि रसिका जोशी यांच्या मुख्य भूमिका होत्या. विजय पाटकर यांनी ते नाटक दिग्दर्शित केले होते.
प्रशांत दामले यांचे नवीन नाटक
‘नकळत दिसले सारे’ या नाटकातून एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आलेले अभिनेते प्रशांत दामले यांची प्रमुख भूमिका असलेले नवे नाटक याच वर्षांत रंगभूमीवर येणार आहे. हे नाटक प्रशांत दामले यांच्या पठडीला साजेसे म्हणजे निखळ करमणूक करणारे आणि विनोदी आहे. ‘नकळत दिसले सारे’ या नाटकात प्रशांत दामले यांनी अंध व्यक्तीची भूमिका साकारली आहे. त्यांच्या आजवरच्या भूमिकेपेक्षा ही वेगळी भूमिका आहे. या नाटकाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग येत्या १२ जानेवारी रोजी शिवाजी मंदिर येथे होत आहे.
व्यावसायिक नाटय़निर्माता संघाच्या एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी फेब्रुवारीत
मराठी व्यावसायिक नाटय़निर्माता संघातर्फे आयोजित एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी ३ ते ८ फेब्रुवारी २०१४ या कालावधीत माटुंगा येथील यशवंत नाटय़मंदिर येथे होणार आहे. मराठी रंगभूमीला नवे कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ मिळावेत या मुख्य उद्देशाने व्यावसायिक नाटय़निर्माता संघातर्फे या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या वर्षांत येणारी अन्य काही नाटके
सुरेश राजदा लिखित-दिग्दर्शित ‘बे दुणे पाच’. नाटय़ रूपांतर- अशोक पाटोळे. या नाटकात संतोष जुवेकर आणि विनय येडेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
अवनीश प्रॉडक्शनचे ‘अजूनही चांद रात आहे’, लेखिका- मालती मराठे. दिग्दर्शक-मंगेश कदम. तर प्रकाश भालेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘ब्लॅकमेल- कधी कधी बरं असतं’. हे नाटक श्री सार्थक प्रॉडक्शन सादर करत आहे.

Story img Loader