बॉलीवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार याच्या आगामी ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या कथेवरून वाद निर्माण झाले आहेत. दोन गावांच्या विवाहपद्धतींचे उल्लंघन केल्याचा आरोप या चित्रपटावर करण्यात आला आहे. त्यामुळे तेथील धार्मिक नेत्यांनी ‘टॉयलेट एक प्रेम कथा’च्या दिग्दर्शकाची जीभ छाटणा-यास एक कोटीचे बक्षीस जाहीर केले आहे.

अक्षय-भूमीची ‘टॉयलेट एक प्रेम कथा’

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मथुरा येथील संतानी नंदगाव आणि बरसाना गावातील मुलगा-मुलगीच्या विवाहावर आक्षेप दर्शविला आहे. चित्रपटातील विवाहाच्या दृश्यावर आक्षेप दर्शवत लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप दिग्दर्शकावर करण्यात आला आहे. संताच्या मते, चित्रपटाच्या एका दृश्यात गावात वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा तोडण्यात आली आहे. या परंपरेनुसार सदर दोन्ही गावातील मुलगा आणि मुलगी एकमेकांशी विवाह करू शकत नाहीत. सोमवारी झालेल्या महापंचायतीमध्ये सर्व संतांनी मिळून दिग्दर्शकाची जीभ छाटण्याचा निर्णय घेतला. महापंचायतीने निर्णय जाहीर करत म्हटले की, जी व्यक्ती त्या दिग्दर्शकाची जीभ छाटून आणेल त्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.

नंदगाव आणि बरसाना या दोन्ही गावांमध्ये लग्न न करण्याची प्रथा आहे. ‘भगवान कृष्ण हे नंदगावचे रहिवासी होते आणि राधा त्यांची प्रेयसी होती. राधा बनारसची रहिवासी होती, असे म्हटले जाते. या दोन्ही भागातील मुलं-मुली एकमेकांशी लग्न करु शकत नाहीत. पूर्वापार चालत आलेली ही प्रथा आजही कायम आहे’, असे वकिल गोकलेश कटारा यांनी स्पष्ट केले आहे. धार्मिक नेता असलेले महामंडलेश्वर नवल गिरी महाराज यांनी चित्रपटाचे शीर्षक बदलण्याचा सल्ला दिला आहे. समाजापर्यंत योग्य संदेश पोहचावा म्हणून चित्रपटाचे शीर्षक ‘टॉयलेट एक स्वच्छ अभियान’ असे ठेवण्यात यावे असे त्यांनी म्हटले. तर महंत हरीबोल महाराज यांनी अशाप्रकारचे शीर्षक असलेल्या चित्रपटाचे चित्रीकरण राधा-कृष्णाचे अस्तित्व असणा-या गावांमध्ये करणे चुकीचे असल्याचे म्हटले. जोपर्यंत चित्रपटाचे शीर्षक बदलले जात नाही तोपर्यंत येथे चित्रीकरण करण्यास परवानगी दिली जाणार नाही असेही त्यांनी म्हटले.

‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटात अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या भूमिका आहेत.

Story img Loader