गेल्या शतकातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि न्यायमूर्ती महादेवराव रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवितकार्यावर आधारित ‘उंच माझा झोका या ‘झी मराठी’ वरील लोकप्रिय मालिकेची निरोपाची वेळ जवळ आली आहे. या चाकोरीबाहेरच्या, अभिनव मालिकेचा समारोप तितक्याच अभिनव पद्धतीने करण्यात येणार आहे. रविवारी १४ जुलैला संध्याकाळी ७ ते रात्री ९ या कालावधीत दोन तासांच्या टेलिफिल्मसदृश विशेष भागाने ‘उंच माझा झोका’ची सांगता केली जाणार आहे. आजवर रविवारी प्राइम-टाइममध्ये लघुपटसदृश विशेष भागाच्या रूपात कोणत्याही मालिकेचा समारोप करण्यात आलेला नाही. त्यामुळे सुरुवातीपासूनच वेगळे पायंडे पाडत आलेली ‘उंच माझा झोका’समारोपाच्या वेळीही स्वतःचा वेगळा ठसा उमटवून प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
रविवारी प्रक्षेपित होणा-या या निरोपाच्या भागात रमाबाईंचे अखेरच्या श्वासापर्यंतचे कार्य तर दाखवले जाईलच, शिवाय रमाबाईंच्या पश्चात् सुद्धा, त्यांनी केलेल्या स्त्री-सबलीकरणाच्या कार्याचा झोका आजही कसा उंच झुलत आहे, हेही दोन तासांच्या या विशेष कार्यक्रमात दाखवले जाणार आहे.
रमाबाई रानडे हे गेल्या शतकातील महाराष्ट्राच्या समाजकारणातील एक महत्त्वाचे नाव. पण त्यांचे कार्य प्रेक्षकांना म्हणावे तितके परिचित नव्हते. ‘उंच माझा झोका’च्या माध्यमातून ‘झी मराठी’ने प्रेक्षकांना रमाबाई आणि महादेवराव रानडे यांच्या व्यक्तिमत्वाची आणि कार्याची ओळख करून दिलीच. शिवाय तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचेही दर्शन घडवले. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात आलेला ‘उंच माझा झोका’ प्रेक्षकांना वेगळ्याच भावविश्वत घेऊन गेला, अनेकानेक पुरस्कारांचा मानकरी ठरला.’पिकोलो फिल्म्स’निर्मित, विरेन दिग्दर्शित’उंच माझा झोका’ला ज्येष्ठ साहित्यिक डॉ.विजया राजाध्यक्ष यांचे मार्गदर्शन लाभले. अरुणा जोगळेकर यांचे भावस्पर्शी संवाद, नीलेश मोहरिर यांनी संगीतबद्ध केलेले-जान्हवी प्रभू अरोरा यांनी गायलेले नितांतसुंदर शीर्षकगीत आणि तेजश्री वालावलकर-स्पृहा जोशी ( रमा ), विक्रम गायकवाड ( महादेवराव ), शरद पोंक्षे (गोविंदराव ), नीना कुळकर्णी ( आजी ), ऋग्वेदी विरेन ( माई ), संयोगिता भावे (सुभद्रा ), शर्मिष्ठा राऊत ( ताई ), कविता मेढेकर ( आई ), शैलेश दातार ( अण्णा) यांच्यासह विविध कलाकारांचा सहजसुंदर अभिनय यांमुळे ‘उंच माझा झोका’
रसिकांच्या मनाच्या कोंदणात कायम घर करून राहील, असा ‘झी मराठी’ला विश्वास आहे.

Story img Loader