सँड्रा बुलक आणि जॉर्ज क्लुनी यांचा या वर्षांतील सर्वात लोकप्रिय ठरलेला ‘ग्रॅव्हिटी’, ‘द काँज्युरिंग’ हा भयपट, मायकेल डग्लस, रॉबट्र डी निरो यांचा ‘द लास्ट’.. यंदाच्या वर्षांत प्रदर्शित झालेल्या या हॉलिवूडपटांनी तब्बल ५०-५० दिवस तिकीटखिडकीवर टिकून राहात कोटय़वधींचा गल्ला केला आहे. हॉलिवूडपटांच्या भारतातील या लोकप्रियतेचा अधिकाधिक लाभ उठवण्यासाठी आता वॉर्नर ब्रदर्स, फॉक्स स्टार स्टुडिओ आणि पीव्हीआर सिनेमा यासारख्या नामांकित हॉलिवूड चित्रपटनिर्मितीगृहांनी भारतीय सिनेबाजाराकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्याचाच परिपाक म्हणून पुढील वर्षी ३० हून अधिक हॉलिवूडपट देशात झळकणार आहेत.
‘ग्रॅव्हिटी’, ‘द कॉन्जुरिंग’ या चित्रपटांना इतका चांगला प्रतिसाद मिळाला आहे की यावर्षी भारतीय सिनेबाजारात आमच्या चित्रपटांचा वाटा हा ३५ टक्के इतका होता. केवळ नफाच नाहीतर इंग्रजी चित्रपटांनी भारतात ५० दिवस टिकून राहणे हेही आमच्या दृष्टीने फार मोठे आहे, असे ‘वॉर्नर ब्रदर्स’च्या सूत्रांनी सांगितले. ‘ग्रॅव्हिटी’ने तर २३ कोटी रुपयांची कमाई केल्याचे सूत्रांनी आवर्जून सांगितले. हुरुप वाढलेल्या वॉर्नर ब्रदर्सने आणखी १६ चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित करण्याचे ठरवले आहे. भारतात मिळणाऱ्या प्रतिसादामुळे पीव्हीआर समूहानेही स्वतच हॉलिवूडपटांचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत हॉलिवूडपटांचे भारतातील व्यवसायाचे प्रमाण आठ ते १२ टक्के होते. आता मात्र हे प्रमाण ३५ टक्क्य़ांपर्यंत गेले आहे. यात प्रामुख्याने नेटप्रेमी युवापिढीचा सहभाग असल्याचे निरीक्षण पीव्हीआर समूहाचे विपणनप्रमुख गिरीश वानखेडे यांनी नोंदवले. अमेरिकेत झळकणारे हॉलिवूडपट भारतातही त्याच आठवडय़ात झळकतात त्यामुळे आपल्याकडेही या नव्या चित्रपटांबद्दलची उत्सुकता कायम राहाते, असे ते म्हणाले. ‘स्पायडरमॅन’सारख्या फ्रँचायजी चित्रपटांचाही हॉलिवूडपटांच्या लोकप्रियतेत मोठा वाटा आहे. त्यांचा चाहता वर्ग आधीपासून तयार झालेला असल्याने नव्या सिक्वलसाठी सुरुवातीपासून चांगला प्रतिसाद मिळतो, वानखेडे म्हणाले.
‘भाषांतरित चित्रपट’ बाजारही तेजीत
हॉलिवूडपट हिंदी, तमीळ आणि तेलुगू यातही भाषांतरित केले जातात. त्यामुळेही त्यांची लोकप्रियता वाढते. अगदी मालेगाव आणि नंदुरबारसारख्या दुर्गम भागातही हे चित्रपट पाहिले जातात. दरम्यान, फॉक्स स्टार स्टुडिओचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सिंग यांनीही आगामी वर्षांत ‘एक्समेन’, ‘रिओ’, ‘नाईट अॅट म्युझियम’सारख्या फ्रँचायझी चित्रपटांसह १५ हॉलिवूडपट भारतात प्रदर्शित करणार असल्याची माहिती दिली.
वॉर्नर ब्रदर्सचे आगामी चित्रपट
*‘ग्रज वॉच’, ‘३००’ चा सिक्वल, ‘गॉडझिला’, ‘हॉबिट : दे आर बॅक अगेन’
*यातील सहा चित्रपट हे ‘थ्रीडी आयमॅक्स’ स्वरूपात असतील
भारतीय बाजारपेठांच्या ‘ग्रॅव्हिटी’त हॉलिवूडपट!
सँड्रा बुलक आणि जॉर्ज क्लुनी यांचा या वर्षांतील सर्वात लोकप्रिय ठरलेला ‘ग्रॅव्हिटी’, ‘द काँज्युरिंग’ हा भयपट, मायकेल डग्लस, रॉबट्र डी निरो यांचा ‘द लास्ट’..
First published on: 29-12-2013 at 12:22 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Market grows for hollywood films in india