माजी जगतसुंदरी प्रियांका चोप्रा अभिनित, भारतीय ऑलिम्पक बॉक्सर मेरी कोमच्या जीवनावर आधारित चित्रपट राज्यात करमुक्त करण्यात आला आहे. संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
‘ही अत्यंत आनंद देणारी बातमी आहे. पाचवेळा जागतिक अजिंक्यपद पटकावून देशाचे नाव, तिरंग्याची शान उंचावणारी, धैर्यशील, कणखर, विजीगीषु वृत्ती जोपासणारी महिला खेळाडू मेरी कोमच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. ‘मेरी कोम’ला राज्य शासनाने करमुक्त केल्याने आपल्याला अत्यानंद झाला आहे, असे या चित्रपटात प्रमुख भूमिका निभावणाऱ्या प्रियांका चोप्रा या अभिनेत्रीने यासंबंधात जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
प्रियांका चोप्रा हिने या पत्रकात खेळाडूच्या जीवनावर आधारित या चित्रपटास पहिल्या दिवसापासून करमुक्त करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाबद्दल राज्य सरकार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहेत.प्रदर्शनादिनापासून करमुक्त करण्यात आलेला मेरी कोमच्या जीवनावर आधारित हा चित्रपट अनेक वर्गातील रसिक पाहतील, असा विश्वास या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या व्हायकॉम-१८ मोशन पिक्चर्सचे मुख्य अधिकारी अजित अंधारे यांनी व्यक्त केला आहे.

Story img Loader