‘तुझं माझं ब्रेकअप’ आणि ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला साईंकित कामत लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. मिरांडा हाऊस या चित्रपटात साईंकित झळकणार असून या चित्रपटाच्या माध्यमातून तो मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.
राजेंद्र तालक दिग्दर्शित ‘मिरांडा हाऊस’ या चित्रपटाविषयी केवळ घोषणा करण्यात आली आहे. मात्र या चित्रपटातील प्रत्येक गोष्ट गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. आतापर्यंत या चित्रपटातील केवळ काही भूमिकांवरील पडदा दूर सारण्यात आला आहे. या चित्रपटात साईंकितसोबत मिलींद गुणाजी,पल्लवी सुभाष झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
चित्रपटाच्या नावावरूनच हा रहस्यमय चित्रपट असल्याचं दिसून येत आहे. मात्र साईंकित या चित्रपटात नक्की कोणती भूमिका साकारणार हे अद्याप स्पष्ट झालं नाही. त्यामुळे साईंकितच्या भूमिकेविषयी साऱ्यांनाच उत्सुकता आहे. आजवर साईंकितने सालस, समंजस तरीही वैविध्यपूर्ण अशा भूमिका साकारून प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. त्यामुळे या भूमिकेतूनही त्याचे वेगळेपण प्रेक्षकांसमोर येणार, यात शंका नाही.
या चित्रपटात साईंकितसोबत पल्लवी सुभाष, मिलिंद गुणाजी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘मिरांडा हाऊस’च्या निमित्ताने मिलिंद गुणाजीसुद्धा बऱ्याच काळाने मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. ‘अ रेनी डे’, ‘सावरिया.कॉम’ आणि ‘सावली’ असे वैविध्यपूर्ण विषय हाताळणाऱ्या राजेंद्र तलाक यांनी ‘मिरांडा हाऊस’चे दिग्दर्शन केले आहे. आयरिस प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती असलेला हा चित्रपट १९ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.