एप्रिल महिन्यातील शेवटचे दोन दिवस हे बॉलिवूडसह संपूर्ण देशासाठी दु:खदायक ठरले. २९ आणि ३० या दोन दिवसांमध्ये कलाविश्वाने इरफान खान आणि ऋषी कपूर या दोन दिग्गज अभिनेत्यांना गमावलं. या दोन दिग्गजांच्या निधनावर संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत असतानाच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या असून अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मार्कंडेय काटजू हे बऱ्याच वेळा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येत असतात. यावेळी त्यांनी ऋषी कपूर आणि इरफान खान यांच्या निधनावर वक्तव्य केलं आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांचं मत व्यक्त करत खोचक विधान केलं आहे. मार्कंडेय काटजू यांनी १ मे रोजी सकाळी ट्विट केलं होतं.

“कलाविश्वातील दोन अभिनेत्यांचं निधन झाल्यामुळे तमाम जनता त्यावर अश्रू गाळत आहे. परंतु उपासमारीमुळे कोट्यवधी प्रवासी मजूरांचे हाल होतांना दिसतायेत.मात्र ते कोणाला महत्त्वाचं वाटत नाही..धन्य हो!”,असं ट्विट मार्कंडेय काटजू यांनी केलं. त्यांचं ट्विट पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे.

‘सेवानिवृत्तीनंतर प्रत्येक न्यायाधीश तणावग्रस्त होतं. कारण त्यांना हे कळून चुकलं असतं की आता ते काहीही करु शकत नाही.ते केवळ एक मशीन झाले असतात’, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, ‘सर या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. आम्हाला दोन अभिनेत्यांना गमावण्याचं दु:ख आहे. पण सोबतच मजूरांच्या मदतीसाठी आम्ही उभेदेखील राहिलो आहोत’, असं अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

दरम्यान, मार्कंडेय काटजू हे कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात. यापूर्वी त्यांनी कलाविश्वातील काही अभिनेत्यांवर टीका केली आहे. २०१६ मध्येदेखील त्यांनी ‘अमिताभ बच्चन हा रिकामी डोक्याचा माणूस आहे’, असं वक्तव्य केलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Markandey katju on rishi kapoor irrfan khan death ssj