अलिकडेच इटलीत गुप्तपणे चित्रपटकर्ता आदित्य चोप्राशी लग्न केलेली बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जीचा बहुप्रतिक्षीत ‘मर्दानी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
चित्रपटात शिवानी शिवाजी रॉय या गुन्हे विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत राणी मुखर्जी समाजातील अल्पवयीन मुलींच्या सेक्स ट्राफीकींगविरोधात झगडताना दिसत आहे.
चित्रपटात अल्पवयीन मुलींची तस्करी करणाऱया टोळी विरोधात राणी मुखर्जी शोध मोहीम राबवून मुलींची सुटका करताना या ट्रेलरमधून पहायला मिळत आहे.
ट्रेलर पाहता, एक सक्षम महिला पोलीस अधिकारी (राणी मुखर्जी) आणि अल्पवयीन मुलींच्या तस्करी सारखा गहन प्रश्न यावर ‘मर्दानी’ चित्रपटाचे कथानक असेल.
‘यशराज बॅनर’ने यावेळी ‘मर्दानी’ चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नाला हात घालण्याचा प्रयत्न केल्याने हा चित्रपट बॉलीवूटपटांमध्ये आपली वेगळी छाप पाडण्याची शक्यता आहे. दिग्दर्शक प्रदीप सरकार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.  ‘मर्दानी’ २२ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.