साऱ्या जगाला भुरळ घालणारा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा लाडका सुपरहिरो ‘आयर्न मॅन’ची भूमिका साकारणारा प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनिअरचा आज ५८ वा वाढदिवस. मार्वल कॉमिक आणि युनिव्हर्सचे असंख्य चाहते ही आजही रॉबर्टला ‘आयर्न मॅन’ म्हणूनच ओळखतात. आपल्या लाजवाब अभिनयाने आणि ‘आयर्न मॅन’ या पात्राने रॉबर्टने जगभरातील प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे.
एका सुपरहिरोची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याचं खासगी आयुष्य आणि बालपण मात्र फार वेगळं होतं. रॉबर्ट डाउनी जूनियरचा जन्म मॅनहॅटन, न्यूयॉर्क येथे झाला. रॉबर्ट चित्रपटाच्या पार्श्वभूमीतून आला आहे आणि त्याचे वडील रॉबर्ट डाउनी सीनियर हे चित्रपट उद्योगातील एक प्रतिष्ठित नाव होते. त्याची आई एल्सी अॅन फोर्ड देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्याच्या वडिलांनी हॉलिवूडमध्ये निर्माता म्हणून काम केले आहे. मोठ्या पडद्यावर प्रत्येक समस्या चटकन सोडवणाऱ्या ‘आयर्न मॅन’ला खऱ्या आयुष्यातही अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.
आणखी वाचा : “…तर मीदेखील आत्महत्या करेन”, आकांक्षा दुबेच्या आईची योगी सरकारला धमकीवजा विनंती
एक काळ असा होता की या चित्रपटसृष्टीशी थेट संबंध आल्याने रॉबर्टला बऱ्याच वाईट गोष्टींचे व्यसन लागले होते. तेव्हा तो अंमली पदार्थांच्या आहारी गेला होता. त्यामुळे अनेकवेळा त्याला पुनर्वसन केंद्रातही जावे लागले. आपली डॉक्युमेंट्री ‘सीनियर’च्या माध्यमातून रॉबर्टने यामागे वडिलांचे चुकीचे संगोपन कारणीभूत ठरले हे सांगितले आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये काही जुन्या क्लिप आहेत ज्यात त्याच्या वडिलांनी स्वतः आपली चूक मान्य केली आहे की त्यांनी आपल्या मुलाला वयाच्या ६ व्या वर्षी ड्रग्ज घ्यायला शिकवले होते.
रॉबर्टच्या ड्रग्जच्या व्यसनामुळे पहिली पत्नी डेबोरा फॉकनर हिनेही त्याला घटस्फोट दिला होता. ४ एप्रिल १९६५ रोजी जन्मलेल्या रॉबर्ट डाउनी ज्युनियरने ५ व्या वर्षापासून बालकलाकार म्हणून चित्रपटात काम करायला सुरुवात केली. त्याचा पहिला चित्रपट ‘पाउंड’ १९७० साली प्रदर्शित झाला होता ज्यात त्याने ‘पप्पी’ची भूमिका केली होती. रॉबर्ट केवळ अभिनेताच नाही तर प्रतिभावान संगीतकारही आहे. तो एक उत्कृष्ट गायक आहे शिवाय गिटार, पियानो आणि ड्रम्स कसे वाजवायचे हे त्याला चांगलंच ठाऊक आहे.