रेश्मा राईकवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तरुण पिढीच्या प्रेमाच्या कल्पना, लग्नसंस्था – नातेसंबंध याबाबतीतली मतमतांतरे ओळखून मनोरंजक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक लव रंजन यांनी त्यांच्या चित्रपटांतून केला आहे. तरुणाईची नस अचूक पकडण्यात काही प्रमाणात यशस्वी ठरलेल्या लव रंजन यांचे ‘प्यार का पंचनामा’ आणि ‘सोनू के टिटू की स्वीटी’ सारखे चित्रपट तरुण प्रेक्षकांना कमालीचे आवडले होते. अर्थात, दिग्दर्शक मोठा झाला की त्याच्या चित्रपटातील चेहरे, निर्मितीचं गणितं सगळंच भव्य होत जातं. साचा तोच राहतो. नव्या वेष्टनात जुनाच पदार्थ असा काहीसा प्रकार लव रंजन यांच्या ‘तू झूठीं मै मक्कार’ चित्रपटाच्या बाबतीत पाहायला मिळतो. मात्र रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर या वलयांकित जोडीच्या वेष्टनात गुंडाळलेली कथा असल्याने असेल कदाचित काहीसा ताजेपणा या चित्रपटात जरूर जाणवतो.

लव रंजन यांनी दिग्दर्शित केलेले आधीचे चित्रपट पाहिले असतील तर दिल्लीसारख्या श्रीमंत शहरातील गर्भश्रीमंतांचा कुटुंबकबिला आणि त्यांची मुलं हे कथेच्या केंद्रस्थानी असतात. त्यामुळे अगदी देशभरातील करोडो प्रेक्षकांना जोडून घेणारे हे वातावरण नसले तरी त्यांना आकर्षित करणारे वा भुलवणारे काहीसे स्टायलिश कल्पित जग असल्याने ते अनेकांना आकर्षित करते. प्रस्तावनेला कारण की चित्रपटाची कथा आपल्या वास्तवाशी मेळ खाणारी नसली तरी त्यात निर्माण केलेली नातेसंबंधांची गोष्ट, प्रेमातला गोंधळ या सगळय़ा गोष्टी आपल्या प्रेक्षकवर्गाला रुचतील अशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न लव रंजन यांनी केला आहे. खूप काळ प्रेमसंबंधांत एकत्र राहिल्यानंतर अचानक संबंधित जोडीदार आपल्यासाठी नाही याचा साक्षात्कार होणाऱ्यांना त्यांच्या या तथाकथित दु:खातून बाहेर काढण्याचा जोडधंदा चित्रपटाचा नायक मिकी आणि त्याचा मित्र मिळून करतात. जोडधंदाच कारण नायक पंजाबी श्रीमंत कुटुंबातील आहे. गाडय़ा विकण्यापासून अनेक व्यवसाय एका छताखाली सांभाळणारा मिकी प्रेमात पडलेल्यांचा घटस्फोट घडवून आणतो. तो हे पैशासाठी नाही तर त्याच्या अंगी असलेल्या कलेसाठी करतो आहे हे त्याचं म्हणणं. तर प्रेम एकदा नव्हे कितीही वेळा होऊ शकतं ही धारणा असलेला मिकी पहिल्याच नजरेत टिन्नीच्या प्रेमात पडतो. दोघेही व्यावहारिक जगात वावरणारे, प्रेमाची बंधनं न मानणारे, वैयक्तिक स्वातंत्र्यावर भर देणारे वगैरे वगैरे (ही यादी दिग्दर्शकाने सोईने लिहिलेल्या आदर्श व्यक्तिरेखांमुळे कितीही मोठी करता येऊ शकते) आहेत. तरीही दोघे घट्ट प्रेमात आकंठ बुडतात, पण.. प्रेमकथा घडवण्यापेक्षा बिघडवण्यावर भर देणाऱ्या मिकीवर स्वत:च्याच प्रेमकथेचा ‘दि एन्ड’ करण्याची पाळी येते.

‘तू झूठीं मै मक्कार’ चित्रपटाची कथा रंजक आहे, मात्र त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नवीन नाही. एकीकडे ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ सारखे देश-परदेशात भटकंती करत मिळालेले प्रेम, वैयक्तिक स्वातंत्र्याच्या गप्पा आणि दुसरीकडे ‘हम साथ साथ है’ म्हणत पुन्हा कुटुंबापाशी आणून सगळंच गोड करण्याचा प्रयत्न अशी काहीशी विचित्र गुंफण यात आहे. लग्नानंतर मुलाला तुझ्या आई – वडिलांबरोबर राहता येणार नाही, असे सांगणाऱ्या मुलीची बाजू बरोबर आहे अशी भूमिका घेतो न घेतो तोच तुझ्यासाठी कुटुंबाला बाजूला नाही करू शकत म्हणणाऱ्या मुलाची बाजू बरोबर म्हणत धावाधाव करत सुवर्णमध्य गाठण्याचा प्रयत्न कथेत करण्यात आला आहे. त्यामुळे त्याबद्दल न बोललेलं बरं. बाकी रंजकतेच्या बाबतीत चित्रपट कमी पडत नाही. रणबीर आणि श्रद्धा कपूर ही जोडी पडद्यावर छान खुलली आहे. ‘ब्रह्मास्त्र’मध्ये आलियाने किती वेळा शिवा.. शिवा नाव घेतलं होतं याची गणती झाली होती, त्यापेक्षाही या चित्रपटात रणबीर आणि श्रद्धाची चुंबनदृश्ये अंमळ अधिक आहेत. त्यामुळे ‘रालिया’ पेक्षा ही जोडी बरी दिसते अशीही चर्चा सुरू झाली आहे. मात्र काहीही असलं तरी या जोडीने चित्रपट बऱ्यापैकी खुलवला आहे. चित्रपटातील गाणीही लोकप्रिय झाली आहेत. रणबीरची नृत्याची शैली, ‘यह जवानी है दिवानी’, ‘बचना ऐ हसीनों’सारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकांची आठवण करून देणारी व्यक्तिरेखा यामुळे खूप दिवसांनी त्याला साध्या-सोप्या भूमिकेत पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना मिळतो. बाकी डिंपल कपाडिया, बोनी कपूर अशी अनेक अनुभवी मंडळी आहेत. स्टॅण्ड अप कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी नायकाच्या मित्राच्या भूमिकेत चमकला आहे. त्यामुळे काही नवे, काही जुने चेहरे आणि रंजक कथा अशी मोट बांधलेला हा चित्रपट काही पंच काढत पुरेसे मनोरंजन करतो.

तू झूठीं मैं मक्कार
दिग्दर्शक – लव रंजन, कलाकार – रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, अनुभव सिंग बस्सी, डिंपल कपाडिया, बोनी कपूर, आयेशा रझा.