मराठा साम्राज्याच्या इतिहासातील महत्त्वाचे पर्व असलेल्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईवर आधारित ‘पानिपत: द ग्रेट बेट्रेयल’ हा चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. त्यापूर्वी या चित्रपटातील पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. ‘मर्द मराठा’ असे या गाण्याचे बोल असून यामध्ये एकाच वेळी १३०० नर्तक थिरकले आहेत. अजय-अतुलने संगीतबद्ध केलेल्या या गाण्यात मराठमोळा साज अनुभवायला मिळत आहे.

मराठी आणि हिंदी भाषेचा वापर या गाण्यात करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील काही कलाकारांचे लक्षवेधी लूक समोर आले होते. राजू खान यांनी नृत्यदिग्दर्शित केलेल्या या गाण्यात अभिनेता अर्जुन कपूर, मोहनीश बहल, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, कृती सनॉन हे कलाकार तब्बल १३०० नर्तकांसोबत पाहायला मिळत आहेत. हे भव्यदिव्य गाणं चित्रीत करण्यासाठी १३ दिवसांचा काळ लागला. या गाण्याचे चित्रीकरण कर्जत येथे पार पडले. यासाठी कर्जतमध्ये शनिवारवाड्याची प्रतिकृती उभारण्यात आली होती. हे गाणं अजय-अतुलसोबत कुणाल गांजावाला, सुदेश भोसले, स्वप्नील बांदोडकर, पद्मनाभ गायकवाड आणि प्रियांका बर्वे यांनी गायलं आहे. तर जावेद अख्तर यांनी हे गाणं शब्दबद्ध केलं आहे.

आणखी वाचा : ‘पानिपत’चा ट्रेलर पाहून राज ठाकरे म्हणतात..

अटकेपार पोहोचलेल्या मराठय़ांनी लढलेल्या सर्वात मोठय़ा लढाईची गोष्ट या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर उलगडणार असल्याने एकीकडे या चित्रपटाबद्दल उत्सुकताही आहे. तर दुसरीकडे या चित्रपटात सदाशिवराव भाऊंच्या व्यक्तिरेखेला अर्जुन कपूर किती न्याय देऊ शकेल, यावरून समाजमाध्यमांवर चर्चेलाही उधाण आले आहे. यामध्ये अर्जुनसोबतच संजय दत्त व क्रिती सनॉन यांच्या मुख्य भूमिका आहेत. संजय दत्त यात अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत तर क्रिती पार्वतीबाईंच्या भूमिकेत आहे.

Story img Loader